कुरुक्षेत्र १७
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुरुक्षेत्र १७ |
बाबा दाखवतील तेवढ्या मुली नापसंतच करायच्या काही ना काही खोट काढायचीच त्यांच्यात. माझ्या प्रश्नाचे जसे मला उत्तर मिळाले ,तशी मला झोप पण लागली. सकाळी आईच्या हांकेने मी जागा झालो. डोळे किलकिले करून मी उघडले, तर समोर मानसी आई दिसली. ती माझ्याजवळ उभी होती. तिने मला विचारले ," आज ऑफिसला जायचा
तुझा विचार नाही का देव ? " तेव्हा मी उत्तरलो ," जायचंय ना ? " तसे मानसी आईने विचारले ," मग केव्हा जाणार ?
घड्याळात बघ किती वाजले ते ." मी समोर भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. सकाळ चे नऊ वाजून गेले होते. इतक्या उशिरापर्यंत मी कसा झोपून मी राहिलो. याचाच मला प्रश्न पडला ; परंतु लवकरच ध्यानात आले की रात्र फार उशिरापर्यंत जागल्याने सकाळी जाग आली नाही. मी लगेच अंगावरील पांघरून एका बाजूला फेकले आणि घाईघाईने बाथरूम मध्ये शिरलो. स्नान आटोपताच अंगावर कपडे चढवले आणि बाहेर आलो. तोपर्यंत मानसी आईने डायनिंग टेबलवर नाश्ता आणून झाकून ठेवले होते. मी झटपट नाश्ता उरखले आणि लगेच ऑफिसला जायला निघालो . हॉल मध्ये बाबा वृत्तपत्र वाचत बसले होते . मला पाहताच ते म्हणाले," निघालास ? "
" हो ."
" संध्याकाळी लवकर यायला जमेल ? "
" का ? "
" एका ठिकाणी जायचेय मुलगी पाहायला ."
" आज नाही जमणार बाबा ."
" का रे ?" न समजून त्यांनी मला विचारले.
" आज संध्याकाळी एक जरुरी मिटींग आहे ."
" बरं मग उद्या .....?
" उद्याचं उद्या पाहू !" असे बोलून त्यांच्या उत्तराची वाट न पाहता मी ताबडतोब निघून गेलो . कार मध्ये बसताच विचार करू लागलो की , आज तर मिटिंगचा बहाणा केला ; पण
रोज रोज काय कारण सांगणार ? अलका तर भूमिगत झालीय. तिला कुठे शोधवयाचे बरे ? पण ती मिळाल्याशिवाय आपण लग्न करू शकत नाही. वडिलांना पण खरे सांगू शकत नाही. अलका सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करणे हा विचार ही सहन होत नाहीये मला. माझ्यामुळेच अलका ने आपले घर सोडले. माझ्याशीच लग्न करण्यासाठी त्या तांत्रिका सारख्या नीच माणसाकडे गेली.
परंतु तांत्रिकाचा हेतू समजताच तिने त्या तांत्रिकाचाच खून
केला नि स्वतःचे रक्षण केले . परंतु पोलिसांच्या नजरेत मात्र ती गुन्हेगार ठरलीय. कायदा आपला पाश आवळणार म्हणून ती त्याच्या पासून दूर पळू लागली आणि त्यामुळेच धनंजय सारख्या लांडग्याच्या हाती सापडली. तिथेही स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिला त्या लांडग्याची शिकार करावी लागली. एक नाही, दोन नाही ,लागोपाठ तीन खून केलेत आणि एक हाफ मर्डर ! बापरे ! एवढे मोठे साहस केले तिने.आपल्याला तर यापैकी काहीच जमले नसते ; पण आता तिला शोधावयाचे कुठे आणि कसे ? आणि मिळाली तरी आपण लग्न करू शकतो का तिच्याशी ? कदापि नाही . कारण तिला
पोलीस पकडून नेतील नि तिच्यावर खटला दाखल करतील.
त्यानंतर कोर्टात तिला शिक्षा निश्चितच होणार ...परंतु एक
गोष्ट चांगली होईल आणि ती म्हणजे स्त्रियांना फाशी देत नाहीत. याचाच अर्थ असा की ती तुरूंगातून सुटून आल्यानंतर आपण तिच्या बरोबर लग्न करू शकतो. परंतु
तिला हे सांगणार कोण की तू पोलिसांच्या स्वाधीन हो म्हणून.
खरे तर हे काम आपल्याला च करायला हवं. तिचा शोध
घ्यायलाच हवा. पण कसा ? तेच कळत नाहीये. परंतु एक
गोष्ट आपण करू शकतो आणि ती गोष्ट म्हणजे तिची वाट
पाहणे जीवनाच्या अंतापर्यंत. हो एवढं तर आपण करूच शकतो. निर्णय ठरला. काय वाटेल ते झाले तरी लग्न अलकाशीच करायचे. दुसऱ्या कुणाची नाही. मग त्यासाठी पूर्ण आयुष्य वाट पाहण्यात गेली तरी हरकत नाही. विचार करता करता मोटार ऑफिस जवळ येऊन पोचली.
संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालो खरा ; पण घरी जाण्यास मन तयार नव्हते , म्हणून मग मोटार गार्डनच्या दिशेने वळविली. जिथे जिथे अलका सोबत गप्पा मारत बसत असे. तेथे तेथे थोडावेळ जाऊन बसलो . पण मनाला शांती अशी काही मिळेना. शेवटी मोटार मध्ये जाऊन बसलो. पण घरी जाण्याची इच्छा होईना. पण घरी जाणे जरुरीचे होते. घरी पोहोचतात बाबा म्हणाले ," चल , बोलविले आहे त्यांनी
आपल्याला. मी न समजून त्यांना विचारले ," कुणी ?"
" पाहुण्यानी ? "
तेव्हा माझ्या कुठे ध्यानात आले की आज मुलगी पाहायला जायचंय आता कोणताही बहाणा करणे शक्यच नव्हते. अखेर जाण्यास भाग पाडले. मी , मानसी माझी , आई आणि बाबा तिघेही त्यांच्या घरी पोहोचलो. मुलगी दिसायला खूप सुंदर होती. ना पसंत करण्याचा प्रश्नच नव्हता
मुळी. पण लग्न मोडण्यासाठी काहीतरी उपाय करणे जरुरीचे होतेच. आई-बाबांना तर एकदम पसंत होती मुलगी . फक्त
आता प्रश्न उरला होता आम्हां दोघांच्या पसंतीचा. तिच्या आई-वडिलांनी आम्हाला एकांतात मिळण्याची संधी दिली.
मी त्या संधीचा फायदा घेतला. मी तिला स्पष्टपणे सांगून टाकले की , माझे दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे , तेव्हा तू मला नकार देऊन टाक . आम्ही जसे बाहेर आलो तसे आम्हाला आमची पसंती विचारण्यात आली . मी तिला नकार देऊ शकत नव्हतो , म्हणून हा म्हणालो होतो . त्या मुलीने मात्र लग्नास नकार दिला . सरळ सरळ नकार न देता ती म्हणाली ," मला विचार करायला थोडा अवधी द्या. तिच्या या बोलण्यावर साऱ्यांनाच आश्चर्य वाटले . तिचे आई-वडील तर शंकाभरी नजरेने तिच्याकडे पाहु लागले होते. त्याच वेळी माझे बाबा त्यांना म्हणाले ," हरकत नाही . मागाहून कळवा आम्हाला." त्यानंतर आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि घरी
आलो. परंतु तो ही माझा प्रयत्न फसला. बाबांना तिच्या वडिलांकडून समजले की , मुलीचा नकार नव्हता तर मुलाचा
म्हणजे माझा नकार होता. बहुधा तिच्या वडिलांनी तिला
विचारले असावे आणि नाईलाजाने तिला खरे सांगावे लागले
असावे. पण झाले ते पण एका अर्थाने चांगलेच झाले असे म्हणावयास हवे. निदान या पुढे तरी ते माझ्यासाठी मुलगी
पाहण्याचे काम बंद करतील. पण त्या दिवशी मात्र माझ्यावर
भयंकर चिडले. म्हणाले ," तुला लग्नच करायचं नव्हते तर
आधीच सांगायचे होते ना आम्हाला. निदान पाहुण्या कडून जे
आम्हाला ऐकायला मिळाले ते तरी ऐकावे लागले नसते."
बाबांच्या स्वरातून राग ओसांडताना दिसत होता मला. आणि त्यांचेही बरोबरच होते म्हणा. त्यांना माझ्यामुळे शरमिंदा व्हावे लागले. पण माझा सुध्दा नाईलाज होता त्याला. मी अलका व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नाही. कारण दुसरी कोणतीही मुलगी निर्धन माणसांशी लग्न करायला कधीच तयार होणार नाही. अलकाचे प्रेम आहे माझ्यावर. एक वेळ ती समजून घेईल मला. पण दुसरी
कशी समजून घेईल मला आणि का मला तिने समजून घ्यावे ? म्हणूनच मला हे सर्व नाटक करावे लागले. पण बाबांना कसे समजविणार ते. मी काहीच बोलत नाही हे पाहून बाबा पुन्हा मोठ्या ने म्हणाले ," देव काय बोलतोय मी.
कळतंय का तुला ? " तेव्हा मी उत्तरलो ," बाबा मला एवढ्यात लग्नच नाही करायचंय." त्यावर बाबा अधिक चिडून म्हणाले ," एवढ्यात नाही का ? तुला करावयाचे नाहीच आहे लग्न.?"
" करायचंय ना ?"
" कधी ?" मला निश्चत कधी ते सांगता येईना , म्हणून गप्पच झालो. तसे ते तावातावाने म्हणाले ," आता का शिवले
तुझे तोंड ? अरे बोल ना , काहीतरी !" परंतु मी काहीच बोललो नाही. तशी मानसी आई समजली की काहीतरी गडबड जरूर आहे. तेव्हा ती बाबांना समजावत म्हणाली,
" करेल ना तो लग्न , का उगाच त्याच्या मागे लागलाय?
आणि मी समजवते त्याला . तुम्ही जा बरं इथून." तेव्हा बाबा
मानसी आई कडे पाहत बोलले ," आता तूच समजव तुझ्या
लेकाला." असे म्हणून बाबा तेथून निघून गेले. तशी मानसी
मला प्रेमाने म्हणाली ," देव ,मी तुझी जन्मदात्री आई नाहीये.
परंतु आज मी त्याच अधिकाराने विचारते तुला की का नाही लग्न करायचं तुला ? तुझं कुणावर प्रेम आहे का ?"
मी उत्तरलो ," होय. "
" अरे मग असं सांग ना ,आम्ही काय तुझ्या प्रेमाच्या आड
येणार आहोत का ?"
" प्रश्न तो नाहीये."
" मग दुसरा काय प्रॉब्लेम आहे? सांग बरं."
" आई ती मुलगी इथं आता राहात नाही."
" इथं रहात नाही. मग कुठं राहते ?"
" माहीत नाही."
" असा कसा रे तू वेंधळा ? तिला इथून दुसरीकडे जाण्या अगोदर तिच्याकडून पत्ता नाही का घ्यायाचास विचारून ?"
" कसा घेणार ? तिची नि माझी भेटच नाही झाली तर !"
" म्हणजे ती तुला भेटली सुध्दा नाही. "
" हो !"
" म्हणजे याचा अर्थ तिचे तुझ्यावर खरे प्रेम नव्हतं तर !"
" हे खरं नाहीये आई , उलट मीच तिच्या प्रेमाला लायक
नाही ठरलोय."
" ते कसं मी नाही समजली." मानसी आई बोलली ," तेव्हा जरा मला समजेल अशा शब्दात सांग." आता काय
काय करावं ? माझ्या पुढे प्रश्न उभा राहिला. मानसी आईला
मी सत्य सांगू शकत नाही आणि सत्य जाणल्याशिवाय ती
काय गप्प बसणार नाही. काय करू आता ? असा विचार माझ्या मनात सुरू होता. इतक्यात मानसी आई म्हणाली,
अरे बोल ना, गप्प का झालास ?" पण तरी देखील मी काहीच
बोललो नाही. तशी ती जरूर समजली असावी की मी तिच्या
पासून काहीतरी लपवितो आहे. तसे तिने मला इमोशनल ब्लँकमेल करत बोलली," बघ तू जर मला खरोखरच आपली
आई मानत असशील तर मला अगदी खरं खरं सांगायचं. खोटं अजिबात नाही. कळलं. "
मग काय नाईलाजच झाला माझा. शेवटी खरं काय कारण आहे ,ते सांगावचं लागले मला. थोडक्यात वर्णन केले. ते ऐकून मात्र मानसी आई एकदम सुन्न झाली आणि एकदम
खिन्न स्वरात म्हणाली ," म्हणजे या साऱ्या प्रकाराला माझीच
महत्वकांक्षा कारणीभूत ठरली म्हणायची तर !"
" आई तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझा काहीही दोष नाही त्यात."
" दोष माझा नाही कसा ? माझाच दोष आहे हा सारा.
एकदम स्वार्थी झाले होते मी. माझा स्वार्थ तुझ्या सुखाच्या
आड आला आणि खरं सांगायचं तर आई या नात्यालाच मी
कलंकित केले. मला तुझी आई होता नाही आलं रे. खरंच
मला तुझी आई होता नाही आलं. मात्र तू खऱ्या मुलाचे
कर्तव्य निभावले. तुझ्या जागी जरी माझा सख्खा मुलगा असता तरी त्याने तुझ्या एवढा मोठा त्याग कदापि केला नसता. का केलेस तू हे ? "
" त्यात माझा ही स्वार्थ होताच !"
" तुझा स्वार्थ ....तो कसा ?"
" मला माझ्या बाबांना दुःखी पाहायचं नव्हते."
" तू जे काही केलेस ते तुझ्या बाबांना माहीत आहे का ?"
" नाही आणि तू पण त्याना यातलं काही सांगू पण नकोस."
" पण का ?"
" बाबांना ते सहन होणार नाही."
" पण असे किती दिवस लपवायचे."
" जोपर्यंत अलका सापडत नाही तोपर्यंत."
" आणि ती नाहीच सापडली तर ?"
" असं होणार नाही. कारण हे जग गोल आहे. फिरून
माघारी माणूस वापस तिथंच येतो. म्हणजे कधी कधी भेट होतेच त्याची."
" हां पण ती कधी होणार ?"
" ते ना माझ्या हातात आहे ना तुझ्या."
" तू असं का करत नाहीस ?"
" कसं ?"
" प्रश्न फक्त प्रॉपर्टी चा आहे ना , ती सारी प्रॉपर्टी मी पुन्हा
तुझ्या नावावर करते. कारण माझी आता पूर्ण खात्री झाली
आहे की तू आपल्या धाकट्या भावांवर कदापि अन्याय होऊ देणार नाहीस. तेव्हा तुला आता तिला विसरून जा आणि दुसऱ्या एखाद्या सूंदर मुलीशी लग्न कर म्हणजे तुझ्या बाबांची पण इच्छा पूर्ण होईल."
" आई प्रेम एकदाच होते आणि माझं प्रेम फक्त अलका वरच आहे. तिच्या व्यतिरिक्त मी अन्य कुण्या मुलीचा विचार
पण करू शकत नाही. कदापि नाही."
" अरे पण तुझ्या वडिलांना काय सांगायचं ? "
" आई , तू चिंता करू नकोस. मी बोलेन बाबांशी या विषयी."
" बघ बाबा लवकर काय तो निर्णय घेऊन टाक. नाहीतर
माझा जीव असाच टांगणीवर राहील."
मी आईला आश्वासन दिले की लवकरच मी यातून काहीतरी मार्ग काढेन. परंतु मला कळत नव्हतं निर्णय काय
घ्यावा. नाही म्हणजे मी अलका व्यतिरिक्त दुसऱ्या मुलीशी
लग्न करणे म्हणजे अलका च्या निस्सिम प्रेमाशी बेईमानी करणे. छे , छे , छे ! हा विचार सुध्दा सहन होण्यासारखा
नाहीये. मग काय करावं ? बाबांची समजूत कशी काढावी ?
काहीच उपाय सुचत नव्हता. आणि बाबांनी सुध्दा त्या दिवसानंतर माझ्या लग्नाचा विषय माझ्या समोर काढला नाही. परंतु मनातून फार दुखावले गेले होते हे निश्चितच. मी
त्यांच्या आज्ञाचे पालन केले नाही ,असे त्याना वाटत असावे.
पण माझा ही नाईलाज होता त्याला. मी उघडपणे काहीही
सांगू शकत नाही त्याना. कारण ते दुःख या दु:खा पेक्षा जास्त
झाले असते त्याना. हे मला चांगलेच माहीत होते.
मानसी
मी भावनेच्या भरात देव ला म्हणाली की तुझी प्रॉपर्टी पुन्हा तुझ्या नावावर करते म्हणून. परंतु असं करणे योग्य
होईल का ? नाही म्हणजे देव चांगला मुलगा आहे. त्याबद्दल
प्रश्नच नाही. परंतु त्याच्याशी लग्न करून घरात येणारी स्त्री
त्याच्या सारखीच मोठ्या मनाची असेल का ? कारण स्त्री चा
स्वभाव काय आपल्याला माहीत नाही. प्रत्येक स्त्री ला आपण ,आपला नवरा आणि मुलं या व्यतिरिक्त घरातील दुसरी कुणीही व्यक्ती नको असते. अर्थात मी सुध्दा त्यात आलेच म्हणा. लग्ना पूर्वी जे भाऊ एकमेकांसाठी कोणतेही
दिव्य करायला तयार असतात. तेच भाऊ लग्न झाल्यानंतर
एकमेकांना वैरी समजू लागतात. आणि दोन स्त्री या एकत्र
कधीच नांदत नाहीत. मग त्या सख्ख्या बहिणी जाऊ म्हणून
एका घरात आल्या असल्या तरी ! मग आपण कसा विश्वास
ठेवायचा की देव ची पत्नी देवला आपल्या पासून दूर घेऊन
जाणार नाही. छे , छे , छे ! आपण थोडी घाईच केली निर्णय घ्यायला. पण काही हरकत नाही. अजूनही बाजी आपल्या
हातातच आहे म्हणा.
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा