कुरुक्षेत्र - २७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र - २७ |
मी कपडे बदल केले कारण मला अमरला भेटायला जायचेे असते. मी मना मध्ये निश्चय केला की, आज आपले गुपित अमर जवळ जाहीर करायचेच. खूप झाला हा लुपा-छुपीचा खेळ, आज बोलून टाकायचे की त्याला ," आय लव यू " पण त्याचे माझ्या इतकेच माझ्यावर प्रेम करत असेल का ?
हो . नक्कीच करत असेल. पण त्याने कधी जाहीर का केले नाही ? कदाचित त्याची पण माझ्या सारखीच अवस्था असेल. किंवा माझ्या सारखाच माझ्याशी खेळत तर नसावा ना ? कुणास ठावूक ? खेळत ही असेल. किंवा त्याच्या जीवनात माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणी असेल का ? छे छे छे ! तसं अजिबात नसेल , कारण तसे जर असतं तर आपल्याला नक्कीच कळलेच असते आणि मला काय वाटतं माहितेय तो सुध्दा माझ्या इतकाच माझ्यावर प्रेम करत असावा. फक्त जाहीर करायला घाबरत असावा आणि त्याचं कारण म्हणजे मागे आपण नाही का म्हटले होते की ,अमर फक्त माझा मित्र आहे. मी त्याच्यावर प्रेम मुळीच करत नाही. कदाचित हा त्याचाच परिणाम असावा आणि म्हणूनच त्याची माझ्या समोर कबूल करण्याची हिंमत झाली नसेल. म्हणून मला वाटतं की आता आपण पुढाकार घ्यावा आणि स्वतःच जाहीर करावे की मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून.
मग त्याची काय प्रतिक्रिया येते त्यावरुन ठरविता येईल की अमरचे प्रेम आपल्यावरच आहे का आणखीन कुणावर . असा विचार मनात केला आणि आपली पर्सच उचलुन बाहेर निघणार होती. तेवढ्यात आई मला म्हणाली, तुझ्यासाठी एक स्थळ आले आहे. अगदी तुझ्या इच्छेप्रमाणेच ते येणार आहेत आज. तू कुठे बाहेर जाऊ नकोस . घरातच रहा. कळले.
मी एकदम गोंधळात पडली आणि लगेच माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हणजे अमर येतो की काय मला मागणी घालायला . माझ्या चेहऱ्यावर गोड हास्य उमटले आणि मनातल्या मनात मला गुदगुल्या पण होऊ लागल्या. म्हणजे अमर ने शेवटी ओळखले तर....मी त्याच्याशी प्रेम करते ते. मी काही बोलत नाही, म्हणून कदाचित त्यानेच पुढाकार घेतला असावा. मी एकदम स्वप्नात मग्न झाली. माझ्या चेहऱ्यावर उमटलेले भाव आई ने ओळखले. तशी ती खुश
होऊन माझ्या खोलीतून बाहेर पडली. मी मात्र अमरच्या
स्वप्नात रमून गेली.
अमरशी माझे लग्न होईल. मग आमची वरात वाजत-गाजत त्याच्या घरी जाईल आणि मग मधुचंद्राची रात्र किती
मजा येत असेल नाही ? फुलांनी सजविलेल्या पलंगावर मी
बसून अमरची वाट आहे , मग अमर येईल. दरवाजा आतून बंद करून , त्याला आतून कडी घालेल आणि मग हळूहळू मंदगतीने तो माझ्याजवळ येईल. त्यावेळी मी डोक्यावरुन पदर ओढून मुद्दाम डोळे मिटून घेईन. मग तो हळुवारपणे माझ्या डोक्यावरील घुंगट दूर करेल आणि हनुवटी वर उचलून माझ्या ओठाचे चुंबन घेईल. आणि मग आम्ही संपूर्ण रात्र एका वेगळ्याच विश्वात विहार करू , एकदम मस्त मस्त मस्त...
मी स्वप्नात मस्त रंगली होती. आणि तेवढ्यात आई ने मला आवाज देऊन माझ्या स्वप्नाचा भंग केला. मी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आली आणि आईकडे पाहत म्हणाली ," काय आई ?"
" तुझ्या स्वप्नातला राजकुमार बाहेर आलाय तेव्हा लवकर तयार हो आणि बाहेर ये .पाहुणे तुझी वाट पाहत आहेत." मला वाटलं की अमरच आलाय की काय . मी लगेच केस नीट केले. चेहर्यावरील घाम पुसला. ओठांना लिपस्टिक लावली. हातात कपड्यांच्या मॅचिंग बांगड्या घातल्या आणि मी बाहेर आले आणि समोर अमर ऐवजी कल्याण ला पाहून माझ्या पायाची आग मस्तकाला भिडली. आईने त्याला राजकुमार ची पदवी दिली. तेव्हा मी मनात म्हटले ,की हा कसला राजकुमार ? हा रथ हाकणारा सारथी शोभतो. पुर्वीच्या काळी रथ हांकणारे सारथी आणि आजच्या युगात कार चालविणारे ड्रायव्हर.... दोघांचे काम एकच. म्हणजे याला राजकुमार नाही सारथी म्हणायला हवा. त्याची हीच खरी ओळख. आता आलाच आहे तर चांगलीच कानउघडणी करते. म्हणजे पुन्हा अशी हिंमत करणार नाही आणि श्रीमंत माणसांचा जावई होण्याची स्वप्नही पाहणार नाही. मी त्याच्या वडिलांच्या पाया न पडता उभ्यानेच हात जोडून म्हटले ,
" नमस्कार. " माझ्या या विचित्र वागण्याचा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मी त्यांच्या समोर ताठ मानेने सोफ्यावर बसली. माझ्या या अशा विचित्र वागण्याचा त्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल. पण मला कशाची फिकीर नव्हती. बाळ नाव काय तुझं ?" त्याच्या आईने मला विचारले. मी म्हणाले ," एक मिनिट. माझी मुलाखत घेण्या अगोदर मीच आपली मुलाखत घेते. राग मानू नका." तेव्हा सर्वांचेच चेहरे बघण्यासारखेच झाले होते.
सर्वांना प्रश्न पडला होता की , हा काय प्रकार आहे ?ही मुलगी एवढी उद्धट कशी काय बोलू शकते ? असा विचार
आला असेल त्यांच्या मनात. पण मला काय त्याचे . मी त्यांना विचारले ," आपल्या मुलाचे नाव काय ? " तेव्हा बाबा चिडले आणि मला म्हणाले ," दामिनी हा काय प्रकार आहे ?" मी बेफिकीरपणे त्याना म्हणाले ," प्रकार तोच आहे. फक्त त्यात थोडा बदल केला आहे मी. जग बदलले. लोकांचे व्यवहार बदले . मग ही परंपरा बदलायला नको का ? आम्ही मुलींनीच मुलाखत का द्यायची ? त्यांनी का देऊ नये ?"
तेव्हा कल्याणचे बाबा म्हणाले ," ठीक आहे. विचार तुला काय विचारायचे आहे ते. " त्यावर मी म्हणाले ," मी पहिला
प्रश्न विचारलेला आहे , त्याचे उत्तर मिळालेले नाहीये अजून."
तेव्हा प्रथमच कल्याण उत्तरला ," माझे नाव कल्याण. "
" आपले शिक्षण किती झालेय ?"
" एम . कॉम."
" आपण काम काय करता ?"
" धीरज बिल्डर्स अँड डेव्हलर्स मध्ये मॅनेजर आहे."
" आपले वडील काय करतात ?"
" देवधर घोरपडे यांच्या गाडी वर ड्रायव्हर चे काम करतात ."
" म्हणजे तुम्ही ड्रायव्हर चे पुत्र आहात. हीच खरी तुमची
ओळख."
" निश्चितच ."
कल्याण ला माझा भयंकर राग येत होता. हे त्याच्या
चेहऱ्यावर उमटणाऱ्या चिन्हा वरून मला स्पष्ट जाणवत होते. पण अजून कसा संयम पाळून मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे बिनधास्त कसा देतोय याचच मला नवल वाटू लागले होते . शेवटचा घाव घालण्यासाठी हेतूने मी त्याला म्हणाले, " मग तुम्हाला असे का वाटले की तुम्ही एका बिजनेसमेन मुलीशीच लग्न करावे. कमीत कमी आपली पातळी तरी ओळखायला पाहिजे की नाही ? " कल्याण ला ते सहन
झाले नाही तो ताडकन आपल्या जाग्यावरून उठला आणि मला म्हणाला ," काय म्हणायचे काय तुम्हाला ? मी लायक नाही तुमच्याशी लग्न करायला ?"
" येस मि. कल्याण तुम्ही बरोबर ओळखलंत."
" हा तर सरळ सरळ माझा अपमान आहे ."
त्याला अजुन चिडविण्याच्या हेतूने मी म्हणाले ," जमिनीवर सरपटणाऱ्या प्राण्याने पक्षा सारखे आकाशात उंच
भराऱ्या मारण्याचा प्रयत्न करू नये. कदाचित त्या प्रयत्नात
तो गरुडाचा भक्षक पण होण्याची शक्यता आहे. हे त्याने विसरू नये कधी !"
माझे बोलणे त्याच्या फार जिव्हारी लागले होते. तसे तो माझ्याकडे पाहत मला म्हणाला ," बस्स ! आता एक अक्षरी पुढे बोलू नकोस. तू सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहेस . यापुढे एक शब्दही बोललीस तर मी स्वतःला आवरू शकणार नाही. माझ्याकडून मर्यादांचे उल्लंघन होईल ." त्याच्या धमकीला न घाबरता मी म्हणाले ,"आता तुमची जास्त
शोभा होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर ताबडतोब निघायचे बघा इथून." तो आपल्या आई-वडिलांकडे पहात म्हणाला ," बाबा माफ करा . तुमचे ऐकले नाही मी . शेवटी तुमचे म्हणणे खरे ठरले . " मग त्याचे वडील
उठून उभे राहात माझ्या वडिलांना म्हणाले ," आम्हाला इथे बोलावून आमचा अपमान करायचे काय कारण मी तुम्हाला पूर्वकल्पना दिली होती ना , की मी एक ड्रायव्हर आहे म्हणून." तेव्हा बाबा दिलगिरी व्यक्त करत म्हणाले ," खरेच आम्हाला माहीत नव्हते. की ती असे काही करेल म्हणून. नाही तर आम्ही तुम्हाला बोलले नसते. मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. " तेव्हा कल्याण म्हणाला ," माफी तुम्ही मागून चालणार नाही. तिने मागायला पाहिजे." त्यावर मी म्हणाले, " माफी मागण्याचा प्रश्न येतोच कुठे ? मी जे बोलले ते सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे." तेव्हा तो उत्तरला ," हा अपमान मी कधीच विसरणार नाहीये. चला बाबा. आता इथं क्षणभरही थांबायची माझी इच्छा नाहीये." असे बोलून तो निघालाच बाहेर आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे आई-वडीलही जातात. ते लोक गेल्यानंतर बाबा माझ्यावर रागवत म्हणाले ," तुझ्या विचार तरी काय आहे तो आम्हाला एकदा सांगून टाक. असे लोकांना घरी बोलावून आमच्याकडून त्याचा अपमान का करविते आहेस ? अशाने समाजात आमची काय प्रतिष्ठा राहील ?" त्यावर मी बाबांना म्हणाली," बाबा प्रतिष्ठा पणाला लागते , म्हणून मी माझ्या स्वप्नांचा चक्काचूर करून घेऊ का ? ते तुम्हीच सांगा."
" पण अगोदरच सांगत जा ना, म्हणजे पाहुण्यांना अपमानित होऊन जावे लागणार नाही."
" यापुढे असे होणार नाही. याचा अपमान होणे जरुरीचे होते , म्हणून मी केला."
" ते का ?"
" ह्याला त्या धीरज ने पाठवले असेल. "
" घोरपडे का ?"
" हो ; त्याचा जिवलग मित्र हा."
तेव्हा आई मध्येच म्हणाली ," अगं पोरी अशाने तुझे लग्न कधी होणार नाहीये."
मी उत्तरली ," माझा होणार भावी नवरा केव्हाच निवडला आहे मी." तेव्हा आईने उत्सुकतेने विचारले ," कोण आहे तो ?" मी उत्तरले ," धीरज चा चुलत भाऊ अमर घोरपडे."
" म्हणजे धीरज ने ज्याचा उल्लेख केला होता मागच्या वेळेस , तो तर नव्हे ?"
" होय तोच."
" मग बोलव त्याला.....एक दिवस आपल्या घरी." बाबा म्हणाले.
" हो बोलणार आहे मी. "
" मग लवकर बोलून घे आणि लग्न करून मोकळी हो." मला काही कळेना बाबा असे का सांगत आहेत त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता ? पण मला ही आता वाटू लागले की लग्न करून मोकळे व्हावे. आता फार दिवस त्याच्यापासून दूर राहणे जमणार नव्हते मला. अमर ला विचारून त्याच्या घरच्यांना बोलवावे एक दिवस आपल्या घरी. असा विचार माझ्या मनात चालला होता. तेवढ्यात आई म्हणाली ," बाई गं तुझे लग्न होईस्तोवर आमच्या जीवाला घोर आहे . लवकरात लवकर त्याला त्याच्या घरच्यांना घेऊन यायला सांग. स्त्रीची अब्रू म्हणजे काचेच्या भांड्या सारखी असते. काचेचे भांडे एकदा तुटल्यावर जसे त्याला पुन्हा सांधता येत नाही. तसेच स्त्रीच्या अब्रूचे असते. तुझ्या लक्षात येते ना मी काय म्हणते ते." मी वैतागून उत्तरले," हो गं कळले मला. सांगते मी त्याला." असे बोलून मी सरळ आपल्या खोलीत जाते. त्यावेळी जाताजाता आईचे स्वर कानी पडतात ," कसे होणार या पोरीचे ते देव जाणे !"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा