महाभारत १०४ | मराठी स्टोरी, मराठी शॉट स्टोरी, मराठी कथा | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत १०४ |
महाभारत १०४
वसुदेव कृष्णाने अर्जुनला गीता उपदेश केल्यानंतर अर्जुन
मोह माया बंधनातून मुक्त झाला.तसा श्रीकृष्णाला आपला
रथ आपल्या स्थानावर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर
श्रीकृष्णाने रथ वळविला नि पांडव सैन्या जिथे उभी होती
तेथे घेऊन गेले. त्यानंतर युधिष्ठिर आपल्या रथातून खाली
उतरला नि कौरव सैन्येच्या दिशेने चालू लागला. आपल्या
जेष्ठ भ्राताला कौरव सैन्येच्या दिशेने जाताना पाहून सर्वंच
फार गोंधळून गेले. परंतु कोणी त्याला रोखले नाही. परंतु
कौरव सैन्येत मात्र खळबळ मांजली. सर्वजण आश्चर्यकारक
नजरेने युधिष्ठीर कडे पाहू लागले. दुर्योधन मात्र खुश
होत म्हणाला ," पाहिलंत पितामहा, धर्मराज युधिष्ठीर युध्द
सुरू होण्यापूर्वीच घाबरला. बघा कसा दयेची भीक मागण्यांसाठी आपल्या कडे येत आहे." त्याने युधिष्ठीरचा हा केलेला उपहास आचार्य द्रोणाचार्यांना अजिबात रुचला नाही. ते दुर्योधनला उद्देशून म्हणाले ," मी किंवा कृपाचार्यांनी तुम्हां लोकांना दयेची भीक मागण्याची विद्या शिकवीली आहे काय ? वास्तविकता जाणून घेतल्याशिवाय कोणतेही अनुमान लावणे चुकीचे आहे हे तुला ठाऊक नाही का दुर्योधन ?" तसे लगेच कृपाचार्य म्हणाले ," दुर्योधन , युधिष्ठीर तुझा मोठा भाऊ आहे , हे कदापि विसरू नकोस. आपल्या जेष्ठ बंधूंचा
उपहास करणे तुला शोभत नाहीये. जर तुला आपल्या जेष्ठ
बंधूंचा सन्मान करता येत नसेल तर किमान त्याचा अपमान तरी करू नये." त्यावर गंगापुत्र भीष्म म्हणाले ," त्याला काय
सांगताय आचार्य ? त्याला जर हे कळलं असतं तर ही वेळ
आलीच नसती. कोणताही व्यक्ती आपल्याकडे कशासाठी
येतोय हे जाणून घेतल्याशिवाय आपल्या मनाला वाटेल तसा
त्याचा अनुमान लावणे एकदम चुकीचे आहे पुत्र.परंतु तो आपल्याकडे कशासाठी येत आहे हे तर जाणून घे अगोदर."
" तुम्ही काहीही म्हणा पितामहा पण मला पक्के ठाऊक
आहे की तो जरी दयेची भीक मागायला येत नसेल तरी माझी
पूर्ण खात्री आहे की तो तहाची बोलणी करायला नक्कीच
येत असावा." त्यावर कोणीच काही बोलले नाही. कारण अश्या व्यक्तींना बोलून त्याचा काही उपयोग नसतो. जो आपलेच खरे करतो. मी म्हणेन ती पूर्व दिशा पण तसे होत
मात्र नाही. पण काय करणार सवयीच्या गुलामाना असो.
युधिष्ठिर प्रथम गंगापुत्र भीष्म यांच्या रथा समोर आला
नि दोन्ही हात जोडून त्याना वंदन केले. त्याचा मोठ्याच्या
प्रति असलेला आदर पाहून पितामहांनी त्याला आशीर्वाद
दिला नि रथातून खाली उतरले नि युधिष्ठीर जवळ येताच
युधिष्ठीर ने खाली वाकून त्यांचे चरणस्पर्श केले. तसा त्यानी
विजयी भवचा आशीर्वाद दिला. तेव्हा युधिष्ठीर म्हणाला,
" मी आपल्याकडे युद्धाची परवानगी मागायला आलो होतो पितामहां." त्यावर गंगापुत्र भीष्म उद्गारले," जर तू
माझ्याकडे युद्धाची परवानगी मागायला आला नसतास तर
मात्र मी तुला पराजयाचा शाप दिला असता."
" मी आपली परवानगी घेतल्या शिवाय शत्रूशी पण युध्द
करणार नाही पितामहां .मग हे तर आपल्याशी युध्द करायचे
आहे मला."
" मी आपल्याच प्रतिज्ञेत अडकून पडलोय. म्हणून तुला
आशीर्वाद व्यतिरिक्त अन्य काही देऊ शकत नाही , आणि दिलेच तर मी जखमाच देईन."
" आपण दिलेल्या जखमांना सुध्दा मी आपला आशीर्वाद
समजून त्यांचा आनंदाने स्वीकार करीन."
" सुखी रहा पुत्र " असे म्हणून ते मागे वळले नि आपल्या
रथावर आरूढ झाले. त्यानंतर युधिष्ठीर पुढे सरकला. आचार्य
द्रोणच्या रथासमोर येऊन त्यांना वंदन केले. तेव्हा आचार्य
द्रोण यांनी आपले दोन्ही हात उचलून आशीर्वाद देत म्हणाले,
" आयुष्यमान भव ! " असे म्हणून ते आपल्या रथा मधून
खाली उतरले नि युधिष्ठीर जवळ आले तसे युधिष्ठिर ने त्यांचे
चरणस्पर्श केले. आणि उठून उभा राहात युधिष्ठीर म्हणाला,
" मी आपला आशीर्वाद मागायला आलोय गुरुदेव."
" हे कुंती नंदन जेव्हा युध्द आरंभ होईल तेव्हा तू असा
विचार करू नकोस की मी तुझा गुरू आहे , कारण मी सुद्धा
असा विचार करणार नाही की तू माझा शिष्य आहेस. युध्द
कधीही गुरू आणि शिष्य या मध्ये होत नाही तर दोन
प्रतिस्पर्धी मध्ये युध्द होते. आता फक्त शेवटचा एक धडा
शिकवायचा राहिला आहे तो सुद्धा आज शिकवून टाकतो.
एक गोष्ट लक्षात ठेव की युद्धा मध्ये आपले परके असे काहीही नाते नसते हआणि जो योध्दा आपले शास्त्र विकून
धन मिळवितो असा लोभी योध्दा आदरणीय कदापि होऊ शकत नाही. हे कुंती नंदन रणभूमीवर मी तुझा प्रतिस्पर्धी
आहे अर्थात माझ्याशी युध्द करणे हे तुझे कर्तव्य आहे. म्हणून मी आशा करतो की तुम्ही पाची भाऊ मी दिलेल्या
अस्त्रविद्या चा अपमान करणार नाहीत. त्या शिवाय अर्जुनला
म्हणावे की त्याचे बाण माझ्या हृदयाला घायाळ करणारे
नाही लागले तर मी आपली गुरुदक्षिणा परत करीन."
असे म्हणून ते आपल्या रथावर आरूढ झाले. त्यानंतर युधिष्ठीर तेथून पुढे कुलगुरू कृपाचार्यांच्या रथा समोर जाऊन
उभा राहिला नि त्याना वंदन केले. तेव्हा कुलगुरू कृपाचार्यांनी आपले दोन्ही हात उचलून त्याला आयुष्यमानचा आशीर्वाद दिला. तेव्हा ते म्हणाले ," हे कुंती नंदन तुझ्याकडे थोडा वेळ आहे का ? मला शेवटचा धडा शिकवायचा आहे तुला."
" आपण मला धडा शिकविलात तर मी ते माझं भाग्यच
समजेन."
" कुंती पुत्र धन आणि पैसा याच्या कधी आहारी जाऊ नये."
" आपल्याशी मला युध्द करण्याची अनुमती आहे का ?"
" अवश्य कुंती नंदन हाच तर तुझा धर्म आहे." असे म्हणून
कृपाचार्य सुद्धा आपल्या स्थानावर गेले. त्यानंतर युधिष्ठीर
पुढे सरकला. तेथे मद्र नरेश शल्याचा रथ उभा होता. युधिष्ठीर
त्याना देखील वंदन केले. तेव्हा त्यांनी सुद्धा आपले दोन्ही
हात वर करून आशीर्वाद दिला नि रथातून खाली उतरून
युधिष्ठीर जवळ आले तेव्हा युधिष्ठीर ने खाली वाकुन त्यांचे
चरणस्पर्श केले. तेव्हा मद्र नरेश शल्य म्हणाले ," माझी सर्व
अस्त्र शस्त्र दुर्योधन साठी आहेत मात्र माझे सारे आशीर्वाद
फक्त तुझ्यासाठीच आहेत."
" मला फक्त आपले आशीर्वाद पाहिजे अन्य काही नको."
त्यानंतर युधिष्ठीर मागे वळला नि आपल्या शिबिराच्या दिशेने
चालू लागला. तेव्हा दुर्योधनला आपल्या कौरव सेनापतीचा
भयंकर राग आला तो खोचक पणे म्हणाला ," मला माझ्या
शिबिरातील सेनापतीचा धिक्कार करावया सारखा वाटतोंय
कारण सेनापती आहात कौरव सैन्याचे मात्र विजयीश्रीचा आशीर्वाद माझ्या वैऱ्याना देताय काय म्हणावे तुम्हाला !"
" जर तू युधिष्ठीरचे चरणस्पर्श केले असतेस तर युधिष्ठीर
तुला सुध्दा विजयीश्री चा आशीर्वाद दिला असता. पण तुझ्या
कडून ते होणार नाही, कारण तुझा अभिमान तुझ्या आड येतोय. अरे पुत्र युधिष्ठीर शकुनिचे चरणस्पर्श केले असते तर मनापासून नाहीतर वरकरणी म्हणा पण आशीर्वाद देणे भाग पडलेच असते त्याना, कारण चरणस्पर्श याचा अर्थच आशीर्वाद असा आहे पुत्र." त्यावर कोणीच काही बोलले नाही. युधिष्ठीर ने आपल्या रथावर आरूढ होताच एक घोषणा केली की पवन देव माझं ऐक जरा. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत माझा आवाज पोहोचविण्याचे काम तू करावेसे अशी मी आपणास विनंती करतो. असे म्हणून सर्व रथी महारथी ना उद्देशून म्हणाला ," माझा आवाज
जिथपर्यंत पोहोच असेल तिथपर्यंत च्या सर्व योध्यानो
जर आपणास अजूनही वाटत असेल की धर्म माझ्या शिबिरात नसून अनुज दुर्योधनच्या शिबिरात आहे तर हीच
वेळ आहे आपली निष्ठा दाखविण्याची ! पितामहां युद्ध आरंभ
होण्याचा शंक वाजविण्यापूर्वी आपण माझ्या शिबिरातून
अनुज दुर्योधनच्या शिबिर मध्ये जाऊ शकता. तसेच अनुज
दुर्योधनाच्या शिबिर मध्ये असा कोणी असेल की त्याला जर
वाटत असेल की धर्म माझ्या शिबिरात आहे तर त्यांनी अवश्य
माझ्या शिबिरात यावे .मझ्या शिबिरात त्यांचे स्वागतच होईल." असे आवाहन होताच दुर्योधन चा सावत्र भाऊ युत्सुस
आपल्या सारथी ला म्हणाला ," हे सारथी माझा रथ भ्राता
युधिष्ठीर च्या शिबिरात घेऊन चल." तसा सारथी ने रथ हाकलला. ते पाहून दुर्योधन ला भयंकर राग आला नि रागाच्या भरातच तो म्हणाला ," शेवटी सावत्र तो सावत्रच !"
तेव्हा मद्र नरेश शल्य म्हणाले ," दुर्योधन सावत्र भाऊ तेथे
सुध्दा आहेत. त्याना जेव्हा कळलं की मी तुझ्या बाजूने युध्द
करणार तेव्हा त्यांनी माझा वध करण्यासाठी आपली तलवार
उपसली होती. परंतु युधिष्ठिर आणि अर्जुन ने त्यांची समजून
काढली. असे लागते बंधू प्रेम." तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले,
" मद्र नरेश शल्य बरोबर बोलत आहेत. प्रत्येक व्यक्तीला
व्यक्तिगत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अर्थात युत्सुस
घेतलेला निर्णय योग्य आहे." तेव्हा दुर्योधन चिडून म्हणाला,
" जर धर्म त्यांच्या पक्षात आहे तर आपण इथं का थांबले
आहेत जा ना तिकडे." तेव्हा गंगापुत्र भीष्म म्हणाले ," सांगितले ना , व्यक्तीगत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला
आहे, आणि हे विसरू नकोस की धर्मक्षेत्र आहे."
" याचा अर्थ तोच झाला ना की धर्म युधिष्ठीरच्या शिबिरात
आहे."
" हे मला विचारण्या पेक्षा आपल्या आंर्तत्म्यालाच विचार
तोच तुला ह्या प्रश्नाचे खरे उत्तर देईल. आपला अहंकार बाजूला करून बघ. म्हणजे धर्म कोणत्या शिबिर मध्ये आहे तो तुला कळेल." परंतु अभिमानी दुर्योधन नेहमी स्वतःचे खरे
करणारा त्याला कुठं समजणार म्हणा असल्या गोष्टी !"
एक दासी पळतच महाराणी गांधारी जवळ आली नि
म्हणाली ," महाराणी की जय हो."
" काय बातमी आणलीस दासी शुभ वा अशुभ ?"
" हस्तिनापूर साठी ही बातमी अशुभ आहे महारानी साहेबा."
" अशी काय अशुभ बातमी आणलीस सांग बरं."
" राजकुमार युत्सुस कुंती नंदन च्या शिबिर मध्ये गेले
महाराणी साहेबा."
" एक भाऊ एका भावाच्या शिबिरातून दुसऱ्या भावाच्या शिबिरात गेला. त्यात अशुभ असं का आहे बरं ?"
" परंतु महाराज त्यामुळे फार दुःखी झाले."
" ह्या युद्धात कुणाचा विजय तर कुणाचा पराजय परंतु
भरवंशी वृद्धांच्या भाळी दुःखच लिहिलंय. माझी तर अशी
इच्छा आहे की हे युध्द टाळू शकत नाही तर झटपट होऊन
समाप्त होऊ दे."
दोन्ही कडून शंक फुंकले गेले. इकडून गंगापुत्र भीष्मांनी
आपला शंक फुंकला तर पांडव सैन्या कडून सेनापती
धृष्टद्युम्न ने आपला शंक फुंकला. त्यानंतर इतरांनी आपापले
शंक फुंकले. त्यानंतर दोन्ही कडील सैन्याना आदेश दिला गेला की आक्रमण त्याच वेळी हस्तिनापूरच्या राजभवन मध्ये
महाराज धृतराष्ट्र हे जाणून घेऊ इच्छित होते की पहिला बाण
कोणी चालवला. म्हणून त्यांनी मोठ्या उत्सुकता पूर्वक विचारले ," हे संजय आली नजर रणभूमीवर स्थिर ठेव आणि
तिथला प्रत्येक प्रसंग वर्णन करून सांग. त्या प्रमाणे संजय
म्हणाला ," महाराज दोन्ही सैन्या आक्रमण असे म्हणताच
एकमेकांना भिडली."
" मग मला सांग पहिला बाण कोणी कोणाला मारला ?
हे मला जाणून घ्यायचे आहे. मी युद्धाच्या परिणाला भीत नाही. मला एकाच गोष्टीची चिंता आहे उद्याचा इतिहास माझ्या मुलांना दोषी ठरवू नये." त्यावर संजय म्हणाला ," इतिहासा जवळ आपल्याला विचारण्यासारखे अनेक प्रश्न आहेत कोण कोणत्या प्रश्नांना उत्तरे देणारा आहात आपण ? जसे की लाक्षागृह , देश विभाजन , द्युतक्रीडा , कुलवधू वस्त्रहरण आणि आपला दूत बनून मीच तर गेलो होतो. आपण कोणता प्रश्न नाकारणार आहात ?"
" मला माझा इतिहास सांगू नकोस संजय मला तो माहीत
आहे, आणि ते सर्व आरोप मी भ्राता शकुनि आणि अंगराज
कर्ण ह्यांच्या वर ढकलू शकतो आणि युध्द होण्यास माझा
काही हात नाहीये. म्हणून आपली नजर रणभूमीवर केंद्रित कर आणि तेथे घडत असलेल्या प्रत्येक प्रसंगाचे वर्णन कर."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून संजय ने आपली
नजर रणभूमीच्या दिशेकडे वळविली.
दोन्ही कडून युद्धाला आरंभ झाला. पायदळ सैन्य पायदळी सैन्याशी लढत होते तर घोडदळ सैनिक घोडदळ
सैनिकाशी लढत होते , रथी रथीशी आणि महारथी महारथीशी लढत होते. घणघोर युध्द सुरू होते. तेवढ्यात
पितामहा च्या समोर अर्जुन आला त्याने आपला पहिला
बाण पितामहाना वंदन करण्यासाठी त्यांच्या रथा समोर
जमीनीत मारला नि वंदन केले. गंगापुत्र भीष्मांनी त्याला
आशीर्वाद देण्यासाठी आपला वरदहस्त वर केला नि विजयी
भव असा आशीर्वाद दिला. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली.
दोन्ही कडून असंख्य बाण एकमेकांवर सोडले जात होते.
तर दुसरीकडे आचार्य द्रोण आणि धृष्टद्युम्न यांच्या मध्ये
जुंपले. गांधार नरेश शकुनी सोबत सहदेव युध्द करत होता.
दुर्योधन शी भीमसेन युध्द करत होता. दु:शासन विरुध्द नकुल
युध्द करत होता. तुंबळ युध्द सुरू होते. बाणा वर बाण तर
गदा वर गदा भिडली होती. युधिष्ठीर नि कुलगुरु कृपाचार्य
यांच्या मध्ये युध्द जुंपले होते. घोड्यांच्या टापांनि आकाशात
धूळ उडत होती. अर्जुन आणि गंगापुत्र भीष्मांचे युध्द असे
जुंपले होते की पाहनाऱ्यांने नुसते ते पाहतच रहावे. युधिष्ठीर
युध्द करायचे सोडून त्या दोघांचे रण कौशल्य पाहून विचार
करू लागला की अर्जुनच्या बाणा ना सडेतोड उत्तर देणारे
पितामहां दुसऱ्या कोणा योद्धाला आवरतील असे वाटत नाही. एवढ्यात तेथे अर्जुन पुत्र अभिमन्यू आला त्याने आपल्या जेष्ठ तात ना चिंतीत पाहून विचारले ," काय झालं
जेष्ठ तातश्री ?" तेव्हा युधिष्ठीर उद्गारला ," पितामहांचे रण
कौशल्य पाहिल्यानंतर असं वाटत नाही हे युद्ध जिंकणे एवढे
सोपे नाहीये. तू जा जरा अर्जुनच्या मदतीला जा."
" जशी आपली आज्ञा !" असे म्हणून तो पितामहांच्या
रथाच्या दिशेने निघाला. जेव्हा त्याचा रथ पितामहांच्या रथा
समोर येताच एक बाण त्यांना वंदन करण्यासाठी सोडला.
आणि दोन्ही हात जोडून नमस्कार ही केला. तेव्हा गंगापुत्र
पुत्र भीष्मांनी त्याला आपला परिचय देण्यास सांगितले. तेव्हा
अभिमन्यू म्हणाला ," वसुदेव कृष्णाचा शिष्य आणि पितामहां
भीष्मांच्या नातू चा पुत्र अभिमन्यू. आपल्याला वंदन करत
आहे नि आपल्याशी युध्द करण्याची अनुमती मागत आहे
आणि आशीर्वाद ही मागत आहे." तेव्हा पितामहां भीष्म
म्हणाले ," हे वीरगती ला प्राप्त होण्याचे वय नाहीये तुझं वत्स !" तेव्हा अभिमन्यू उद्गारला ," वीरगतीला प्राप्त होण्याचे कोणतेही वय निर्धारित नसते पितामहां आणि जरी असले तरी माझे वय कदाचित झाले नसेल ही परंतु आपल्या
वयाने तर सर्व सीमा पार केल्या आहेत पितामहां आणि असा कोण वीर आहे की ज्याला आपल्या सारख्याशी युध्द
करण्याचे सौभाग्यच नको आहे , म्हणून पितामहा मी आपल्याशी युध्द करण्याची परवानगी ही मागत आहे आणि
आशीर्वाद ही मागत आहे." तेव्हा गंगापुत्र भीष्म उद्गारले," हे विधाता माझ्या समोर माझा प्रतिस्पर्धी म्हणून कोणा कोणाला
आणत आहेस ?" असे म्हणून ते पुढे म्हणाले ," सावधान वत्स !" आणि दोघांचे घणघोर युध्द सुरू झाले. गंगापुत्र भीष्मांच्या प्रत्येक बाणा चे उत्तर अभिमन्यू सडेतोड देऊ लागला. ते भयानक दृश्य पाहून संजय म्हणाला," हे महाराज
मला तर हे युद्ध पाहवत नाहीये."
" का ? का पाहवत नाहीये ? " परंतु संजय त्यांच्या प्रश्नाचे
काहीच उत्तर देत नाही म्हणून महाराज धृतराष्ट्रा ने विचारले,
" आपल्या सैन्या एवढ्यात मागे हटू लागली आहे का ?"
" नाही महाराज ."
" माझे सर्व पुत्र तर सुरक्षित आहेत ना ?"
" हां महाराज ."
" तातश्री तर वीरगती ला प्राप्त झाले नाहीत ना ?"
" नाही महाराज. त्याना तर इच्छामृत्यूचे वरदान आहे त्याना
कोण मारू शकतो ? शिवाय हस्तिनापूर चोहीकडून सुरक्षित
दिसत नाही तोपर्यंत ते आपला प्राण पण त्यागू शकत नाही."
" मग काय अडचण काय आहे ते सांग ना ?"
" गंगापुत्र भीष्म आणि अर्जुन पुत्र अभिमन्यू या दोघांचे
युध्द सुरू आहे. ज्याचे हात त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी
पुढे यायला हवे होते. त्या हाताने धनुष्य पकडले आहे
आणि ज्यांचा हात आशीर्वाद देण्यासाठी उठायला हवा. त्या
हातात धनुष्य आहे. भरवंशीच्या वृद्धांना आणि तरुण , बालक जखमी झाले आहेत. परंतु रक्ताचे पाट तर भरतवंशाचे वाहणार ना ?"
" शूरवीरांचे रक्त तर वाचण्यासाठी असते संजय आणि
घाव तर त्यांच्या साठी पारितोषिक असते. जस जशा जखमा वाढत जातील तस तसा त्यांचा उत्साह वाढतच जातो. म्हणून तू आपली नजर कुरुक्षेत्रा कडेच केंद्रित कर आणि
माझ्या पुत्रा विषयी मला माहिती देत रहा. पण सर्वात अगोदर
मला दु:शासन ची माहिती दे. कारण कुंती पुत्र भीमाने केलेली
प्रतिज्ञा मी विसरलो नाहीये. त्याच्या प्रतिज्ञेचे स्वर माझ्या
कानात अजूनही आवाज करत आहेत."
" जशी आपली आज्ञा महाराज." असे म्हणून संजय ने
आपली नजर कुरुक्षेत्राकडे वळविली. आणि क्षणभर वेळाने
ते म्हणाले ," हे महाराज या क्षणी तर राजकुमार दु:शासन
माद्री नंदन नकुल बरोबर युध्द करत आहे." एकीकडे अर्जुन
कौरव सैन्याचा फडशा पाडत होता. तर दुसरीकडे आचार्य
द्रोण , कृपाचार्य , अश्वत्थामा, पांडव सैन्याचा फडश्या पाडत
होते. भीम आपल्या गदे ने एकेकाला लोळवित होता. सेनापती धृष्टद्युम्न ही आपल्या बाणांनी कौरव सैन्याला ठार मारत होता एकंदरीत युध्दाला भयंकर रूप आले होते. कित्येक जण मृत्युमुखी पडत होते तर कित्येक जण जखमी आणि घायाळ झाले होते. गंगापुत्र भीष्म आणि अर्जुन पुत्र अभिमन्यू यांचे युध्द तर बघण्या सारखेच होते. शेवटी पितामहा भीष्मांनी भयंकर शक्तिशाली बाण अभिमन्यू वर सोडले. त्यात अभिमन्यू जखमी तर झालाच. परंतु यत्किंचितही विचलीत न होता त्याने एक शक्तिशाली बाण पितामहा वर सोडला. तो बाण त्यांच्या छातीला लागला. तेव्हा त्यांनी अभिमन्यूची प्रशंसा करत म्हंटले ," आयुष्यमान भव ! भरतवंशी अर्जुन प्रमाणे तुझा ही सदैव गौरव करील वत्स ! माझी वृध्द छाती तुझ्या बाणांनी तुप्त झाली. धन्य आहे तो वंश ज्या वंशा मध्ये तुझ्या सारख्या वीर बालकाने जन्म घेतला. परंतु तुझ्या नि माझ्या लढाई ने काहीच सिद्ध होणार नाही. मी तुझा प्राण घेऊ शकत नाही आणि तू माझा प्राण घेऊ शकत नाहीस. म्हणून आपला रथ दुसरीकडे कुठंतरी घेऊन जा."
" क्षमा करा पितामहा मी इथून दुसरीकडे कुठे जाण्यासाठी नाही आलोय तर आपल्याला रोखण्यासाठी आलोय."
" तुझ्या रोखण्याने मी रोखला जाणार नाही वत्स !" असे
म्हणून आपल्या सारथी उद्देशून म्हणाले," सारथी रथ पुढे घे."
सारथी ने रथ पुढे हाकललेला पाहून अभिमन्यू ने असा बाण
आकाशाच्या दिशेने सोडला. त्या बाणाने असंख्य बाणांची
भिंत तयार होऊन गंगापुत्र भीष्मांचा रथ रोखला. तेव्हा पितामहानी मोठ्या ने अर्जुन ला हाक मारून सांगितले की
आपल्या पुत्राला इथून घेऊन जा तो माझा मार्ग आडवत
आहे." ते पाहून दुर्योधन मोठ्या ने ओरडला की पितामहा
आपण माझे सेनापती आहात का त्या पांडवांचे ? "असे
म्हणून तो आपल्या सारथी ला उद्देशून म्हणाला," सारथी
रथ पितामहा च्या जवळ घेऊन चल." तेव्हा गंगापुत्र भीष्म
अभिमन्यू ला उद्देशून म्हणाले ," बस्स कर वत्स मी तुझ्या
मृत्यूचे कारण बनू इच्छित नाही.आज जर हस्तिनापूर चारही
दिशानी सुरक्षित असते तर आज तुझ्याच बाणांच्या टोकावर
मी आपले प्राण दिले असते. तुझा पराक्रम अतुलनीय आहे
वत्स ! " तेवढ्यात दुर्योधन तेथे आला नि म्हणाला," हस्तिनापूरच्या सुरक्षेसाठी मी ह्या असभ्य बालकाला मृत्यूक्षयी पाठवितो." तेव्हा अभिमन्यू उद्गारला ," या काकाश्री
मी आपलीच वाट पाहत होतो. आपण माझ्या वडीलधाऱ्याचे
ऋणी आहात म्हणून मी आपला वध करणार नाही."
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा