षड्यंत्र ६
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
षड्यंत्र ६ |
" मग सावसीताने नसतं का बोलता आलं ? लगेच
आगीत तेल ओतण्याचे गरज होती का ?" असं बोलून
त्या पण प्रेम आणि लिला च्या बेडरूम च्या दिशेने निघाल्या. तेव्हा सुंदर राव स्वतःशीच उद्गारले," हीच तर योग्य वेळ होती. लोहा गरम है, तो मार दो हातोड़ा हाच सृष्टिचा नियम आहे !" असे बोलून विकट हास्य केलं.
आता इथून पुढे
प्रेम भयंकर चिडला होता , तो आपल्या बेडरूम गेला
तरी त्याचा राग अजून शांत झाला नव्हता. गळ्यातील
टाय काढून एका बाजूला फेकत म्हणाला," काही झालं
तरी मी दुसरे लग्न अजिबात करणार नाही. नाही मूल झालं
की करा दुसरे लग्न ? तिला ही मूल नाही झालं की करा
तिसरं लग्न ? म्हणजे काय सारखी लग्नच करत बसायची
का ? आणि त्या बाईने काय करावं ? जिला मातृत्व तर लाभले च नाही. उलट तिला वांझ म्हणून हिनवले जाते.
तिच्या मनाचा कुणी विचारत करत नाहीये. तिला किती यातना होत असतील याची कुणी कल्पनाच करत नाही. ज्या स्त्री ने केवळ ह्या विश्वासावर आपल्या आई- वडिलांचे घर सोडले की ज्या व्यक्ती सोबत आपल्या आई-वडिलांनी गाठ बांधून दिली आहे, ती व्यक्ती जीवनभर आपला सांभाळ करेल. आपली साथ कधीच सोडणार नाही. हा एक तिच्या मनात विश्वास असतो. तीच व्यक्ती जेव्हा तिला अर्ध्या रस्त्यामध्येच सोडून देतो तेव्हा तिच्या मनावर किती मोठा आघात होत असेल याची जरा कल्पना केली म्हणजे आपल्या ध्यानात येईल की आपण किती अन्याय केला आपल्या पत्नीवर. मला त्याची जाणीव आहे म्हणून मी माझ्या लिला वर असा अन्याय कदापि होऊ देणार नाही." लिला एकटक लावून त्याच्या रागाकडे पाहत होती नि मनात विचार करत होती की मी किती भाग्यवान आहे की मला प्रेम सारखा जीवनसाथी मिळाला. म्हणून खुश ही होते. परंतु आपण आपल्या जीवनसाथी ला एक बाळ देऊ शकत नाही म्हणून मनातून दुःखी पण होते. आपल्या नवऱ्याची कशी समजूत काढावी हेही तिला कळत नसते. पण तरी देखील ती त्याला म्हणाली," तुम्ही कशाला त्रास करून घेताय ? आता पूर्वी सारखे युग नाहीये. हे विज्ञान युग आहे, ह्या युगात काहीच अशक्य नाहीये. आपण सरोगेसी करून आई -वडील बनू शकतो. हां आता त्यासाठी सरोगेसी ची निवड योग्य प्रकारे झाली पाहिजे. आपण ऍड देऊ वृत्तपत्रा मध्ये आणि मुलाखत घेऊ जी मुलगी गरजू आणि गरीब असेल तिलाच प्रथम प्राधान्य देऊ कसं ?" तेव्हा दरवाजात उभ्या असलेल्या मधुराबाई पुढे येत म्हणाल्या," अगदी बरोबर. बाळ तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही , दुसरे लग्न करण्यासाठी !"
" बाबा, बघितलेस ना काय म्हणाले ते."
" त्यांचं सोड. मी आहे ना, तुझी आई ! कशाला चिंता
करतोस ?"
" आई , तूच बाबाना समजवून सांग ना, की मी दुसरे लग्न कदापि करणार नाही. कारण लिला ला घटस्फोट देणे हा विचारच मला सहन होत नाहीये."
" नको करुस तू दुसरे लग्न , मी तुझ्या बाबांशी बोलेन
या संबंधी. मग तर झालं."
" हां एकदम समजावून सांग बाबांना. जास्त जबरदस्ती
केली तर मी हे घर सोडून निघून जाईन. पण दुसरे लग्न
करणार नाही." असे म्हणून सरळ बाथरूम मध्ये शिरला.
तश्या मधुराबाई लिला कडे पाहत म्हणाल्या," आता तूच
समजावून सांग त्याला येते मी !" असे म्हणून त्या त्यांच्या
बेडरूम मधून बाहेर पडल्या नि आपल्या बेडरूम मध्ये
शिरल्या तसे सूंदर राव आपल्या पत्नी कडे पाहत म्हणाले,
" मग काय म्हणतात तुमचे चिरंजीव ?"
" हे बघा तुम्ही त्याच्यावर अजिबात बळजबरी करू
नका."
" अगं पण त्याच्या हिताचंच बोलतो ना मी ?"
" सध्या तुम्ही काहीच बोलू नका. त्याला त्याच्या मना
सारखे करू दे. तो म्हणतोय ना, सरोगसी करायची तर
करू दे ना, तुम्हांला त्याचा काय प्रॉब्लेम आहे ?"
" मला नाही गं काही प्रॉब्लेम झाला तर त्यालाच त्याचा
प्रॉब्लेम होईल."
" ती कसा ?"
" जी महिला त्याच्या मुलाची सरोगेट मदर बनायला तयार होईल ती बाळ झाल्यानंतर बाळ न देता पळून गेली तर काय करायचं आपण.?"
" असं घडलंच कशावरून ? चांगली सरोगसी पण तर मिळतात. कित्येक लोक हाच मार्ग स्वीकारतात आणि मला तर वाटतं हाच उपाय योग्य आहे. कारण ज्या स्त्री ला मूल होत नाही म्हणून तिला सोडून दिलं जातं त्या स्त्री चा
कधी विचार कधी कुणी करतच नाही की त्या स्त्री ला किती दुःख आणि किती यातना होत असतील. केवळ तिला मूल होत नाही म्हणून तिचा त्याग केला जातो. पण त्या उलट जेव्हा घडतं म्हणजे स्त्री चा दोष नसतो. सारा दोष पुरुषाचा असतो , म्हणजे तो आपल्या पत्नीस मूल
देण्यास असमर्थ असतो. त्यावेळी ती स्त्री मात्र आपल्या नवऱ्याचा त्याग करत नाही. आपल्या नशिबात नाही असं समजून ती त्याच्या सोबत मरेपर्यंत राहते. जर एक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी जीवनभर निपुत्रिक म्हणून राहू शकते तर एक पुरुष आपल्या पत्नीच्या प्रेमाखातीर निपुत्रिक का राहू शकत नाहीये ? म्हणजे त्याग फक्त
पत्नीनेच करायचा असतो का ? तो त्याग पती ने का करू नये ?"
" तुला काय म्हणायचंय माझा निर्णय चुकीचा आहे ?"
" हां ! तुम्ही त्यांच्यावर आपला निर्णय लादताय ही
त्यांच्यावर केलेली बळजबरी नव्हे काय ? "
" मग काय त्याना त्यांच्या मनासारखे करू द्यावे ?"
" काय हरकत आहे ? ते आता काही लहान बाळ
राहिलेले नाहीत. आपल्या म्हणण्या प्रमाणे वागायला.
त्याना पण आपली मने आहेतच की करू द्या त्या दोघांना
त्यांच्या मनासारखे."
" म्हणजे काय करायला सांगतेस मला ?"
" फार काही नाही. तुम्ही फक्त त्या दोघांवर अजिबात बळजबरी करायची नाही. कारण आपल्या प्रेम चं आपल्या पत्नीवर खूप प्रेम आहे. त्यामुळे तो तिला कदापि घटस्फोट देणार नाहीये. जर का तुम्ही त्याच्यावर बळजबरी केली तर तो हे घर सोडून कायमचा निघून जाईल. हे चालेल का तुम्हाला ? याचा विचार अगोदर करा आणि मगच त्याच्यावर बळजबरी करा." त्यावर सूंदर रावांनी विचारलं की , असं बोलला का प्रेम ? मधुराबाई म्हणाल्या," हां मी आता त्याच्याच खोलीतून आले . त्याने स्पष्ट शब्दात सांगून टाकले की जर तुम्ही माझ्यावर म्हणजे त्याच्यावर बळजबरी कराल तर तो हे घर सोडून कायमचा निघून जाईल."
" म्हणजे , आपल्या बायकोला सोडायला तयार नाही.
पण आपल्या आई-बापाला सोडायला तयार आहे."
" हां !"
" म्हणजे लोक म्हणतात ते खरंय."
" काय म्हणतात लोकं ?"
" एकदा लग्न झालं की मुलं आई-बापाची राहत नाहीत.
ते फक्त बायकोचे गुलाम बनून राहतात."
" तुम्ही पण तर तेच केलंत. मुलं आपल्या आई-वडिलांचे
अनुकरण करत असतात."
" मी काय केलं ? आई-वडिलांना सोडून गेलो का ?"
" आई-वडिलांना नाही सोडलं. पण बायकोच्या म्हणण्या
सारखं नाही वागलात का तुम्ही ?"
" मी कुठं तुझ्या म्हणण्या सारखं वागलो ?"
" काय म्हणता ? आजपर्यंत तुम्ही माझ्या म्हणल्याप्रमाणे
वागलात."
" काही पण सांगू नकोस. मी कधीच तुझ्या म्हणण्या
सारखा वागलो नाही."
" आता तुम्हीच कबूल केलंत. याचा अर्थ तुमचं माझ्या
वर प्रेमच नाही. "
" मधुरा उगाच मला शब्दात अडकवायचा प्रयत्न करू
नकोस."
" मग तुम्हांला मान्यच करावं लागेल की तुम्ही माझंच
ऐकता म्हणून."
" हे आणखीन काय तुझं नवीन. ?"
" नवीन नाही तुम्हांला कबूलच करावं लागेल की तुमचं
माझ्यावर प्रेम आहे किंवा नाही ?"
" आहे की बाई ! हात जोडतो मी आता तुझ्या पुढे !"
" याचाच अर्थ तुम्ही माझं ऐकता."
" हो गं बाई ! मी तुझंच ऐकतो. बस्स !"
" आता झालाच ना कबूल ?"
" काय करणार , बायको पुढे चालतं का नवऱ्याचे ? कारण बायको रुसलेली चालत नाही. म्हणून ऐकावं लागतं
तिचं."
" आता कसं एकदम करेक्ट बोलतात तुम्ही ! म्हणून
मी काय सांगते ते ऐका."
" काय सांगणार आहेस ते सांग."
" त्याला दुसरे लग्न करण्यास फोर्स करू नका. तो
म्हणतोय सरोगेट मदर पाहू या तर त्याच्या मना सारखे
होऊ दे एकदा."
" ठीक आहे, करू दे त्याला स्वतःची मनमानी. सरोगेट
मदर मूल न देता पळून गेली म्हणजे कळेल."
" आपल्याला काय करायचं आहे, दोघे नवरा बायको
घेतील निर्णय घ्यायचा तो. उगाच आपण त्यात कशाला
पडायचं ?"
" ठीक आहे , नाही पडणार मी त्यात. सरोगसी करायची
तर सरोगसी करून घ्या. पण त्या सरोगेट मदर ने जर
धोका दिला तर मात्र त्याने माझं ऐकलं पाहिजे. जाऊन
सांग त्याला."
" ठीक आहे, सांगते मी त्याला." असे म्हणून मधुराबाई
त्यांच्या बेडरूम मधून बाहेर पडल्या. तेव्हा त्यांच्या
पाठमोरी आकृती कडे पाहत सूंदर राव म्हणाले ," जा तू
त्याना खुशाल जाऊन सांग. आपल्या लाडक्या लेकाला
की सरोगसी ला माझा विरोध नाही म्हणून. पण शेवटी मी माझ्या मनासारखेच करणार फक्त त्यासाठी माझ्या मित्राला या कटात सामील करून घ्यायला पाहिजे की पुढचं माझं सारं प्लॅन यशस्वी झालंच म्हणून समजा. "
मधुराबाई आपल्या लेकाच्या बेडरूम मध्ये गेल्या नि
त्यानी त्याला आश्वासन दिलं की तुझ्या बाबांनी संमती
दिली आहे, परंतु त्यांची एक अट आहे. तेव्हा प्रेम ने विचारले की कोणती अट ? तेव्हा मधुराबाईंनी त्याच्या
वडिलांची अट त्याला सांगितली. तेव्हा तो अट मान्य
नाही असं म्हणाला होता. पण त्यावेळी लिला पटकन
म्हणाली, " आई, बाबांना सांगा की आम्हांला तुमची
ही अट मान्य आहे म्हणून." त्यावर प्रेम तिच्यावर रागवत
म्हणाला," पण मला मान्य नाही अट ?" त्यावर लिला त्याला समजावत म्हणाली," कशाला टेन्शन घेताय तुम्ही ?
तुम्हांला तर चांगलं माहीत आहे की असं क्वचितच घडतं.
आणि जरुरी नाहीये की आमच्या सोबत ही तेच घडेल.
म्हणून अट मान्य करा त्यांची. म्हणजे त्यांच्या मनाची ही
शांती होईल." त्यावर प्रेम म्हणाला," आता तू म्हणतेस
म्हणून मी हे मान्य करतोय." असे बोलून तो आपल्या
आई कडे पाहत म्हणाला," आई, आता ही म्हणते म्हणून
मी मान्य करतोय इतकंच." तेव्हा मधुराबाई आपल्या
गालातल्या गालात हसतात. कारण त्यांना माहीत होतं
की नवऱ्याला शेवटी बायकोचे ऐकावेच लागते. तेथे
कोणतीही तडजोड नाहीये. असे म्हणून त्या मागे वळल्या.
जेव्हा त्याना त्यांच्या पत्नी कडून समजले की त्यांची अट
प्रेम ने मान्य केली तेव्हा त्याना एक प्रकारचा आनंद झाला.
जसा की पहिला डाव यशस्वी झाल्यानंतर एखाद्याला
दुसरा डाव आपणच जिंकण्याची खात्री निर्माण होते अगदी तसेच सुंदर रावांच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या चिन्हा
वरून भासत होते.
सुंदर रावांनी आपल्या मित्राची भेट घेतली नि त्यांनी
आपल्या मित्राला आपली योजना सांगितली. परंतु त्यांची
ही योजना त्यांच्या मित्राला ही योजना अजिबात पटली
नाही. लग्न न करता त्यांच्या मुलीने अर्थात माधवी ने प्रेम
शी लग्न करता त्याच्या मुलाची सरोगसी बनण्यास तयार
व्हावी नि इतकेच नाही तर त्यांच्या घरी राहून तिने एका
घरच्या सदस्या सारखे राहावे आणि प्रेम ला आपल्या
प्रेमाच्या जाळ्यात ओढावे. माधवीच्या वडिलांना अर्थात
माधवरावांना ही कल्पनाच मुळात मान्य नव्हती. ते रागावून म्हणाले," सुंदर तुझं डोकं तर ठिकान्यावर आहे ना ? लग्न न करता ती तुझ्या घरी का येऊन राहील ती ? आणि तिला सरोगेसी व्हायला सांगतोस. ते शक्य नाहीये."
" अरे , सरोगसी व्हायला सांगतो म्हणजे काय ? हे प्रेम
च्या जवळपास जाण्यासाठी उत्तम माध्यम आहे. नाहीतर
तो तिला आपल्या जवळपास ही फिरकू द्यायचा नाही."
" ते सारं खरे ! परंतु लग्न करता त्याच्या मुलाची आई
होणे हे मला तरी पटत नाहीये. कारण तुझ्या मुलांवर मला
यत्किंचितही विश्वास नाहीये. मागच्या वेळी त्याने असेच
केले. माझ्या मुलीचे प्रेम न स्विकारता त्याने आपल्या
वडिलांच्या वैऱ्याशी संधान बांधून त्यांच्या मुलीशी लग्न
केलं आणि मुलगी फक्त त्याची वाटच पाहत राहिली. खरं
तर तू मला शब्द दिला होता पण काय झालं त्याचं पाहिलेस ना ?" त्यावर सूंदर राव म्हणाले ," मला मान्य आहे, मी तुला दिलेले वचन पाळण्यास असमर्थ ठरलो.
पण त्यासाठी मी प्रयत्न केले नाहीत असं मात्र नाहीये.
मी प्रयत्न पुष्कळ केलेत. त्या दोघांना दूर करण्याचे. त्या
प्रयत्ना मध्ये मी माझ्या एका लायक मुलाला गमावून बसलो. आता राहिला आहे तो एकुलता एक मुलगा आहे.
पण तरी देखील मी तुझ्या मुलीस अजूनही माझी सून
बनवून घेण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी थोडंसं नाटक
करावं लागेल. ते केले की बस्स बाजी आमच्या हातातच
आहे." परंतु माधवराव अजिबात ह्या गोष्टीस तयार झाले
नाहीत. ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले की आधी लग्न
मगच सर्वकाही ! परंतु माधवी मात्र ही गोष्ट पसंद पडली.
ती पटकन म्हणाली," काका मी तयार आहे , आपली सून
बनण्यास." तेव्हा माधवराव चिडून म्हणाले," तुला कळतंय
का ? तू काय म्हणालीस ते."
" हो. मला प्रेम च्या मुलाची आई व्हायचे आहे. अर्थात
त्यांच्याशी लग्न न करता असेच ना ?"
" होय. असाच त्याचा अर्थ आहे. परंतु हा काही पोरखेळ
नाहीये. आमच्या इज्जतीचा प्रश्न आहे. उद्या लोकांना
समजलं तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. म्हणतील की माधवराव आपल्या मुलीच्या प्रेमात इतका
आंधळा झाला आहे की त्याला आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेची पण पर्वा नाहीये आणि मी असं कोणतेही कृत्य
करणार की ज्यामुळे आपल्या आपल्या घराण्याची प्रतिष्ठा
धुळीला मिळेल." त्यावर माधवी म्हणाली," पप्पा तुमच्यासाठी जास्त काय महत्वाचे आहे ? म्हणजे घराण्याची प्रतिष्ठा का आपल्या मुलीचे सुख ? ते तुम्ही
स्वतः ठरवा आणि त्या नुसार निर्णय घ्या. कारण तुमची
मुलगी प्रेम पासून दूर राहून सुखी होणार नाहीये. तुमच्या
मुलीचे सुख प्रेम च्या जवळपास राहण्यात आहे, आणि
तुम्हीच विचार करा ना, लिला प्रेम ची फक्त पत्नी बनली
आहे, परंतु तिच्या मुलाची माता बनण्याचे सौभाग्य प्राप्त
झालंय का ? नाही ना ? ते सौभाग्य मला नकळत का होईना मला प्राप्त होत आहे. तेव्हा ते सुख तुम्ही माझ्या
पासून हिरावून घेऊ नका. आपल्या मुलीला खुश पाहायचे
असेल तर हो म्हणा नाही म्हणू नका. " असे म्हणून माधवी
आपल्या आईकडे पाहत म्हणाली," मॉम आता तूच
समजावून सांग ना पप्पा ना ?" खरं तर आपल्या लेकीचा
हा निर्णय पार्वतीबाई ना देखील मान्य नव्हता. परंतु आपल्या लेकीच्या जिद्द पुढे त्याना माघार घ्यावी लागली.
त्या नाईलाजाने आपल्या पतीला म्हणाल्या," जर तिला
विश्वास आहे की , ती प्रेमाने प्रेम ला आपलंसं करील तर
तुम्ही उगाच मध्ये का बाधा बनताय ?"
" अगं पण ती जे करायला निघाली आहे, तर समाज्या च्या दृष्टीने योग्य आहे काय ? समाज ह्या गोष्टीस मान्यता देईल काय ? अजिबात नाही." त्यावर त्या हसून म्हणाल्या
की प्रश्न ही तुम्हीच विचारताय नि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच
देताय. त्या पेक्षा त्या प्रश्नांचे उत्तर येणार काळ देईल ना ?"
" अगं पारू , तुला ही कळत नाहीये. तू मला काय
करायला सांगत आहेस ते. परंतु मी हे कसं मान्य करू ?"
" पोटच्या प्रेमाच्या खातीर तुम्ही एवढं पण करू शकत
नाही का ? आणि भाऊजी म्हणताहेत ना, की ते आपल्या
माधवीच्या आपली सून म्हणून स्वीकार करतील म्हणून."
" हो. पण तसं होईलच याची गॅरंटी कोण देईल ?"
" मी गॅरंटी देतो तुला. की मी म्हणतो तसेच होईल आणि
तसं नाही झालं तर मी तसं करण्यास भाग पाडीन. पण
यावेळी तू माझ्यावर विश्वास ठेव." सुंदर राव दृढ निश्चयाने
म्हणाले. नाही होय करता करता शेवटी माधवरावानी
शेवटी आपली संमती दर्शविली.
एकदाचं गंगेत घोडे न्हाले म्हणायचे तर ! आता पुढे काय होतंय ते पाहू पुढच्या भागात प्रेम तयार होतो का ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा