महाभारत १२२ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेन्द्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १२२ |
महाभारत 122
महाराज धृतराष्ट्र एकटेच आपल्या कक्षेत रडत होते.
तेवढ्यात तेथे महामंत्री विदुर आले त्याना पाहून महाराज
धृतराष्ट्र म्हणाले," कधीचा गेलास तो आतासा आलास होय ?
आपल्या थोरल्या भावाचा रडणारा चेहरा पहायला.असं नसेल तर नक्कीच शोक प्रगट करायला आला असशील.
बोल दीर्घायुष्याचा आशीर्वाद घेऊ इच्छितोयस का ?"
" नाही! दीर्घायुष्य घेऊन काय करणार मी ! मी आलोय
फक्त शोक प्रगट करायला."
" माझे सर्व पुत्र मारले गेले मी एकदम कंगाल झालोय."
" त्याला कारणीभूत पण आपणच आहात." तशी महाराज
धृतराष्ट्र चिडून म्हणाले ," विदुर अजूनही तू माझ्यावरच आरोप करतो आहेस ? एवढं सारं घडलं तरी तुझं म्हणणे मीच त्याला जबाबदार !"
" हो ! कारण त्याला आपली महत्वकांक्षाच जबाबदार
आहे, मी अनेक वेळा युध्द रोखण्यासाठी प्रयत्न नव्हता का केला. तातश्रीनी सुद्धा युध्द रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता का ? परंतु आपण ऐकले का कोणाचे ?"
" तातश्री बद्दल बोलू नकोस तातश्री ने जर शस्त्र खाली
ठेवले नसते तर आमचा पराजय झाला नसता विदुर ? तातश्री
सदैव पांडवांचा पक्ष घ्यायचे."
" तातश्री फक्त आपल्या पुत्रांचेच आजोबा नव्हते. पांडवांचे पण ते आजोबांचं होते. आणि आपण पांडवांवर सतत अन्याय करत होता मग गप्प कसे बसतील ते. परंतु केवळ हस्तिनापूरच्या निष्ठा मुळे आपल्या अन्यायाचा पक्ष असूनही आपल्या पक्षतूनच त्यांनी युध्द केले. आणि बाणांचा शय्येवर पडले आहेत ते केवळ आपल्या राजनीती मुळेच
घडले हे सारे !"
" माझ्या राजनीती मुळे ?"
" हो आपल्याच राजनीती मुळे !"
" परंतु मी कोणती राजनीती केली ?"
" आपले पुत्र दुर्योधन सदैव पांडवा विरुध्द कट कारस्थान करत होता तरी आपण त्याला कधी रोखले का ? नाही.
उलट खुश होत होते. आणि खरे सांगायचे तर त्या कपटी शकुनीला आपल्या हस्तिनापूरला राहू दिलं नसतं तर कदाचित दुर्योधन एवढा बिघडला नसता. परंतु आपण
त्याला आपला हितचिंतक समजलात. मुळात तिथंच चूक
केलीत. ही सर्व त्याचीच फळे आहेत ,भ्राताश्री ! मी अनेक
वेळा आपल्याला त्याच्या पासून सावध करण्याचा प्रयत्न
केला. परंतु आपण माझे कधी ऐकलेच नाहीत. आपल्याला सदैव आपल्या पुत्राचे म्हणणे योग्य वाटले. पुत्र मोहात आपण इतके वाहत गेलेत की त्याच्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालत गेले. आपण देशाचे विभाजन केले. ते आपल्याला करायला नको. बरा केले ते केले ,पांडवांनी स्वतःच्या मेहनतीने उभे केलेले इंद्रप्रस्थ तेही आपल्या पुत्राला हवे झाले. आणि आपणही त्याला साथ दिली. पुत्राचा हट्ट पुरविण्यासाठी द्युतक्रीडा सारख्या विनाशक क्रीडाला
आमंत्रित केलेत. द्युतक्रीडेत पांडवांशी कपट करविले. इतके करूनही थांबले नाहीत तर कुलवधूच्या वस्त्रहरणाचा
प्रयत्न केला गेला. हा सर्व त्याचाच परिणाम आहे, त्या वेळी जर आपण तसं होऊ दिलं नसतं तर ना भीमाने दुर्योधनाची जंगा तोडण्याची प्रतिज्ञा केली असती नाही आज दुर्योधनाची
जंगा तुटली असती. परंतु त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला
नाही त्याचाच हा परिणाम आहे."
" परंतु मी तसं नसतं केलं तर दुर्योधनाने आत्महत्या
केली असती त्याचं काय ?"
" काहीही आत्महत्या नसती केली त्याने, कारण आत्महत्या करणारे कधी सांगून आत्महत्या करत नाहीत.
आणि केलीच असती तर दुसरे पुत्र होतेच की आपल्याला.
निदान हा पूर्ण विनाश तरी टळला असता."
" तुला पुत्र नाहीत म्हणून तू असं बोलतो आहेस."
" आपले पुत्र माझे पुत्र नाहीत का ? पांडव माझे पुत्र
नाहीत का ? "
" हो मान्य आहे, परंतु माझ्या पुत्रा पेक्षा अनुज पांडूच्या
पुत्रावरच अधिक प्रेम केलेस तू "
" असं नाहीये. आपल्याला वाटतं तसं. आणि खरं सांगू
आपल्या पेक्षा जास्त मी दुःखी झालोय भ्राताश्री ! हे युद्ध मी
रोखू शकलो नाही. आणि हा झालेला विनाश मी टाळू शकलो
नाही. ज्या ज्या वेळी मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला
त्या त्या वेळी आपण मला झिडकारलेत ! कधीच ऐकून घेतले नाहीत माझे ! तेव्हा जर आपण माझे ऐकले असते तर
ही वेळ आली नसती आपल्यावर , परंतु जे घडून गेले त्याला
आपण बदलू शकत नाही. परंतु जे घडू शकते त्याला घडवायला हरकत नाहीये."
" म्हणजे काय म्हणायचं तुला ?"
" आज पांडू पुत्र येतील त्याना आपल्या हृदयाशी धरा !
ते आपल्याला पुत्राची माया जरूर देतील."
" इथं माझे शंभर पुत्र वीरगती ला प्राप्त झाले आहेत. आणि ज्यांनी हे केले त्याना मी हृदयाशी धरू ? "
" हां हेच आताचे नितिज्ञान आहे."
" तुझ्या कडे नितिज्ञान व्यतिरिक्त दुसरे काही नाहीये का ?
तुझ्याकडे हृदय नाहीये का ? का नितिज्ञान देणे हाच तुझा
धर्म आहे."
" धर्मा विषयी आपण बोलूच नका भ्राताश्री !"
" का नको बोलू ?"
" कारण धर्मानुसार आपण कधी वागलेच नाहीत."
" ते कसे काय ?"
" आपण धर्मा ने वागले असता तर पांडवांचे राज्य पांडवांना देऊन टाकले असते ,कारण हे राज्य आपले नाही
तर पांडवांच्या पिता महाराज पांडूचे होते.आपण फक्त
त्याचे प्रतिनिधी होता."
" परंतु विचित्रवीर महाराजा जेष्टपुत्र मी आहे, अर्थात
माझाच त्याच्यावर अधिकार असायला पाहिजे. आणि प्रिय
अनुज पांडू तर राजमुकुट घालायला तयारच नव्हता."
" भरतवंशी ची परंपरा आहे ,केवळ जेष्ठपुत्र असून
चालत नाही तर त्यासाठी योग्यतेची गरज आहे, आणि हे
प्रथमच नाही घडलं तर पूर्वीपासून भरतवंशी मध्ये हेच घडत आलेय. महाराज शंतनू प्रथम पुत्र नव्हते तरी राजा झाले ना ?
त्यांच्या मध्ये लढाई नाही झाली कधी ! महाराज भरत चे नऊ
पुत्र होते. परंतु त्यानी आपल्या एकाही पुत्राला गादीवर नाही
बसविले. परंतु त्यांच्या पुत्रानी युध्द नाही केलं. भरतवंशी मध्ये फक्त आपणच आहात. की ज्यांनी सिंहासनासाठी युध्द घडविले. म्हणून धर्मा विषयी आपण बोलू नका.धर्म काही
पोपट नाही की जे आपण शिकवाय तेच बोलत राहील.
धर्म अथांग सागर आहे, ज्याच्या कोठेही अंत नाही असा. धर्म साऱ्या विश्वाच्याही पलीकडे आहे. सर्व विश्व त्यात सामावले
आहे.जेव्हा कुणी नीती विरुद्ध कार्य करतो तेव्हा त्याचे
प्रायश्चित्त त्याला मिळतेच. म्हणून मनुष्याने नीती विरुध्द कधी
कार्य करू नये. नाहीतर मग असा पश्चात्ताप करावा लागतो.
आपल्या विरुद्ध युध्द करणे हा सुद्धा एक धर्मच होता.
पांडवांनी आपल्या धर्माचे पालन केले आहे, तेव्हा त्यांचे आता स्वागत करा."
" मग काय फक्त मीच एक अधर्मी होतो का ? धृतराष्ट्र
अधर्मी आहे, माझ्या बाहू मध्ये मी आपल्या पुत्रांचे शवं एकत्रित करू शकत नाहीये."
" जर आपण धर्माच्या मार्गावर असता तर असं घडलंच
नसतं. पांडू पुत्र फक्त पाचच गांव मागत होते.पाच गाव त्याना देऊन टाकले असते तर काय बिघडले असते आपले. परंतु आपण पुत्र मोहाने ते न देऊन युध्द स्वतःहून ओढवून घेतलेत. हा त्याचा परिणाम आहे. आपण फक्त पिता बनून राहिलेत राजा बनून कधी निर्णय घेतला नाही. तो जर घेतला असता तर असं कदापि घडलं नसतं.परंतु होणीला कोणीही टाळू शकत नाही. आणि खरे सांगायचे तर हे आपले नि हस्तिनापूरचे दुर्भाग्य आहे, की आपला पुत्र मोह आणि
महत्वकांक्षा या दोघांनी मिळून धर्माला धक्के मारून घालवून
दिले. हे भ्राताश्री देशाचं विभाजन कोणत्याही समस्यांचे समाधान नाहीये. धर्म आणि हृदय या मध्ये भिंत उभी करायची नसते. परंतु आपण तेच केलं. धर्म आणि हृदय मध्ये
उभी असलेली भिंत पाडायची असते. आणि आपण तेच नाही केलं. धर्म आणि मोह एकत्र राहू शकत नाही.धर्मासाठी आपल्याला मोहाचा त्याग करायला लागेल.म्हणून अजूनही
विचार करा नि आपल्या मोहाला त्यागा. नाहीतर आपल्या
हाती काहीच लागणार नाहीये. बस्स या व्यतिरिक्त अजून काही सांगून शकत नाही मी !" क्षणभर निरव शांतता कोणी
कोणाशी बोलले नाही. पण लगेच शांततेचा भंग करत महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," हे कटू सत्य बोलणाऱ्या महात्मा
विदुर माझ्या कडे आता शंभर पुत्रांच्या शवा व्यतिरिक्त काय राहिले आहे ? शोक प्रगट करण्या व्यतिरिक्त मी अन्य काय करू शकतो ?" त्यावर विदुर म्हणाला , " आपण आहात,
आपला आत्मा आपल्या सोबत आहे, म्हणून हस्तिनापूरच्या
चव्हाट्यावर जाऊन हस्तिनापूरची क्षमा मागा!"
" हस्तिनापूरची क्षमा मी का मागू ? हस्तिनापूर माझ्याकडे
आले का ? माझ्या शंभर पुत्रांच्या वीरगती प्राप्त झाल्यावर
शोक प्रगट करायला." महामंत्री विदुर म्हणाले ," हस्तिनापूर
का येईल शोक प्रगट करायला ? तुम्हांला जायला पाहिजे.
कारण आपण फक्त आपल्या पुत्रांचाच विचार करताय परंतु
हस्तिनापूर साठी अनेक वीरांचा बळी दिला. आणि आपण
ज्या शंभर पुत्राना आपले पुत्र म्हणत आहात. ते सुद्धा
हस्तिनापूरचेच पुत्र होते. परंतु त्यांचा विचार कधी केला आहे का आपण ? नाही ना ? म्हणून आपण क्षमा मागायची आहे
हस्तिनापूरची !"
" धर्म मला आपल्या पुत्रांचा शोक पण करू देणार नाही
का विदुर ?"
" अवश्य देईल. परंतु धर्म वाहत्या नदीची जलधारा आहे,
परंतु ती जलधारा शेतीला आजूबाजूच्या जमिनीला, पशु पक्षांना वृक्षा वेलीची तहान भागवते परंतु ती कोणाची संपत्ती
होऊ शकत नाहीये.पुत्रावर पित्याचा अधिकार असतो.परंतु
धर्माचा कुणी पुत्र नसतो. आपण त्याचाच विचार केला नाही.
आपण आपली महत्वकांक्षेचा विस्तव दुर्योधनाच्या हातावर
ठेवून त्याला सांगितलेत हा चंद्र आहे. आपल्यावर जास्त
प्रेम करणाऱ्या पित्यावर त्याने विश्वास केला. आपण त्याच्या
हातावर इतके सारे अंगार ठेवले की त्याचा हातच अंगार बनला नि त्यात तो स्वतः जळून भष्म झाला. हे भ्राताश्री
आपलीच महत्वकांक्षा होती. ती दुर्योधनाला कुरुक्षेत्रावर
घेऊन गेली. उद्याचा इतिहास आपल्यालाच त्याचा उत्तराधिकारी ठरविणार , आपण असे एक पिता आहेत ज्यांनी भविष्याचा मार्ग रोखण्यासाठी आपल्याच पुत्रांच्या
शवांची भिंत उभी केली.
तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," तुझे बोल तर नेहमी
सारखे कटू आहेत. परंतु स्वर अश्रूंनी भरल्या सारखे का वाटताहेत ?"
" कारण मी रडत आहे ,भ्राताश्री ! परंतु माझी एक विनंती
आहे आपल्याला."
" काय विनंती आहे बोल अनुज आता तुझ्या व्यतिरिक्त
अन्य कुणी मला बोलणारा राहिलाच नाहीये. बोल काय इच्छा
आहे तुझी ?"
" विजयी झालेल्या पांडवांनी हस्तिनापूरात प्रवेश केला
आहे. आपले चरणस्पर्श करण्यासाठी येत आहेत त्याना
आशीर्वाद द्या नि वनप्रस्थान करायचच्या तयारीला लागा."
" हे हस्तिनापूर सुद्धा वना सारखेच वाटतंय मला."
" भ्राताश्री आता आपण भूतकाळात जमा झाला आहात.
तेव्हा आपले परम कर्तव्य आहे की आपण स्वतः उठून
वर्तमान काळाचा दरवाजा उघडा नि त्याला आसनास्थ करून
तपोवन भूमीकडे जाण्याचा विचार करा. आता आपल्या महत्वकांक्षेला तिलांजली द्या. आपल्या सोबत दोन्ही वहिनी
सुद्धा येणार आहेत. त्यांनी आपला निर्णय दिला."
" त्या दोघींचा सामना मी करू शकणार नाहीये."
" त्या दोघींचा सामना आपल्याला करायलाच लागेल.
त्या शिवाय आपल्याला मोक्ष प्राप्त होणार नाहीये. त्या दोन्ही
अश्या माता आहेत की त्या आपापल्या भाग्याच्या शवं घेऊन
रडताहेत. त्याच आपल्याला सांगू शकतील की आपली
महत्वकांक्षा हस्तिनापूरला किती महाग पडली." तेवढ्यात
आरोळी ऐकू आली की हस्तिनापूर सम्राट युधिष्ठीर ची जय."
" आता आपण एका क्षत्रिय प्रमाणे त्यांचे स्वागत करा
भ्राताश्री !" असे म्हणून स्वागत करण्यासाठी स्वता विदुर
पांडवांच्या सामोरी जातात. आणि पांडवांना उद्देशून म्हणाले,
" अश्रूंनी ओल्याचिंब झालेल्या राजसभेत आपले स्वागत
आहे पांडुपुत्रो ! सम्राट युधिष्ठीर महाराज !"
" काकाश्री चरणस्पर्श करू देणार नाही का ?"
" पहिल्यांदा जेष्ठ भ्राताश्री चे चरणस्पर्श करा माझे चरण
कुठं पाळताहेत ? प्रणाम वासुदेव !"
" आपण कसे आहात महात्मा विदुर ?"
" ह्या प्रश्नाला आता इथं काही अर्थ राहिला नाहीये.परंतु
आपण प्रश्न केलातच आहात तर उत्तर तर मला द्यावेच लागणार ,कारण आपण विना कारण प्रश्न विचारत नाहीत
कधी ! मी कसा आहे हे मलाच ठाऊक नाही. कारण माझ्या
हृदयात एवढा शोक भरला आहे की त्याचे कुणी सांत्वन पण
करू शकणार नाहीये. परंतु माझी आपल्याला एक विनंती
आहे की जेष्ठ भ्राताश्री ना प्रथम आपण भेटावे."
" जशी आपली इच्छा !" वासुदेव उद्गारले.
सर्वजण जसे महाराज धृतराष्ट्रा जवळ आले तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले," एक एक पुढे या म्हणजे मला
ओळखता येईल." सर्वात पहिल्यांदा वासुदेव पुढे झाले तसे
त्यांनी त्यांच्या पावलांच्या आवाजाने बरोबर ओळखले.
ते म्हणाले ," ह्या तुटलेल्या फुटलेल्या वृक्षाच्या सावलीत आपले स्वागत आहे वासुदेव !" तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ,
" हस्तिनापूर नरेश याना मी वासुदेव कृष्ण याचा सादर प्रणाम !"
" मला वाटलं की माझ्या वीरगती ला प्राप्त झालेल्या
पुत्रा विषयी शोक प्रगट करशील."
" मी औपचारिक वर माझा विश्वास नाहीये. आणि वीरगतीचा मार्ग त्यांनी स्वतः निवडला होता महाराज !
आणि वीरगतीला प्राप्त झालेल्या बद्दल बोलून जखमावरची
खपली काढल्या सारखी होते ना महाराज ?" तसे महाराज धृतराष्ट्र मोठ्या ने ओरडून म्हणाले,
" मला सारखे सारखे महाराज का संबोधत आहात ?
आपल्याला माहीत नाही काय मी आता हस्तिनापूरचा महाराज राहिलो नाही. माझा युध्दा मध्ये पराभव झाला
आहे. आता हस्तिनापूरचे महाराज प्रिय युधिष्ठीर आहे. शांतिदुत बनून आले तेव्हा म्हटलेलं वक्तव्य अगदी खरे झाले
इतिहास मलाच उत्तराधिकारी ठरविणार म्हणून."
" उत्तराधिकारी तर आपण आहातच महाराज !"
" पुन्हा तेच ! मला महाराज म्हणू नका वासुदेव ! जेव्हा
मी महाराज होतो तेव्हा माझ्या डाव्या बाजूला तातश्री
बसायचे नि उजव्या बाजूला कुलगुरू कृपाचार्य, युवराजच्या
स्थानावर माझा प्रिय पुत्र दुर्योधन बसायचा. आणि पूर्ण
राज्यसभे मध्ये माझे शंभर पुत्र विराजमान असायचे असे
वाटायचे की फुलांची बाग खुशीने डोलत आहे. आता मी
महाराज जरी असलो तरी उजाडलेल्या बागेचा माळी !
एकदम शून्य ! पण खरं सांगतोय ह्या सिंहासनांवर माझाच
अधिकार होता. आणि माझ्या नंतर माझ्या पुत्राचा अर्थात
दुर्योधनाचा परंतु आता मी युध्द हरलोय म्हणून एका क्षत्रीयां
राजा प्रमाणे सिंहासन मी रिकामी केले आहे. पण त्याचा अर्थ
असा कदापि नाही की प्रिय युधिष्ठीर साठी माझ्या कडे
आशीर्वाद ही नाही." लगेच वासुदेव कृष्णाने खुनविले. तसे
युधिष्ठीर पुढे झाला नि महाराज धृतराष्ट्राचे चरणस्पर्श केले.
" आयुष्यमान भव पुत्र ! किर्तीमानं भव ! हे महाराज
आपल्या राजभवन मध्ये आपले स्वागत आहे."
" महाराज तर आपणच आहात जेष्ठ पिताश्री !
" मी तुझा जेष्ठ पिताश्री आहे तसा एक क्षत्रिय सुद्धा आहे,
दान मध्ये मला राज्य देऊन माझा अपमान करू नकोस.
आपल्या अनुज बंधूंना बोलत, भीम, अर्जुन नकुल आणि
सहदेव कुठं आहेत सारे ?" युधिष्ठीर उद्गारला ," इथंच आहेत."
चरणस्पर्श करण्यासाठी भीम पुढे येत होता परंतु वासुदेव कृष्णा ने महाराज धृतराष्ट्रांच्या मनातील भाव ओळखले होते
म्हणून भीमाला खुणेने सांगितले की तू नाही तुझ्या मागे पुतळा आहे त्या पुतळ्याला पुढे आण. भीमाने त्या प्रमाणे केले. नंतर चरणस्पर्श केले. तसे महाराज म्हणाले ," पुढे ये
मला आलिंगन घेऊ दे." भीम आलिंगन देण्यासाठी पुढे जात
होता. तेव्हा वासुदेव कृष्णाने त्याला खुणेने सांगितले तू
आलिंगन देऊ नलोस पुतळा पुढे कर." भीमाने त्या प्रमाणे
केले. महाराज धृतराष्ट्र पुढे आले नि पुतळ्याला भीम समजून आलिंगन दिले नि इतके क्रोधाने कडकडून मिठी मारकी की त्या पुतळ्याचा चुराडा झाला नि नंतर विलाप करू लागले की माझ्या प्रिय अनुज पांडू मला क्षमा कर , मी तुझ्या पुत्राची अर्थात भिमाची हत्या केली. असे म्हणून रडू लागले, तेव्हा वासुदेव कृष्ण म्हणाले ," नाही राजन भीम जिवंत आहे, आपल्या मनातील क्रोध मी ओळखला होता,म्हणून भीमाला पुढे न करता मी भीमाच्या पुतळ्याला पुढे केले." तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले," प्रिय भीम जिवंत आहे."
" हां महाराज !"
" खूप चांगले केले वासुदेव ! मला अजून एक पाप करण्यवाचून वाचविले."
" जेष्ठ पिताश्री , अजूनही माझ्या बद्दल आपल्या
मनात राग असेल तर मी स्वतःच पुढे होतो." भीम म्हणाला.
" नाही पुत्रा नाही. आपल्या शंभर पुत्रांना गमावून बसलेला हा पिता आता आपल्या अनुज पुत्राना गमावू इच्छित नाहीये."
" जर आपली आज्ञा असेल तर आपल्या छतीतून येत
रक्त मी पुसतो." भीम पुढे जसा झाला. तसा महाराज धृतराष्ट्रानी त्याला आपल्या छातीशी धरले. तसे सर्वच पुढे झाले त्यांचे चरणस्पर्श केले. तसा त्यानी सर्वांना आयुष्यमानचा आशीर्वाद दिला.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा