इनाम-१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
इनाम-१ |
कोंबडा आरवला पहाट झाली. तशी सिंधू झोपेतून जागी
झाली. डोळे चोळत - चोळत ती अंथरुणावरून उठली. तेव्हा तिची नजर घड्याळ्याकडे गेली. त्यावेळी घड्याळ्यात
सकाळचे सहा वाजल्याचे तिला दिसले. दिवसभर बिगारीचं
काम करून थकुंन जायची ती. आणि त्यात आणखीन कामाची भर म्हणजे ,संध्याकाळी घरी आल्यानंतर स्वयंपाक
बनविणे,भांडी , कुंडी घासणे वगैरे... ही सर्व कामे देखील
करावी लागत होती. त्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या पार झोपून जायची ती. त्यामुळे अंथरुणावरुन उठण्याची
अजिबात इच्छा नसे तिची ; पण काय करणार ? आखीर पापी पेट का सवाल है ? उठावेच लागायचेच तिला. कारण
मोल मजुरीच्या कामाला गेले नाही तर पैसे कोठुन येणार
घरात ? आणि खायला प्यायला तरी काय मिळणार ?
गरीब लोकांचे जीवन म्हणजे हातावरचे पोट .जर कामावर
गेले नाही तर तो दिवस उपासच घडायचा. म्हणून नाईलाजाने
ती उठली. तेव्हा तिचा नवरा तिच्या शेजारीच दारू पिऊन
मस्त झोपला होता नि मोठमोठ्याने घोरत ही होता. त्याच्या
दारूच्या व्यसनाला सिंधू खुप वैतागली होती. त्यावरून त्या
दोघांचे नेहमी भाडंण असे. ती त्याला नेहमी म्हणे की,दारू सोडा." पण तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम
होत नसे. त्याला फक्त रोज दारू पाहिजे बस्स ! मग त्यासाठी तो काही ही करायला मागे पुढे पाहत नसे. दारू पिण्यासाठी त्याला सिंधू कडून पैसे नाही मिळाले की, घरातील एक एक वस्तू नेऊन बाजारात विकत असे. आणि त्या पैशातून तो दारू पिऊन घरी येत असे. तेव्हा सिंधू त्याला
म्हणे," मी एकेक पैसा जुळवून भांडे-कुंडे घेते आणि तुम्ही
दारू पिण्यासाठी ती विकून टाकता." तिने असे म्हटलें की,
रमेश तिच्यावर संतापायचा आणि आपल्या नवरोपणाचा रुबाब तिला दाखवायचा. तो तिला म्हणे, हे माझे घर आहे,मी
काहीही विकेनं,तुला काय करावयाचे आहे ?" असे म्हणत तो तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी तिला तुडवून टाकायचा, मग तीही त्याच्याशी कड्याक्याचे भांडण करी. गेल्या काही वर्षापासून त्यांच्या घरात हा सिलसिला सुरू झाला होता. रमेशच्या दारू पिण्याच्या व्यसनामुळे त्यांच्या घरातील एकेक वस्तु कमी होऊ लागल्या होत्या. आधीच घरात अठरा विश्व दारिद्र , त्यातच नवऱ्याला दारूचे व्यसन लागले होते. आणि दारू पिण्यासाठी तो घरातील सापडेल ती वस्तू विकू लागल्याने सिंधू फार दुःखी कष्टी झाली होती. नवऱ्याला कसे समजावे हे तिला कळत नव्हते. शिवाय पदरी आणखी तीन मुलं आहेत. त्यांचे पालन-पोषण कसे करावे ? त्याना खाऊ पिऊ काय घालावे ? याची चिंता सिंधुला सतावायची. त्यात बेवडा नवऱ्याची भर पडल्याने सिंधुचा जीव फार मेटाकुटीस आला होता. असावं ढाळीत जीवनाशी संघर्ष करत ती एकेक दिवस पुढे ढकलत होती. सिंधू सोबत तिचा नवरा देखील मोल मजुरी करायला जायचा. परंतु स्वतःच्या कामाचे पैसे तो दारू मध्येच उडवायचा. सिंधूच्या हातात एक छदाम पण देत नसे. त्यामुळे तिला स्वतःच्या मजुरीवर घरखर्च चालवावा लागत असे. त्यामुळे तिची फार ओढाताण होत असे. पण तिच्या त्या नवऱ्याच्या गावी पण नसे. त्याला फक्त दारू प्यायला मिळाली म्हणजे बस्स ! रात्री सुध्दा नेहमी प्रमाणे दारू प्यायलेला असल्याने त्याच्या तोंडाला दारूचा उग्र वास अजूनही येत होता. तोंड बाजूला करत ती आपल्या नवऱ्याला म्हणाली," उठा आता. पाणी तापले आहे, अंगोळ करून घ्या." असे सांगून ती पुन्हा आपल्या कामाला निघून गेली. परंतु रमेश काही उठला नाही. कुश बदलून पुन्हा झोपी
गेला. थोड्या वेळाने सिंधू पुन्हा तेथे आली. नवरा अजून उठला नाही म्हणून ती फणकाऱ्यात परत त्याच्या जवळ आली आणि त्याच्या खांद्याला पकडून त्याला हलवत बोलली ," उठा म्हणते ना, मला वेळ होतोय." असे म्हणून तिने त्याच्या अंगावरील गोधडी जोराने ओढली आणि बाजूला फेकली. तेव्हा तो नेहमी प्रमाणे कण्हत कुथत उठला आणि बाथरूम मध्ये शिरला. इकडे सिंधू स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करत असताना तिला घरातील एक भांडे सापडत नव्हते. घरात इकडे तिकडे तिने त्या भांड्याचा शोध घेतला. काना-कोपऱ्यात ही पाहिले . पण तिला पाहिजे असलेलं भांडे काही मिळाले नाही. अखेर कुणाला भाजी घालून दिले असेल असा विचार करून त्या भांड्या बाबत तिने आपल्या मुलासह शेजारी-पाजारी विचारणा केली, मात्र तिला भांडे काही मिळाले नाही. शेवटी तिला आपल्या नवऱ्याचा च संशय आला. दारू ढोसण्यासाठी नवऱ्याने ते भांडे कोणाला विकून टाकले तर नाही ना ? या विचाराने तिच्या मनात घालमेल सुरू झाली. आपल्या नवऱ्याचाच काही तरी काळाबाजार आहे. असा तिने तर्क केला. सिंधू भांडे कुठे गेले असे म्हणत असतांना बाथरूम मध्ये आंगोळ करत असलेला रमेश मुखाट्याने तिचे बोलणे ऐकत होता. त्याला ठाऊक होते. की, भांडे आपणच विकले आहे . पण आपण तिला ते सांगू शकत नाही. कारण ती आपल्यावर भयंकर रागवेल. म्हणून घरात सुरू झालेला तमाशा तो मुखाट्याने पाहत होता. तो जसा अंगोळ करून बाथरूम च्या बाहेर आला , तसे सिंधूने त्याला भांड्याबाबत विचारणा केली. एकदा दोनदा तीनदा विचारणा करूनही तो काहीच बोलत नसल्याचे पाहून सिंधू त्याच्यावर भयानक संतापली. नवऱ्याने दारू पिण्यासाठी भांडे विकले असल्याचे स्पष्टपणे तिला जाणवत होते. त्यामुळे ती नवऱ्यावर रागावली आणि त्याच्या बरोबर ती कड्याक्याचे भांडण करू लागली. ती त्याला म्हणाली, " तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो ? दारूसाठी भांडे विकून टाकले. आता मी काय करू ? कसा स्वयंपाक करू ? दारूपायी एकेक वस्तू गेली. आता उरली सुरली भांडी व वस्तू ही विकायला निघाले का ?"
" हो सर्व विकून टाकणार आहे मी !"
" अगदीच कशी लाज नाही तुम्हांला ? जनांची नाहीतर मनाची तरी लाज , का ? दारुसंग ती पण कोबाळून प्याला की काय ?" त्यावर तो चिडून बोलला," हो. प्याली मी दारू आणि दारूसाठीच मी तुझी भांडी विकली."
" लाज नाही वाटत वरून सांगायला."
" लाज मला कशाची वाटणार ? आणि मी काही चुकीचं तर करत नाही ." तशी ती चिडून बोलली," चुकीचं नाहीतर काय आमच्या हिताचं करताय ? " अशी विचारणा करताच
उलट रमेश च तिच्यावर चिडला. आणि बोलला," जास्त भुंकू
नकोस कुत्र्यावाणी ! नाहीतर सर्व दात पाडून टाकेन."
" अरे पण बेवड्या अगदीच कशी लाज सोडलीस तू ?"
" हरामखोर, मला बेवडा म्हणतेस ?" असे म्हणून तिच्या कानशिलावर एक थप्पड ठेवून दिली. सिंधू बिचारी आपला गाल चोळत अश्रू ढाळू लागली. तेव्हा तिच्या मोठ्या मुलीने आपल्या आईला धीर देत तिचे सांत्वन केले. तेव्हा ती म्हणाली," देवाने , आपल्याला असला कसला नवरा दिला."
असे म्हणून तिने आपल्या अश्रूना वाट मोकळी करून दिली. दरम्यान कामावर जाण्याची वेळ झाली. तिने दोघांचा जेवणाचा डबा बांधला आणि मुलांचा निरोप घेऊन मुखाट्याने नवऱ्या बरोबर बिगारी कामाला निघाली.
स्त्री,ला संसार अतिशय प्रिय असतो. मग तो कसा ही असो. एकेक भांडे जमवून ती संसार थाटत असते. घरातले भांडे नवऱ्याने दारू पिण्यासाठी विकून टाकल्याने सिंधुला
खूप दुःख झाले होते. दुपारच्या वेळी जेवण ही तिला गोड
लागले नाही. तिने नवऱ्या बरोबर अबोला धरला. राग केला.
मात्र रमेशवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्याच्या डोक्यात उलटे चक्र सुरू झाले. सिंधू आपल्याला दारू पिऊ देत नाही. सारखी कटकट करते. हिच्या ऐवजी दुसरी बायको करू आणि हिला हाकलून देवू ." असा विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला. तेव्हा पासून तो सिंधुचा तिरस्कार करू लागला. ती त्याला आता नकोशी वाटू लागली. आणि सिंधू पेक्षा त्याला आता दारुच प्रिय वाटू लागली. पण सिंधू चे तसे नव्हते. ती नवऱ्याशी तेवढ्या वेळापूर्ती भांडायची आणि पुन्हा सारे विसरून जायची. तो पूर्ण शुध्दीवर असला म्हणजे तिचे सारे म्हणणे ऐकून घेई. आणि पुन्हा असं करणार नाही. अशी तिची शपथ घेई. पण संध्याकाळी घरी येताना त्याची पाऊल आपोआपच दारूच्या
अड्याच्या दिशेने वळत आणि मग नेहमी प्रमाणेच व्हायचे.
सिंधू फार वैतागली होती. तिला काय करावे ते सुचेना.पण
तरी देखील आपल्या नवऱ्याला दारू पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरूच राही. आज पण रमेशला समजविण्याचा प्रयत्न केला.ती त्याला म्हणाली," तुम्ही फक्त
दारू सोडा. मग बघा आपला संसार किती सुखाचा होईल तो." त्यावर तो चिडून बोलला," काय तुझं ,रोज रोजच एकच
तुमणं दारू सोडा दारू सोडा. मी काय तुझ्या बापाची पितो
की काय ? जी मला रोज रोज तेच सांगत असतेस."
" अहो, पण कुणाच्या भल्याचं , तुमच्याच ना ?"
" माझं कशाचं भलं आहे त्यात ?"
" बरं . तुमच्या भल्याचं नाही. पण आमच्या भल्याचं तरी
बघाल की नाही ?"
" तुमच्या भल्याचं मी का बघू ?"
" म्हणजे काय ? पोरं कुणाची .......तुमचीच ना ?"
" माझी नाहीत पोरं ,फक्त तुझी म्हण."
" काय बोलता तुम्ही हे, शोभतं का तुम्हांला ?"
" का चुकीचं बोललो मी ?"
" चुकीचं नाही तर काय योग्य बोलला का तुम्ही ?
" काय चुकीचं बोललो मी ?"
" हेच की,ही पोर तुमची नाहीत."
" मग खोटं काय सांगितले मी खरंच तेच मी बोललो ना ?"
" तुम्ही मलाच नाही तर मुलांना देखील बट्टा लावताहेत.
पोरं तुमची नाहीत तर काय मी बाहेरून आणलीय ?"
" ते आता तुलाच माहीत."
" म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हांला ?"
" तेच जे तू समजतेस."
" मी काय समजते ? " ती एकदम चिडून बोलली ," बोला ना ? " पण त्यावर तो काहीच बोलला नाही. हे पाहून ती अधिकच चिडून बोलली," कुणी शिवलं आहे का तोंड ?"
" माझं कशाला तोंड शिवेल. मी एकदम स्पष्ट शब्दात सांगतोय ती पोरं माझी नाहीत. फक्त तुझी आहेत, म्हणून मी
आता दुसरं लग्न करणार आहे." असे म्हणताक्षणी सिंधू
एकदम चिडून बोलली," दुसरं लग्न करणार आणि तिला खायला काय घालणार ? ज्याला स्वत:चे पोट भरायची पण
ताकत नाही, तो म्हणे दुसरं लग्न करणार ? बायका काय
वाटेवर पडल्या आहेत?"
" ते तू मला सांगू नकोस.मी उद्या बघ. दुसरी बायको घेऊनयेतो बघ."
" आणून तर बघा. मी अजिबात घरात घ्यायची नाही तिला."
" तू कोण अडविणार मला ? हे घर माझे आहे. मी पाहिजे त्यावेळी तुला घरातून काढू शकतो. काय समजतेस तू स्वत:ला ?"
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा