महाभारत ८१ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत ८१ |
महाभारत ८१
कुंती विदूरच्या कुटीत राहात असल्यामुळे गांधारी स्वतः
तिला भेटायला जाते.त्यावेळी प्रथम इकडच्या तिकडच्या चर्चा सुरू होतात तेव्हा इतकी वर्षे म्हणजे तब्बल बारा वर्षे
कुंती हस्तिनापूरला गांधारी ला भेटायला जात नाही म्हणून
गांधारी तिच्या वर फार नाराज असते. ती नाराजी पुढील चर्चेत जाहीर करते. परंतु त्या अगोदर पांडवांचा बारा वर्षाचा वनवास समाप्त झाला नि तेरावे वर्ष म्हणजे अज्ञातवास देखील पूर्ण होऊन पांडव पुन्हा हस्तिनापूरला येतील आणि
आपला राजमुकुट घेऊन इंद्रप्रस्थाला जातील. तेव्हाच मला
शांती लाभेल. अशी आशा व्यक्त करत त्या पुढे म्हणाल्या,
आणि खरं सांगू मला त्या दिवसाचा फार अभिमान वाटतो ज्या दिवशी मी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. नाहीतर
विष पिऊन मला आत्महत्या करायला लागली असती असे
घृणात्मक दुष्कृत्य माझ्या मुलांनी केले. त्या बद्दल मला स्वतःला त्यांची आई म्हणून घ्यायला सुध्दा लाज वाटते."
" जे काही झाले त्यात आपला दोष नव्हता ताई मग
आपण का वाईट वाटून घेता ? आणि ज्यांनी हे केले त्याना
त्या बद्दल अजिबात खेद नाहीये."
" ते काही असले तरी मी दोषी ठरते आणि तू जरी बोलून
दाखवीत नसलीस तरी मला चांगले माहीत आहे की तू सुद्धा
मला दोषी मानतेस आणि तसं जर नसतं तर या बारा वर्षांत
एकदा पण आपल्या ताईला भेटावे असे कधीच नाही वाटलं का ? "
" वाटलं खूप परंतु मनात इच्छा असूनही माझी पाऊल
आपल्या कक्षेच्या दिशेने वळली नाहीत. त्याचे मुख्य कारण
म्हणजे प्रणाम करणे म्हणजे त्या बदल्यात आशीर्वाद मिळविणे होय. मला काय आशीर्वाद दिला असता तू ताई ?
मला दिलेला तू प्रत्येक आशीर्वाद दुर्योधन साठी शाप बनला असता. आणि मुळात मला तेच नको होतं, कारण मी सुध्दा
दुर्योधनाची आईच आहे मी त्याला माझ्या मुलांपेक्षा कधी
कमी स्नेह दिलं नाही तर मग तुझ्या कडून आशीर्वाद घेऊन
त्याला मी कशी शापित होऊ देईन ? कारण आईचा शाप
तिच्या आशीर्वाद पेक्षा अधिक शक्तिशाली असतो. मी तर
महादेवा जवळ हीच प्रार्थना करतेय की आम्ही दोन्ही आईच्या
ममतेची लाज राखावी हीच त्या ईश्वर कडे प्रार्थना !"
तेवढ्यात विदूरची पत्नी फळ आहार घेऊन येते त्या दोघींच्या समोर ठेवते. तेव्हा महाराणी गांधारी तिला उद्देधून
म्हणाली ," तू आम्हां दोघी जवळ येऊन का बसत नाहीयेस
सुलभा ? तू पण तर आम्हां दोघी प्रमाणे हस्तिनापूर आणि
इंद्रप्रस्थाची भागीदारिणी आहेस. " त्यावर सुलभा म्हणाली,
तराजू ला दोनच पारडे असतात महाराणी !"
" परंतु मध्य बाण तर तूच आहेस.जर मध्य बाण नसेल तर
कोणत्या पारड्यात वजन जास्त आहे हे कसे कळणार ?"
" आज हस्तिनापूर मध्ये वक्तव्याला मर्यादा राहिली नाही
महाराणी आज तर सर्वजण निष्ठा आणि अनिष्ठा सीमेवर
उभे आहेत. कोठे जावे ह्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीये."
" जर हस्तिनापूर ने तुला हा प्रश्न केला तर काय उत्तर देशील ?"
" हस्तिनापूर आपल्या नगरातील स्त्रियांना हा सन्मान देत
नाहीत महाराणी जर असं असतं तर युधिष्ठिर ने द्रौपदी ला
डावावर लावली नसती आणि दुर्योधनाने द्रौपदीच्या वस्त्रहरण
चा आदेश दिला नसता. म्हणून आपण निश्चिंत रहा हस्तिनापूर हा प्रश्न आपल्याला अथवा मला कदापि विचार
नाहीये." सुलभा उद्गारली. त्यावर महाराणी तिची प्रशंसा करत
म्हणाली ," तू सुध्दा विदुर प्रमाणेच कटू सत्य बोलण्यात निपुण आहेस.म्हणून मी तुला एक प्रश्न विचारते की तू जर
माझ्या जागी असतीस तर काय केलं असतं ?"
" मी ही तेच केलं असतं जे आपण केलात महाराणी मी
सुध्दा दुर्योधनला म्हणाली असती की, पुढे ये नि माझंही
वस्त्रहरण कर."
" मग काय तू त्याला शाप दिला असतेस ?"
" शाप कोणत्याही समस्या चे समाधान नाहीये ताई शाप
देण्याचा अर्थ तर असा होतो ना की शाप देणाऱ्याने परिस्थितीशी हार मानली. म्हणून आपण हार मानू नका. आपणच तराजू आहात नि आपणच वाटपी आहात.जोपर्यंत
दोन्ही पारडे समान होत नाहीत जसे की दुर्योधनाचे भविष्य
दुर्योधनाला द्या नि युधिष्ठिरचे भाग्य युधिष्ठिरला द्या. बस्स !"
" परंतु याचा काही उपाय असेल तर सांग ना कुंती. मला
तर दोघांचे ही भविष्य अंधःकारमय मध्ये आहे असेच वाटते."
गांधारी म्हणाली. त्यानंतर दुःखी अंतकरणाने ती आपल्या
महाली आली आणि तिने महाराज धृतराष्ट्राशी या विषयी
चर्चा केली तेव्हा महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," तुला असं तर
वाटत नाही ना की मी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडत नाहीये." परंतु त्यावर महाराणी गांधारी काहीच बोलली नाही
याचा अर्थ महाराज धृतराष्ट्रा समजून गेले की महाराणी ना ही
वाटते की आपण आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडीत नाहीये.
असा विचार करून ते म्हणाले ," तू माझ्या प्रश्नाचे उत्तर जरी
दिले नाहीस तरी मला ठाऊक आहे की तुझे म्हणणे काय
आहे ते आणि कदाचित तुझे म्हणणे रास्त ही आहे .परंतु तूच
मला सांग मी तरी काय करू ? कोणताही वृक्ष आपल्या
फळांशी नाराज राहू शकत नाही ना ? नागवेल च्या वेली वर
चमेलीची फुले तर नाही येणार ना ? दुर्योधन माझ्या नेत्रहीन उच्चकांक्षेचा हा परिणाम आहे. तो माझ्या स्वप्नाच्या धनुष्यातून सुटलेला बाण आहे , त्याला मी माघारी घेऊ शकत
नाही. म्हणून तुही देवा जवळ प्रार्थना कर की पांडव आपल्या
अज्ञातवास मध्ये यशव्ही होऊ नये."
" हे आपण काय बोलत आहात आर्यपूत्र ?"
" आपली लाचारी मान्य केल्याने कर्तव्याचा भार थोडा
कमी होतो प्रिय गांधारी आणि जगणे सोपे होते."
रात्री झोपले असता त्यांच्या स्वप्नात शंकूतला पुत्र भरत
येतात नि धृतराष्ट्रा कडे न्याय मागतात.तेव्हा महाराज भरतचे
नाव ऐकून उठण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा महाराज
भरत त्याना न उठण्याचा संकेत म्हणाले ," बसून रहा पुत्र तू
वर्तमान आहेस नि वर्तमानला फक्त भविष्यासाठी उठायला
पाहिजे. जर तू त्याच्यासाठी उठला नाहीस तर तो स्वतःच
उठवेल. मी तुझा आता भूतकाळ वर्तमान साठी मी माझे
स्थान खाली करून दिले आहे. मी फक्त एवढंच सांगायला
आलोय पुत्र ही राजसभा म्हणजे तुझ्या ऊच्चंकाक्षा चे घर
नाहीये. हे तुझे तपोवन आहे, राजनीती तुझी तपश्या आहे,
म्हणून सिंहासन वर बसून रहा. कारण आज तुझा पूर्वज
तुझ्यापाशी न्याय मागायला आला आहे."
" न्याय परंतु मी आपल्या सोबत कसा अन्याय करू शकतो ? आपण तर माझे पूर्वज आहात आणि वर्तमान
आपल्या भूतपूर्व लोकांवर अन्याय कसा करू शकतो ?"
" तुला असं तर म्हणायचं नाही ना की तू वर्तमान असल्याने तुझा भूतकाळाशी काही देणं घेणं नाहीये.पण जेव्हा भविष्य वर्तमान बनेल तेव्हा तू भूतकाळात जमा झालेला असशील. तुझ्या वक्तव्याचे तात्पर्य हे की वर्तमान भूत आणि भविष्य दोन्हीच्या समोर जबाबदार नाही.परंतु
हे सत्य नाहीये. वर्तमान केव्हाही भूतकाळाचा उत्तर अधिकारी असतो नरेश म्हणून मला तुला प्रश्न करण्याचा
अधिकार आहे."
" परंतु तातश्री ....?
" तातश्री नाही वत्स तू एक राजा आहेस आणि एक वादी
म्हणून माझे म्हणणे ऐकून घ्या. आणि मला न्याय द्या. आज
ज्या सिंहासन वर बसला आहेस त्या सिंहासनांवर कधी मी
बसत असे महाराज माझ्यावर मोठा अत्याचार झाला आहे."
" अत्याचार ....कोणी केला आपल्यावर अत्याचार ?"
" स्वतः महाराज ने."
" मी आणि तो कसा ?"
" तू कसा राजा आहेस ? ज्या जीवन मूल्यांची सुरक्षा
करण्याचे काम तुझं आहे ते करायचे सोडून त्याना आपल्या
पायदळी तुडवितो आहे आणि ते सुध्दा केवळ आपली
उच्चकांक्षा पूर्ण करण्यासाठी ! तू हे कसे विसरलास धृतराष्ट्र
की मी स्वतः आपल्या पुत्रांना राजमुकुटच्या योग्य न पाहून राजा न बनविता भरतद्वाजपुत्र भूमन्यू ला राजा बनविले.
आणि तू आपल्या अयोग्य पुत्राला राजा बनविण्यासाठी
आपल्या धाकट्या बंधूंच्या पुत्रावर अर्थात युधिष्ठिरवर अन्याय
केलास.आणि तुला असे करताना लाज सुध्दा वाटली नाही.
हस्तिनापूर नरेश माझी फिर्याद पण ऐकून घे.आणि शक्य असेल माझ्या बरोबर न्याय कर.नाहीतर मला असं वाटेल की माझ्या एका वंशाने मला नि सिंहासनाला अपमानीत केलं.
आपल्या पुत्र मोहामध्ये आपल्याच धाकट्या बंधूंच्या पुत्राशी
कपट केलं. त्याने आपल्या भरलेल्या राजसभे मध्ये आपल्याच कुलवधू चे वस्त्रहरण करण्याची आपल्या मौनद्वारे आपली सहमती दर्शविली. हे हस्तिनापूर नरेश तुझ्या पुत्राने माझ्या वंशाला कलंकित केलं म्हणून त्याला दंड दे.तेव्हाच
माझ्याशी न्याय केल्या सारखे होईल." त्यावर महाराज धृतराष्ट्र म्हणाले ," परंतु मी माझ्या पुत्राला अयोग्य मानत नाही. मी स्वर्गीय महाराज विचित्रविर चा जेष्ठ पुत्र आहे आणि
दुर्योधन माझा जेष्ठ पुत्र आहे या नात्याने तो योग्य आहे की
माझ्या नंतर ह्या सिंहासनांवर सर्वांत प्रथम त्याचा अधिकार
आहे. आणि वर्तमान आपल्या पूर्वजांच्या सिद्धांताच्या
आधारावर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.आपले युगात
योग्यतेची परिभाषा वेगळी असेल ही म्हणून मी असं कदापि म्हणणार नाही की आपण त्यावेळी घेतलेला निर्णय चुकीचा
होता.परंतु मी एवढं अवश्य सांगू शकतो की आपले युग वेगळे नि माझे युग वेगळे आहे अर्थात माझ्या युगात मीच
निर्णय घेणार.म्हणून मी आपली क्षमा मागतो.मी आपला
अपराधी नाहीये. आणि असलोच तर आपली ही दुःखभरी
कहाणी घेऊन आपलेच वंशज स्वर्गीय महाराज शंतनू जवळ
जा.ज्यांनी स्त्री मोहात पडून आपल्याच पुत्राचा अधिकार
काढून घेऊन आपल्या दुसऱ्या मुलाला देऊ केला तो त्यावेळी
जन्मला सुध्दा नव्हता. " तेवढ्यात दुसरा आवाज उमटला.
महाराज शंतनू आणि भीष्म दोघांची छायाकृती दिसू लागताच
महाराज भरत ची छायाकृती अदृश्य झाली.
" खोटे बोलू नकोस धृतराष्ट्र खोटे बोलू नकोस. महाराज
बनून विचार माझ्या पुत्राला की तू जो आताच माझ्यावर आरोप केलास तो किती निराधार आहे.मी सत्यवती च्या वियोग मध्ये भले ही आपला प्राण त्याग केला असता.परंतु
आपला पुत्र आणि हस्तिनापूर यांच्याशी एवढा मोठा अन्याय
केला नसता.परंतु तू नीतिमत्ता सोडलीस धृतराष्ट्र आणि या
अपराधा साठी तुला भरतवंश आणि भारतवर्ष कधी तुला
क्षमा नाही करणार ,तू आपल्या पुत्राची तुलना माझ्या पुत्राशी
केलीस.माझ्या पुत्राने आपल्या पित्याच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला.अश्या महान पुत्राशी तू आपल्या पुत्राची तुलना करतोस. ज्याने भरतवंशी ना कलंकित केलं.आणि आज हस्तिनापूरला जे काही होत आहे
त्याला सर्वस्व तू जबाबदार आहेस.मी हस्तिनापूर आणि पुत्र
भीष्मांला अपमानीत केल्या बद्दल मी तुला कदापि क्षमा करणार नाही. " तेव्हा धृतराष्ट्र म्हणाले ," मी काय करू ?
दुर्योधन माझा पुत्र आहे मी त्याचा कसा त्याग करू ? मला
शक्य नाही ते. मला शक्य नाही, मला शक्य नाही असे झोपेतच बडबडत असतात. तेव्हा त्यांच्या शेजारी झोपलेली गांधारी उठून त्याना जागे करत म्हणाली ," आर्यपूत्र आपण
स्वप्न तर नाही ना पाहिलं ?"
" माहीत नाही ते स्वप्न होतं का सत्य ? परंतु जे काही होतं
ते फार भयानक होतं ते म्हणत होतं नाही ते मला आदेश देत
होते की दुर्योधन शरीराचा सडलेला एक भागा प्रमाणे आहे त्याला कापून फेकून द्या."
" असे कोण म्हणतं होते ?"
" माझे पूर्वज ! गांधारी आता तूच सांग. मी खरंच आपल्या
धाकट्या भावाच्या मुलां बरोबर अन्याय केला का ? मी
माझ्या राज्यातील अर्धे राज्य त्याना दिलं नव्हतं का ? ते राज्य ते स्वतःच द्युतक्रीडेत हरले. त्यात माझा दोष आहे का
काही ? जो राजा आपल्या बंधूंना आणि पत्नीला ही द्युत
मध्ये हरतो.त्याला राजा बनण्याचा अधिकारच नाहीये."
" ते हरले नव्हते आर्यपूत्र त्याना कपट द्वारे हरविले गेले
होते."
" मानलं की त्याना कपट द्वारे हरविले गेले. पण तरी
देखील आपली संपत्ती , आपला राजमुकुट , आपल्या धाकट्या बंधूंना , आणि पत्नीला सुध्दा स्वतः युधिष्ठिर ने
डावावर लावले होते ना , मग त्याचा दंड दुर्योधन ने का
भोगावा ?"
" दुर्योधनाचा संकल्प कुलहीन नव्हता म्हणून त्याने सुध्दा
दंड भोगायलाच पाहिजे."
" म्हणजे तुला काय म्हणायचं पांडवांचा काहीच दोष नव्हता."
" होता ना पांडवांचा दोष पण होता. परंतु ते आपल्या
अपराधाचे प्रायश्चित्त भोगत आहेत आर्यपूत्र जर आपल्याला
खरोखरच वाटतं की दुर्योधनाचे भले व्हावे तर प्रिय पांडवांना
हस्तिनापूरला बोलवून घ्या. आणि त्याना आशीर्वाद देऊन
इंद्रप्रस्थाला रवाना करा माझी खात्री आहे, पांडव सर्वकाही
विसरून दुर्योधनाला क्षमा करतील."
" आता हे शक्य नाहीये गांधारी ! कारण मी जर असं केलं
तर दुर्योधन म्हणेल की पांडवांचा अज्ञातवास भंग झाला.
अर्थात त्यांनी पुन्हा बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा
अज्ञातवास स्वीकारावा."
" आपण राजा नि पिता होण्याच्या नात्याने त्याला आदेश
देवू शकता."
" परंतु हा नेत्रहीन धृतराष्ट्र त्याना शोधायला कुठं जाईल
बरं ? कारण ते लोक आपले अज्ञातवासाचे हे वर्ष कुठे नि कोणत्या रुपात घालवत आहेत हे कोणाला माहीत आहे ?"
त्यावर गांधारी काहीच बोलली नाही.कारण कोणालाच
माहीत कुठे आहेत नि कोणत्या रुपात वावरत आहेत.
पांडवांनी अज्ञातवासासाठी मत्स देश निवडला होता. कारण मत्स देशाचा राजा विराट नरेश पांडवांचा शत्रू पण
नव्हता. म्हणून एक एक करून महाराज विराट राज्यात
पोहोचले. युधिष्ठिर स्वतःला कंक सांगून राजाचा दरबारी
बनला.भीम बल्लव हे नाव धारण करून स्वयंपाकी बनला.
अर्जुन बृहन्नला नाव धारण करून उत्तरा ला नृत्य आणि संगीत शिकवायला लागला. नकुल ने घोडेस्वारी सांभाळली.
आणि सहदेव ने गोशाळा सांभाळली. आणि द्रौपदी सैरंधी
बनून राणी सुदेष्णा चे शृंगार करण्याचा काम स्वीकारले.
एके दिवशी राणी सुदेष्णा चे केश द्रौपदी विचारत होती
तेव्हा राणी सुदेष्णा ने विचारले ," तू तर शृंगार कला मध्ये
निपुण होतीस ना सैरंधी तुझ्यावर तर द्रौपदी खुश असेल ना ?
" मी आता त्यांची आठवण काढत नाही महाराणी !"
" हां मी समजू शकते, त्यांची आठवण काढून तरी काय
फायदा नाही का ? पण मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की
जे कधी युध्दा मध्ये कधी न हरणारे आपल्या संपत्ती ,भाऊ, आणि द्रौपदी ला सुध्दा हरले."
" जर सम्राट युधिष्ठिर हे सर्व हरले नसते तर लोकांना उपदेश कसा मिळाला असता की द्युत किती अशुभ नि खोटा
आणि विनाशकारी असतो."
" हे तर बरोबर बोललीस तू सैरंधी मी महाराजाना किती
वेळा सांगितले असेल सारीपाटाचा खेळ चांगला नाहीये खेळू
नका. तर ते म्हणतात धनुष्य आणि सारीपाट हे खेळाच तर क्षत्रियांची खरी ओळख आहे, आणि एक दिवस मी जास्तच
हट्ट धरला तर महाराज मला म्हणाले , की मी तुला वचन देतो
की मी तुला कधी ही डावावर लावणार नाहीये. आणि आता
तर महाराजाना कंक मिळाला आहे बस दिवसरात्र त्याच्याशीच खेळत बसतात. माझ्या बधुंला ईश्वर मोठे आयु
देऊ दे. कारण त्याच्या मुळेच आज हे राज्य वाचलं आहे. ह्या
कंक ला सम्राट महाराज युधिष्ठिर ना जास्त प्रिय होता का हा
तू पाहिलं असशील ना ? "त्यावर सैरंधी म्हणाली ," महाराजांचे प्राण त्यांच्या धाकट्या बंधू मध्येच बसले आहेत
अन्य कोणामध्ये नाहीत."
" ही तर फार चांगली गोष्ट आहे , पण मला एक सांग
द्रौपदी वरून त्या पाच पांडवा मध्ये काही वादविवाद झाला
नाही."
" ते पाचजण जरून आहेत. पण त्याच्यात वास्तव्य करणारा आत्मा एकच आहे त्यामुळे त्याच्यात वाद होण्याची
शक्यताच नाहीये."
" ही तर मोठी आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि तू म्हणतेस
ते जर खरं असेल तर महाराणी द्रौपदी फार आदरणीय आहे.
त्यांनी अवश्य त्या पाच जणांना मोहोनी गुटी खायला घातली
असेल.आणि दिसायला पण फार सूंदर असेल हो ना ? जरा
तिच्या सौंदर्याचे वर्णन तर कर." तेवढ्यात तेथे उत्तरा खिदळत आली .तिला तसे खिदळताना पाहून महाराणी
सुदेष्णा म्हणाली ," उत्तरा तू हरण नाहीयेस कन्या आहेस तुला बृहन्नला ने तुला मुलीच्या जातीने कसे चालायचे असते
हे शिकविले नाही का ?"
" क्षमा असावी मातोश्री !"
" बृहन्नला खरंच नृत्य आणि संगीत शास्त्रात निपुण आहे सैरंधी ? "
" आपण स्वतःच विचार करा महाराणी संगीत गायन
आणि नृत्याचे शिक्षण दिले ते स्वतः कसे असतील ? त्यांच्या
पखवाज चा आवाज इंद्रालोंकापर्यंत जातो नि तिथल्या
अप्सरा नृत्य करायला लागतात."
बृहन्नला पकवाज वाजत असते नि उत्तरा त्या तालावर नृत्य
करत असते. धनक धिंन धा . धनक धिन धा .... थांब.उत्तरा
असा नाही नृत्य करत असताना त्याचे हावभाव डोळे , भुवया आणि बोटां मध्ये दिसून येणे आवश्यक आहे.नृत्य पाहणाऱ्या डोळ्यांना कान बनविण्याची कला आहे राजकुमारीजी काही न सांगता समोरच्या डोळ्यांना कळलं पाहिजे नृत्याची भाषा !
म्हणून नृत्य हा मनोरंजनाचे साधन नाहीये. नृत्य सभ्यताची
तपस्या आहे, म्हणून साधना करा ,तपस्या करा मला बघ
नृत्य करताना असे म्हणून बृहन्नला नृत्य करून दाखवितो.
ता तय तक धिक धा... आता तू करू दाखवा बरं."
उत्तरा नृत्य करत असताना तेथे सैरंधी येते नि उत्तराला सांगते
की महाराणी ने आपल्याला बोलविले आहे."
" मी जाऊन येते." असे म्हणून उत्तरा तेथून निघून गेली.
" ये सैरंधी ...पांचाली आपल्या डोळ्यातील काजळ पुसून
टाक पांचाली."
" माझ्या डोळ्यात कसलाच रंग आता राहीलाच नाहीये.
कारण माझ्या मुळे तुम्हां सर्वांची ही अवस्था झाली आहे.माझ्याने ती पाहवत नाहीये. सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन
बृहन्नला बनून पकवाज वाजवत आहे, सर्वश्रेष्ठ गदाधर भीम
स्वयंपाकी बनले आहेत तर सम्राट युधिष्ठिर कंक बनले आहेत."
" परिस्थिती वर रडणे तुला शोभत नाहीये पांचाली. हे
आपल्या परीक्षाचे दिवस आहेत.ह्यांना ना माझे बाण छेद करू शकत नाही नकुल सहदेवची तलवार कापू शकत आणि
नाही मोठ्या दादाचा भाला छेदू शकत नाही माजल्या दादाची
गदा तोडू शकत पांचाली जशी बारा वर्षाचा वनवास संपला
तसे हे एक वर्षाचा अज्ञातवासाचे वर्ष ही संपेल. महाराणी
सुदेष्णाचा स्वभाव चांगला नाही का ? "
" असं नाहीये. ती सदैव पंडांवाच्या च विषयी बोलत असते ."
" आणि खास करून तुझ्या सौंदर्या बद्दल बोलत असेल.
कारण सूंदर स्त्री च्या विषयी बोलणे हा स्त्रियांचा जन्म सिध्द
अधिकार आहे तू एके दिवशी तू तिला सांगूनच टाक की
इंद्रप्रस्थाची पट्टराणी दिसायला कशी आहे ? पण नको सांगूस
का माहितेय जर तू तिला सांगितलंस तर ती तुझा हेवा करू
लागेल म्हणजे सर्वांत सूंदर स्त्री च्या सेवेला तू होतीस.हे
ऐकून तिच्या मनात मत्सर निर्माण होईल." त्यावर द्रौपदी
म्हणाली ," अश्या कठीण प्रसंगी तुम्हांला मस्करी कशी सुचते
ह्याचेच मला आश्चर्य वाटते."
" संकटात ही हसले पाहीजे आणि खरं सांगायचं तर
दुःखच मनुष्याचा खरा साथीदार आहे सुख काय येते नि जाते त्यामुळे दुःखात हसले पाहिजे.जरा विचार कर दुर्योधन
आम्हा लोकांचा शोध घेण्यासाठी किती आटापिटा करत असेल. आणि शकुनिमामा ची तर झोपच उडाली असेल."
" मी त्या विषयी अजिबात विचार करू इच्छित नाही. कारण ज्या ज्या वेळी मी विचार करू लागते त्या त्या वेळी
माझ्या तळ पायाची आग मस्तकाला भिडू लागते. नि मग
माझे हे मोकळे केस माझ्या गळ्याचा फाश बनू लागतात."
त्यावर अर्जुन काहीच बोलला नाही.परंतु दुर्योधन या क्षणी काय करत असेल हा विचार त्याच्या मनातून काही केल्या
जात नव्हता.आणि खरेच होते ते. दुर्योधन एकदम बेचैन होता.कारण हस्तिनापूरचे सर्व गुप्तहेर असफल झाले होते.
तो चिडून म्हणाला ," तुम्ही सर्वजण हस्तिनापूरचेच गुप्तहेर
आहात ना ? तुम्हां लोकांना पांडव कोठे लपून बसले आहेत
याचा पत्ता लावू शकले नाहीत.काय उपयोग आहे तुम्हां लोकांचा ? मला तर वाटतं की तुम्हां सर्वांना एका रांगेत उभे
करून तुम्हां सर्वांचा शिरच्छेद करावा. परंतु अजून एक
संधि देतो मी तुम्हांला हे वर्ष संपण्या पूर्वी जर तुम्ही लोकांनी
पांडवांचा शोध घेतला नाही तर तुम्हां पैकी कोणाला ही
जीवदान मिळणार नाही. जा नि शोध घ्या." असे म्हणताच
सर्व गुप्तहेर निमूटपणे तेथून निघून गेले.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा