महाभारत -२४ | मराठी स्टोरी, मराठी कथा, मराठी शॉट स्टोरी, दिवाळी संग्रह | महेंद्रनाथ प्रभु.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाभारत -२४ |
२४
महाभारत -२४
कुंती आपल्या मुलांना परमेश्वराचे नाव घेऊन झोपायला
सांगते. आईची आज्ञा शिरसावंद्य असे मानून भीम सोडून बाकीचे भाऊ झोपी जातात.परंतु भीम काही झोपत नाही.तो
बसून आपल्याच विचारात मग्न असतो, म्हणून युधिष्ठिर
उठून बसत बोलला ," प्रिय भीम आईने झोपायला सांगितले
आहे आपल्याला." त्यावर भीम उद्गारला ," कसा झोपू मला
झोपत येत नाहीये."
" झोप न येण्याचे कारण ?"
" ते काही विचारू नकोस तू मला ."
" म्हणजे ?"
" अरे दादा, तो दुर्योधन पाहिलास ना ,आपल्याशी कसा
वागतोय तो. असं वाटतं की सरळ त्याची मानगुटी पकडून
त्याला जमीन आणि आसमानचे दर्शन एकदम घडवावे."
" अनुज असं आपल्या बंधू विषयी बोलू नये."
" बंधूं कुणाचा बंधू ? "
" कुणाचा म्हणजे ? आपल्या सर्वांचा !"
" भाऊ ....त्याला कोण भाऊ म्हणेल ! भावा सारखा वागतो तो नेहमी माझ्याशी वाद घालत असतो."
" अरे एकदा भाऊ खट्याळ स्वभावाचा असतो तर त्याला आपण माफ करायला शिकलं पाहिजे.तुला माहितेय माफ़ी
सारखे मोठे अस्त्र नाही दुसरे. आणि त्याची तोड पण कुणा पाशी नाही. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपल्या आईला काय
वाटेल याचा अगोदर विचार कर."
" हूं आईमुळेच गप्प बसावं लागतं मला."
" मग तसाच गप्प रहा नि झोप आता."
" तू पण आई सारखाच आहेस. मलाच गप्प करतोयस."
असे म्हणून बळेबळेच झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
गांधारी आपल्या दासीचा हात धरून कुंतीच्या कक्षे
जवळ आली. कुंती झोपण्याची तयारी करतच होती एवढ्यात
तेथे गांधारी आली. गांधारी ला पाहून कुंती स्वतः तिच्या स्वागता करता आपल्या कक्षेतून बाहेर आली नि तिला नमस्कार केला. तेव्हा गांधारी उद्गारली ," त्याची काहीही आवश्यकता नाही." तेव्हा कुंती उद्गारली ,' आवश्यकता कशी
नाही.लहानाना मोठ्यांच्या आशिर्वादाची सतत गरज असते.
शिवाय तो त्यांचा अधिकार सुध्दा आहे. परंतु ताई ,काही काम होतं तर मला बोलावयाचे होते ना , आपण माझ्याकडे
येण्याचे कष्ट का घेतले ?" गांधारी उत्तरली ," माझं काही काम नव्हतं तुझ्याकडे ,मी अशीच आली चौकशी करायला ?"
" चौकशी ....कशाची बरं ?"
" हीच की तुला कोणत्या गोष्टीची कमतरता तर नाही ?"
" काय ताई, मी कुणी पाहुनी आहे का ? आपल्याच घरात
कसली आलीय कमतरता ? आणि असलीच तर आपणच
एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे नाही का ?"
" तुझ्या सारखी समजदार जाऊ मिळाली हे मी माझे
भाग्य समजते."
" बरं ते जाऊ दे,आपण आंत चला.मग बसून निवांत बोलू!" गांधारी चा हात धरून तिला सावकाशपणे आंत नेऊन
एका आसनावर बसविले तेव्हा ती दुर्योधनच्या दुराचारा विषयी चिंता व्यक्त करते. आणि त्याला चितविणाऱ्या आपल्या बंधू विषयही चिंता व्यक्त करते. तर दुसरीकडे शकुनी आपल्या भाच्याला म्हणजे दुर्योधनला सोबत घेऊन
महाराज धृतराष्ट्राच्या कक्षेत गेला. तेव्हा प्रवेश करता करता हस्तिनापूर नरेश महाराज ची जय हो !" तो आपल्या मेहुण्याला अनेक प्रकारे समजावून सांगतो की आपण आपल्या पुत्रावर अन्याय करत आहात. आपले नाव तर
भारतवर्ष च्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिले जाईल.
परंतु मी आपल्या प्रिय भाच्या सोबत अन्याय होऊ देणार नाही." त्यावर महाराज धृतराष्ट्र उद्गारले ," मग काय मी कुंतीला हे सांगू की आपल्या मुलांना जिथून आलीस तिथंच जा म्हणून. "
" असं मी कुठं म्हटलं ? भावाच्या अनाथ मुलांचा तर
सांभाळ करायलाच लागेल. परंतु ते करत असताना दुर्योधनांवर अन्याय होणार नाही याची पण खबरदारी घ्या."
" मग घेत नाही का ?"
" असं मला तर दिसत नाही म्हणजे बघा ना, तुम्ही कुंतीला राहायला राज भवन दिलंत मी म्हणतो ते देण्याची
काय गरज होती ? "
" कुंती महारानी आहे, हे देखील विसरलास तू ?"
" आहे ,नाही. होती. आता हस्तिनापूरचे महाराज तुम्ही
आहात. अर्थात राज भवन तुमच्याकडे असायला पाहिजे."
" त्याने काय फरक पडतो ?"
" पडतो ना, कसा नाही फरक पडत. आपण हस्तिनापूर चे महाराज आहात. आणि ते लोक वनात राहणारे वनवासी !
त्याना वनात राहायला आवडतं.राज भवनात त्यांचं मन लागणार नाही. जसे की वनात हिंडणाऱ्या पशु पक्षांना जरी
सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले तरी त्याना ते आवडणार नाही."
" परंतु कुंती ने गांधारी ला सांगितले की आम्हाला इथं
काही त्रास नाही."
" गाधारींला त्यातलं काय कळतंय म्हणा. चांगलं काय नि वाईट काय यातला तिला फरकच कळत नाही.आणि कुंतीला तर असं बोलावंच लागणार ना ,?"
" ते काही असलं तरी पांडू पुत्रांचा ह्या राज भवनावर
तेवढाच अधिकार आहे."
" त्यांचा काहीच अधिकार नाही या राज भवणावर.
हे राज भवन केवळ माझं आहे, आणि त्या भीमा सोबत तर
बसून जेवण पण करू शकत नाही." मध्येच दुर्योधन बोलला.
" भाच्या असं नाही बोलायचे. अन्याय सहन करायला शिकलं पाहिजे तुला. चल निघुया आपण. महाराज जरा विचार करा यावर." असे म्हणून शकुनी दुर्योधन ला तेथून
घेऊन गेला.
गंगापुत्र भीष्म
मी मोठ्या चिंतेत पडलो होतो. काय करावे ते सुचत नव्हते.
धृतराष्ट्र नेत्र हीन तर होताच परंतु आता त्याची विचार करण्याची क्षमता संपली की काय ? का पुत्र मोहा पाई वाढवडिलांनी मोठ्या कष्टाने मिळविलेल्या इभ्रतीला हा काळिमा फासणार की काय अशी आता भीती वाटू लागली.
तेवढ्यात तेथे महामंत्री विदुर आला नि मला चिंताग्रस्त पाहून
त्याने मला विचारले ," तातश्री , आपण कोणत्या विवंचनेत आहात बरं ? ते मला सांगण्याची कृपा कराल का ?"
" विदुर तुला खरंच माहीत नाहीये का ? माहीत नसल्याचा
बहाणा करतो आहेस ?"
" खरंच माहीत नाहीये तातश्री !"
" धृतराष्ट्र नेत्रहीन तर आहेच परंतु पुत्र प्रेमाने इतका आंधळा झालाय की त्याला नीती आणि अनीती मधला फरक
देखील कळेनासा झालाय .न्याय अन्यायाच्या बाबतीत तर बोलायला नको.सर्व सीमा पार केल्यात त्याने.तो हे देखील विसरला की त्याच्या डोक्यावर राजमुकुट जो आहे तो त्याचा नसून त्याच्या धाकट्या भावाचा अर्थात पांडू चा आहे,
शिवाय करुवंशच्या नियमानुसार त्याच्या वर पहिला अधिकार फक्त युधिष्ठिर चा आहे."
" माझ्या कानावर आल्यात त्या गोष्टी , परंतु ...?
" परंतु काय ?"
" धृतराष्ट्र दादाला कसं समजावावे हे मला कळत नाहीये.
त्याना पुत्र मायेने असं काही जखडलं आहे की त्याना त्यांच्या पुत्रा व्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही."
" परंतु हीच पुत्र माया दिवस विनाशाला कारण बनेल हे
ध्यानात येतंय का तुझ्या ?"
" माझ्या द्यानात येऊन काय फायदा ? त्यांच्या द्यानात
यायला हवं ना ते ?"
" मग काय आपण उघड्या डोळ्यांनी नुसतं पाहत राहायचं का ?"
" या व्यतिरिक्त आपण करू काय शकतो तातश्री ? म्हणजे बघा. आपण हस्तिनापूर च्या राज सिंहासन शी बांधलेले आहात. जो राजा निर्णय घेईल तो आपल्याला मान्य
करावा लागणार.आपण फक्त उपदेश करू शकता. हेच
व्हायला पाहिजे असा आदेश देऊ शकत नाही."
" खरंय तुझं ! पिताश्री ना वचन देताना मला असं स्वप्नात ही वाटलं नव्हतं की मला अश्या ही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे."
" भविष्यात काय घडणार आहे,हे मनुष्याला अगोदरच
जर कळलं असतं तर ह्या समश्याच उदभवल्या नसत्या."
" म्हणजे आपण पाहत राहण्या पलीकडे काहीच करू
शकत नाही. हाच त्यांचा अर्थ नव्हे काय ?"
" हो हाच त्याचा अर्थ आहे."
" तू एक काम कर. "
" आज्ञा करा तातश्री !"
" एखादा चांगला मुहूर्त पाहून पांडू पुत्राना कुलगुरु कृपाचार्य यांच्या पाठशाळा मध्ये नेऊन सोड."
" जशी आपली आज्ञा !"
" आता तू जा मला एकांत पाहिजे." असे म्हणताच विदुर तेथून निघून गेला.आणि गंगापुत्र भीष्म गंगेच्या तीरावर जातात नि आपल्या मातेला वंदन करतात.तशी गंगा पाण्यातून बाहेर येत उद्गारली ," आयुष्यमान भव !"
" हा आशिर्वाद देवू नकोस आई , अगोदरच पिताश्री ने
दिलेल्या वरदानात अडकलोय."
" एवढा दुःखी होऊ नकोस पुत्र!"
" दुःखांची काही सीमाच राहिली नाही माते."
" एवढं दुःखी होण्यासारखे काय घडलंय आज ?"
" एक दुःख आहे का ते सांगू ? अगं आई काय सांगू तुला
वाडवडिलांनी मोठ्या कष्टाने मिळविलेली कीर्ती धृतराष्ट्र आपल्या पुत्र मोहा मध्ये पडून कलंकित करायला निघायलाय
आणि पांडू पुत्रावर होत असलेला अन्याय मी माझ्या उघड्या डोळयांनी पाहतोय. काय करू माते ते तूच सांग."
" दुःखी नको होऊस पुत्र ! माणसाच्या हातात काही नसतं.कर्ता आणि करविता तो ईश्वर आहे, आपण फक्त निमित्त मात्र असतो. मी हे केले मी केलं असं फक्त आपण म्हणत असतो नि स्वतःचे समाधान करून घेत असतो. परंतु
आपण कधी हा विचार केला आहे का ? जो हे सर्व करवीत
आहे, त्याने स्वतःच नाव कधी जाहीर केलं आहे का ? तो
कधीच म्हणत नाही की मी हे सर्व केलंय. उलट तो म्हणतो
तुम्हीच केलं नि तुम्हीच भरलं . मी काहीच केलं नाही."
" याचा अर्थ जे घडतंय ते घडू द्यावे."
" सद्या तरी दुसरा पर्याय नाहीये तुझ्याजवळ. आणि एक
गोष्ट लक्षात ठेव.प्रत्येक मनुष्य आपल्या जन्मा सोबत कर्मालाही सोबत आणतो. अर्थात जैसे ज्याचे कर्म तैसे त्याचे फळ ! म्हणून व्यर्थच चिंता करू नकोस. तू फक्त आपले कर्म करत रहा.बाकी ईश्वरावर सोडून दे. कारण ईश्वर साऱ्या
जगाला व्यापून आहे. आणि एक गोष्ट कदापि विसरू नकोस.
अमृत मिळवायचे असेल तर समुद्राचे मंथन करणे अनिवार्य आहे, आणि समुद्र मंथन करत असताना सर्वात आधी निघते
ते विष ! तेव्हा ते विष कुणा ना कुणाला प्यावेच लागणार. तेव्हाच अमृत प्राप्त होईल. येऊ मी !"
गंगापुत्र भीष्म ने आपल्या आईला वंदन करताच गंगा
अदृश्य झाली. तसे गंगापुत्र भीष्म माघारी वळले.
आचार्य गुरुकुलात धृतराष्ट्र पुत्राना शिकवत असताना तेथे विदुर पांडू पुत्राला घेऊन येतात नि कुलगुरू ना नमस्कार
करत म्हटलं ," प्रणाम आचार्य !" तेव्हा कुलगुरू कृपाचार्य आशिर्वाद देत म्हणाले , " आयुष्यमान भव !"
तेव्हा विदुर उद्गारले , " पूजनीय तातश्री नी महाराज पांडूच्या या पाच पुत्राना आपल्या कडे विद्या संपादन साठी
पाठविले आहे." तेवढ्यात दुर्योधन ताडकन आपल्या जाग्यावरून उठून उभा राहात म्हणाला ," हस्तिनापूरात फक्त
एक महाराज आहेत, आणि ते म्हणजे महाराज धृतराष्ट्र आणि त्यांचा पुत्र मी आहे." तेव्हा भीमाला त्याचे वक्तव्य सहन झाले नाही. तो लगेच आपल्या जेष्ठ बंधू युधिष्ठिर ला
हळूच म्हणाला ," ह्याला उचलून आपटू का ?" तेव्हा युधिष्ठिर
उद्गारला ," नाही. गप्प रहा." असे म्हणून पुढे होत म्हणाला," जेष्ठ पिताश्रीचा पुतण्या युधिष्ठिर आपल्याला वंदन करत आहे. " तेव्हा आचार्य उद्गारले ," आयुष्यमान भव ! या महाराज पांडूच्या पुत्रांनो तुमचे स्वागत आहे." असे म्हणून
किंचित थांबून पुढे म्हणाले ," युधिष्ठिर तू सर्वांच्या पुढे बैस !"
तसा दुर्योधन उठून उभा राहात म्हणाला ," नाही. मी बसणार तिथं."
" नाही. तू जिथं बसलास आहेस तेथेच बैस ! तेच तुझे
स्थान आहे, तुम्हां सर्वामध्ये युधिष्ठिर मोठा आहे, अर्थात ह्या
स्थानावर फक्त युधिष्ठिर च बसेल. आजपर्यंत हे स्थान खाली
ठेवण्यात आले होते." असे म्हणताच दुर्योधन च्या अंगाला
अनेक इंगळ्या डसल्यागत झाले त्याला. परंतु करतो काय ?
तेवढ्यात तेथे दूत आला नि त्याने कुलगुरू कृपाचार्य याना संदेश दिला की, आचार्य महाराजानी आपल्याला बोलविले आहे. " मग गुरुकुलाची सारी जबाबदारी युधिष्ठिर वर सोपवून
ते स्वतः त्या दूत बरोबर निघाले तेव्हा त्यांनी विदुर ला पण आपल्या सोबत चलण्याची विनंती केली. आणि निघालेही !
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा