Vamana Hari Watmare | Love story | Mahendranath prabhu

![]() |
दुनिया ना माने -२० |
शाळेत प्रवेश मिळविण्याची तारीख निघून गेल्यामुळे मुख्यधापकांनी शाळेत प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामळे विराज आपल्या मुलाला घेऊन घरी परतला. परंतु घरी
आल्याबरोबर शांती ने हर्षभराने विचारले ," ऍडमिशन मिळाले ना ?"
" नाही ना ?"
" का ? आता काय झालं ?"
" उशीर झाला ." तिला वाटले की त्यांना शाळेत जायला उशीर झाला असेल असे समजून ती बोलली ," काही हरकत नाही. उद्या जरा शाळेत लवकर जा." तिच्या या वक्तव्यावर
हसत विराज बोलला ," अगं शाळेत जायला आम्हाला उशीर नाही झाला."
" मग ?"
" ऍडमिशन घेण्याची तारीख निघून गेली." असे गुरुजी म्हणाले.
" मग असं सांगा ना ?"
" तेच तर सांगतोय मघापासून."
" म्हणजे त्यांचं हे त्याच वर्ष फुकटच गेलं की हो."
" हो ; पण त्याला इलाज काय ."
" हे सारे माझ्यामुळे घडले." असे बोलुन ती स्वतःला
दोष देऊ लागली. तसा तो म्हणाला ," तू नेहमी स्वतःला का दोष देतेस ? "
" मग आणखीन काय करू ?"
" तुला खरं सांगू ? "
" काय ?"
" खरं सांगायचं तर आपल्या दोघांचं पण चुकले. भावनेच्या भरात आपण वाहत गेलो. त्याची ही फळे आहेत. अजून काय काय बघावे लागणार आहे, ते त्या देवालाच ठाऊक ." त्याच वेळी आपल्या खोलीतून सुधाकर बाहेर आला. बहुधा दोघांचे संभाषण ऐकले असावे. ते बोलले,
" आता पश्चाताप करून त्याचा उपयोग काय ?
त्या पेक्षा येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरी जायचे. आणि जे झालं त्याची परत परत उजळणी करत बसावयाची नाही."
त्यानंतर दोन वर्षाचा कालावधी उलटला असेल. कारण
प्रतीक आता दोन मोठ्या बालवाडीत शिकत होता. पुण्याला येऊन सात वर्षे झाली तरी ती आपल्या माहेरी गेली नव्हती. त्याचं कारण एकच होतं आणि ते म्हणजे आपल्या आई-वडिलांना आपले गुपित कळले तर काय सांगायचे आपल्या नात्यासंबंधी! ही एकच भीती तिच्या मनात घर करून
बसली होती , म्हणून तिने माहेरचे कधीच नाव काढले नाही. परंतु आज अचानक तिला आपल्या माहेरी जाण्याची ओढ निर्माण झाली. कशी झाली ती कुणास ठाऊक ? ती विराज म्हणाली ," मला ना माझ्या आई - वडिलांची फार आठवण येऊ लागली आहे. मी एक वेळ त्याना पाहून येते ना ? चार दिवसात लगेच माघारी येते."
" तुला अजिबात माहेरी जाता येणार नाही."
" नाही म्हणू नका. मला खूपच आई-बाबांची आठवण येऊ लागलीय. एक वेळ बघून येते ना !"
" जायला माझी काहीच हरकत नाही पण आपण का जात नाही, हे ठाऊक आहे ना तुला ?"
" ते खरंय हो ; पण मला खूपच त्यांची आठवण येऊ लागलीय. एकदा नजरेस पडल्या शिवाय मला चैन मिळणार
नाही. जाऊन येऊन येते ना ? नाही म्हणू नका." ती एकदम गयावया करत असल्याचे पाहून शेवटी विराज तिला म्हणाला, " ठीक आहे , जा. पण एकटीच जा , मुलांना
आपल्या सोबत घेऊन जाऊ नकोस."
" असं कसं म्हणता ? मुलांशिवाय कशी राहीन मी तेथे ?
शिवाय माझ्या आई-बाबांना पण त्यांची नातवंडे पहायची असतील ना ? "
" आणि तिथे जाऊन मुलांनी काय गडबड केली म्हणजे?"
" कशाची गरबड करतील मुलं ? मुलांना काय माहिती आपल्या नात्यासंबंधी ? "
" ते खरं गं , पण जर तुझ्या बाबांनी मुलांना विचारले की तुझे बाबा का नाही आले ? मग काय सांगितील मुलं ?"
" ते बरोबर सांगतील काय सांगायचे ते. आणि मी आहेच ना त्यांच्या सोबत. मी सांभाळून घेईन बरोबर."
" बरं बरं जा तर मग ." असे बोलत असताना त्याला एक युक्ती सुचली. तसा तो तिला उद्देशून म्हणाला," त्यापेक्षा असं का करत नाहीस ?" न कळल्याने तिने त्याला विचारले, कसं काय म्हणता ?"
" बाबांना सोबत घेऊन का जात नाहीस ?" ती संतापाने म्हणाली ," तुमचे डोकं भीकं फिरलं तर नाही ना ?"
" असं का म्हणतेस ?"
" मग आणखीन काय म्हणू ?" असे बोलुन ती पुढे म्हणाली ," त्यांना सोबत नेऊन आई-बाबांना काय सांगू हे माझे सासरे आहेत म्हणून सांगू ? का नवरा आहे म्हणून सांगू ?"
" अगं ते कशाला विचारतील ? त्यांना काय माहित नाहीये होय ? "
" ते खरंय ; पण नकोच त्याना सोबत न्यायला.
" बरं मग तू एकटीच जा ,"
" एकटीच कशी ,पोरांना सोडून जाईन मी ?"
" बरं बरं मुलांना पण सोबत घेऊन जा." एकदाचा पेच
सुटला. शांती आपल्या तिन्ही मुलांना सोबत घेऊन माहेरी निघून गेली. आपली मुलगी माहेरी आल्याचे पाहून तिच्या आईला फार आनंद झाला. तिच्या भावाचं लग्न दोन दिवसांवर आलं असताना शांती नेमकी माहेरी आली , हे पाहून तिची आई हर्षभराने तिला म्हणाली ," बरं झालं बाई ! तू आलीस ती. माझी तर काळजीच मिटली."
शांती ने न समजून विचारले ," म्हणजे गं आई ? "
" अगं तुझ्या भावाचं लग्न ठरलेय. त्याच्या लग्नाची पत्रिका घेऊन तुझा बा मुंबईला गेला होता : पण तू भेटली नाहीस त्याना. मग तुझ्या शेजारीण बाई ने सांगितले की, तू आता पुण्याला राहूतेस म्हणून."
" हो ; आता मी पुण्याला राहतो." शांती नाईलाजाने बोलली.
" अगं पण पुण्याचा पत्ता पण दिला नाहीस ."
" तेथे कोणाला देणार ? तेथे कोण राहतं आमचे ?"
" अगं असं कसं म्हणतेस त्या शेजारीण बाईचे किती घरगुती संबंध होते ? इतक्या लवकर कोणी विसरत का ?" आता काहीतरी कारण सांगुन वेळ मारुन न्यायला पाहिजे. नाहीतर आई त्याचा कीस काढत बसेल. असा मनात विचार करून ती पुढे म्हणाली," अगं आई जाण्याच्या गडबडीत मी त्यांना सांगायला विसरले. "
" ते सोड, मी काय म्हणते ,इतक्या वर्षात तुला एकदा पण वाटलं नाही मोहरी यावसं ?
" अगं आई मुलांच्या जंजाळात कुठं वेळ मिळतो गं इथं त्यायला ? "
" त्यातल्या त्यात सवड करावयाची असते पोरी !"
" बरं बरं येथून पुढे काढत जाईन हां सवड."
तेवढ्यात तिचे वडील तेथे आले, आपल्या मुलीला अचानक आल्याचे पाहून त्यांनी विचारले ," की तू कधी
आलीस पोरी ?"
" ही काय आताच आले."
" अगं पण तुझ्या मुंबईतला खोलीवर गेलो होतो ,पण पण तिथे कळलं की तू आता पुण्याला राहतेस म्हणून."
" हो , सध्या आम्ही पुण्याला राहतोय."
" पण मग आता कोणी तुला सांगितले की तुझ्या भावाचं लग्न आहे म्हणून ?"
" नाही कोणी !"
" मग काय स्वतःहुन आलीस ?"
" हो ; तुम्हाला भेटावं असं वाटलं म्हणून आली."
" बरं झालं आलीस ती, आता लग्न झाल्यानंतरच आपल्या घरी जा."
" कधी आहे लग्न ?"
" आज आठ दिवसा "
" बाप रे ,आठ दिवस ! इतक्या दिवस मला बाई नाही
जमणार राहायला."
" का नाही जमणार ?"
" मी त्याना चार दिवसांत परत येते म्हणाले."
" अगं मग त्यांना फोन करून सांग की माझ्या भावाचे
लग्न आहे म्हणून. ते नको राहुस असं थोडेच म्हणणार आहेत."
" तसं नाही गं , त्यांच्या जेवणाचे फार हाल होतील गं "
" मग आता तू नाहीयेस तर हाल होत नाहीयेत का ?"
" होतात गं पण .... तिला काय बोलावे ते सुचेना.
तशी तिची आईच म्हणाली ," आणखीन चार दिवस सोसतील
त्रास. त्यात काय ? त्यांच्या मेहुण्याचे लग्न आहे , मग त्यांनी
थोडा तरी त्रास नको का सोसायला ?"
" नको गं आई मला जायला हवं."
" अगं पण भावाच्या लग्नाला पण थांबणार नाहीस का ?" आईने ने विचारले. तेव्हा तिचे बाबा म्हणाले ," त्या
पेक्षा मी असे करतो ना , मीच पुण्याला जातो नि त्यांना पण लग्नाचे आमंत्रण देऊन येतो." असे म्हणताच शांतीच्या काळजात एकदम चर्रर्र झाले. आपले वडील पुण्याला गेले तर आपले भिंग नक्कीच फुटेल या भीतीने ती लगेच म्हणाली," कशाला पुण्याला जात ? ते नाही येऊ शकत
लग्नाला." लगेच तिच्या आईने प्रतिप्रश्न केला " का नाही
येऊ शकत लग्नाला ? त्यांच्या धाकट्या मेहुण्याने लग्न
आहे." आता काय उत्तर द्यावे तिच्या पुढे प्रश्न पडला. पण क्षणभरच. लगेच दुसऱ्या क्षणी ती म्हणाली, त्याना रजा नाही
ना मिळणार ."
" का नाही मिळणार रजा ? त्यांच्या मेहुण्याचे लग्न आहे
म्हटल्यावर त्यांचा साहेब रजा देणार नाही ? असे कसे होईल
बरं ?" बाबा म्हणाले.
आता काय बोलावे ते प्रीतीला सुचेना आणि वडिलांना पुण्याला जाण्यावाचून कसे रोखावे ते पण कळेना ? प्रीती उपाय शोधत होती. तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले ," तू फक्त
तुझ्या पुण्याच्या खोलीचा पत्ता दे , मी जाऊन येतो पटकन."
शेवटी शांतीचा ( प्रीती ) नाईलाज झाला. मुकाट्याने
पुण्यातल्या राहत्या खोलीचा पत्ता तिला द्यावा लागला.
खोलीचा पत्ता हातात घेत ते म्हणाले ," उद्या जाईन म्हणतो
मी पुण्याला."
" हो , आणि सोबत घेऊनच या त्यांना." तिची आई म्हणाली.
" हो , नक्की घेऊन येतो." असे म्हणून ते शांती कडे पाहून म्हणाले ," तू काही चिंता करू नकोस. मी करतो सर्वकाही ! " शांती ला वाटले की उगाच इथे आली. आता एवढे दिवस लपविलेले भांडे फुटणार.
क्रमशः
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा