परिवर्तन-१
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
परिवर्तन-१ |
काकासाहेब मयेकर हे या गावचे एक श्रीमंत गृहस्थ ,तसे
पहायला गेले तर ते गावचे मुळ रहिवाशी नसून ते शेजारच्या
गावातून पाहुणे म्हणून या गावात राहायला आले नि इथलेच होऊन गेले. आता ते या गावचे मुख्य आधारस्तंभ झाले होते.
त्याला कारण या गावचे लोक दुःख आणि दारिद्र यात खितपत पडलेले . या गावच्या लोकांवर या गावातील जमीनदार लोकांचे पूर्णपणे वर्चस्व होते.
सारे गावकरी त्यांच्या घरची चाकरी करत अर्थात त्यांच्या शेतात राबत असत. त्याना त्यांच्या कामाची मजुरी
मिळे ; परंतु फार अल्प प्रमाणात आणि एवढी कमी कशी
मजुरी हे देखील विचारण्याचा त्याना अधिकार नव्हता. मग
अँडव्हास पैसा किंवा धान्य मिळण्याची तर दुरचीच गोष्ट होती आणि काकासाहेबानी मुख्य हेच हेरले की, या गावातील मुलभूत गरजा काय आहेत ? त्या कशा प्रकारे
आपल्याला दूर करता येतील आणि लोकांना आपल्याकडे
कसे वळविता येईल. यासाठी त्यांनी एक नामी उपाय शोधून
काढला. त्यांच्या घरी एक घरगडी म्हणून एक माणूस कामाला होता. अर्थात तो त्याच गावचा रहिवाशी होता. तो
फार गरीब असल्याने त्याचे लग्न सुध्दा झाले नव्हते.
काकासाहेबानी स्वखर्चाने त्याचे लग्न लावून दिले. आणि त्याचे मोडकळीस आलेले घर पुन्हा नव्याने बांधून दिले. त्यामुळे गावकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला.
लोक काही ना काही कामाचे निमित्त करून त्याच्याकडे
जाऊ लागले नि मदत मागू लागले. काकासाहेबाना पण तेच
हवे होते. काकासाहेब त्यांची मदत सढळ हाताने करू लागले. त्यामुळे आपोआपच लोकांचा ओघ त्यांच्याकडे सुरू
झाला. मग काकासाहेब ही एकेकाला विश्वासात घेऊन त्यांच्यावर मोहजाळ फेकू लागले. कोणाला पैशाची मदत तर
कुणाला धान्याची ,ज्याला ज्याची गरज असे ती गरज ते भागवत असत. त्यामुळे च लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले
आणि मग त्यांच्या हाकेला धावू लागले होते. तसा त्यांनी लोकांच्या लाचारीचा फायदा उचलत या गावात शिरकाव केला. त्यांनी लोकांच्या मनावर बिबंविले की , मला तुमच्या
गावात स्थाईक होऊ द्या. मग मी योग्य प्रकारे तुमची मदत
करू शकेन. तुम्हां लोकांना जमीनदारांच्या विळख्यातून
पूर्णपणे मुक्त करीन." लोकांना त्याचे म्हणणे पटले. मग लोकांनीच त्याना या गावात येण्याचे आमंत्रण दिले.
मग एका गावकऱ्यांने आपल्या घरा जवळची जमीन
काकासाहेबाना घर बांधायला दिली. मग काकासाहेबानी त्या
जमिनीवर छोटेसे पण टुंबदार घर बांधले. त्यानंतर हळूहळू
घराच्या आसपास ची मोकळी जागा ही खरेदी करायला
सुरुवात केली आणि लोकांनी पण आनंदाने ती दिली. मग
काकासाहेबानी छोट्याशा घराचे रूपांतर एका मोठ्या भव्यदिव्य वाड्यात केले. आता लोकांचे बसणं , उठणं ,खाणं , पिणं त्यांच्या वाड्यातच होऊ लागले. कारण
आता त्याना रोजगार ही काकासाहेबाकडेच मिळू लागला.
काकासाहेबांच्या हापूस आंब्याच्या खूप साऱ्या बागा होत्या.
त्या बागांत काम करायला खूप साऱ्या मजुरांची गरज असे.
पूर्वी ते दुसऱ्या गावातून जास्त मजुरी देऊन मजूर मागवत असत. परंतु आता त्याना याच गावचे मजूर मोबालक
प्रमाणात मिळू लागले. लोकांना पण काम हवेच होते. लोक
त्यांच्याकडे राबू लागले. त्यामुळे ते आता कामासाठी जमीनदारकडे जाई नसे झाले.
कारण लोकांना काकासाहेबाकडे बारा ही महिने काम
मिळे. शिवाय लोकांना कामाचे पैसे रोख मिळत असत. ऍडव्हान्स ही हवे असल्यास मिळत असत. जास्तच
पैशाची गरज असल्यास त्याना त्यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर कर्ज ही मिळत असे. त्यामुळे लोक फार खुश झाले.
त्यानंतर काकासाहेबानी हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली. म्हणजे काय केले तर गावातील काही गरजू लोकांच्या जमिनी खरेदी केल्या. त्या जमिनीत हापूस आंब्याच्या झाडांची लागवट सुरू केली. अर्थात या साऱ्या गोष्टी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीनेच केल्या. परंतु लोकांना
असे भासविले की, हे सारे मी तुमच्या कल्याणासाठी करतोय.
तुम्हांला नेहमी रोजगार मिळत रहावा हाच त्या मागचा खरा हेतू. लोकांना ही त्यांचे म्हणणे खरे वाटले. अशा मोठ्या कुशलतेने या गावावर आपली पूर्ण पक्कड बसविली.
पण ही गोष्ट या गावच्या जमीनदारांना खटकली. जे लोक आतापर्यंत त्यांच्या इशाऱ्यावर नाचायचे. आता तेच लोक त्याना जुमानत नसत. परंतु काकासाहेबांचा लोकांना
पूर्ण पाठींबा असल्याने आणि काकासाहेबांची पैशांची ताकद
जास्त असल्याने ते काकासाहेबांचे ही काही वाकडं करू
शकत नव्हते आणि आता त्यांची जमीनदारी ही पूर्वी सारखी
प्रभळ राहिली नव्हती. पार खिळखिळी झाली होती. याचे कारण त्यांची भावी पिढी ऐतखाऊ आणि ऐशरामात मग्न होती. खा ,प्या नि मजा करा. बस्स !
शेतावर जायचं नाही. मजुरांवर लक्ष द्यायचा नाही , शेतात धान्य पिकलं किती ,उंदिराने कुतरडलं किती , लोकांनी लुटून नेलं किती ? याचे काही मोजमाफ़ नाहीये.
त्यामुळे त्यांची जमीनदारी लवकरच संपुष्टात आली आणि
आता लोक सुध्दा त्यांच्या शेतात राबायला तयार नाहीत.
याचे कारण त्यांची खंडणी आता परवडण्यासारखी नाही.
वर्षभर शेतात राबून कुळांना तेवढे धान्य मिळत नाही की
तेवढे धान्य जमीन मालकाला ध्यावे लागे. त्यामुळे लोक
त्यांच्या जमिनीत शेती करी नासे झाले. त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्या जमीनदारांना आपल्याला
उपासमार घडू नये म्हणून विकाव्या लागल्या आणि काकासाहेब त्याच संधीची तर वाट पाहत होते. त्यांनी लगेच
त्यांच्या जमिनी मिळतील त्या भावात खरेदी करायला सुरुवात केली आणि त्या जमिनीत हापूस आंब्याच्या बागायती उठू लागल्या होत्या.
काकासाहेब अधिक अधिक धनवान बनत चालले होते.
तर त्यांच्या विपरीत जमीनदारांची अवस्था होती. त्यात काही
अपवाद म्हणून धनवान जमीनदार ही होते. त्यातले एक जमीनदार म्हणजे निळकंठ गोखले त्यांचे नाव गावचे पोलीस पाटील म्हणजे गावचे न्यायाधिशच म्हणांना. गावातील भाडणं-तंटे तेच सोडवत. त्यांच्या पत्नीचे नाव होते पार्वती पण ते त्याना पारु म्हणत आणि मुलाचे नाव होते त्र्यंबकराव. हा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेऊन चालणारा मुलगा होता. त्याचे वय २५ वर्षे अंदाजे असेल . दिसायला गोरा गोमटा पण दात थोडे पुढे फाकलेले ,डोळे घारे, उंची पाच फूट असेल. त्यांच्या पत्नीचे नाव सौ. शशिकलाबाई गोखले. वय २० ते २२ वर्ष असेल, दिसायला सडपातळच , वर्ण गोरा,लांबलचक केस,कमरेपर्यंत , निळे पाणीदार डोळे , स्वभाव मनमिळावू , त्याना एक दोन वर्षांचा मुलगा ,वर्ण गोरा , केस कुरळे ,नाक थोडेसे बसके पण उठावदार.
काकासाहेब या गावात येण्यापूर्वी सारे गावकरी निळकंठराव कडेच कामाला असत. परंतु आता त्यांच्या शेतात राबायला माणसे मिळत नसत. मजुरी वाढवून देतो
म्हटले तरी लोक त्यांच्याकडे कामाला जायला तयार नसत.
याचे कारण ते मजुरांना त्यांच्या कामाचे पैसे वेळेवर देत नसत आणि दिली तरी एकदम पूर्ण देत नसत. आज थोडी घ्या. बाकीची उद्या घ्या. असे ते करत असत आणि मुळात
तेच लोकांना आवडत नसे. काम झाले की लगेच त्यांच्या हातावर मजुरी मिळायला पाहिजे तरच ते माणूस खुशीने काम करतो आणि ते सुध्दा प्रमाणापेक्षा जास्त. कारण गरीब
कष्टकरी लोक घाऊक सामान घरात भरत नसत. रोज थोडे थोडे पैसे असतील त्या प्रमाणे किराणा दुकानातून जिन्नस
खरेदी करीत असत. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज मजुरी मिळाली नाही तर उपासमार पडण्याची शक्यता जास्त असते. पण काकासाहेब तसे नव्हते. पैसे रोजच्या रोज मिळत असत. त्यामुळे लोक काकासाहेबांच्या शेतात राबनेच पसंत करत. आणि त्यामुळेच काकासाहेबांचे निळकंठराव कट्टर वैरी बनले होते. इतकेच नाही तर काकासाहेबांनी , निळकंठराव कडे असलेली पोलीस पाटीलकी सुध्दा हिसकावून घेण्याचा बेत केला. त्यासाठी लोकांना निळकंठरावांच्या विरुद्ध भडकवायला सुरुवात केली. त्यांनी लोकांना दाखवून दिले की, दरवर्षी शासनाकडून मिळणाऱ्या सवलती , शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ग्रामपंचायत कशी
गिळंकृत करते , लोकांना कसे फसविले जाते याची सविस्तर
माहिती त्यांनी लोकांना दिली, आणि शेवटी म्हणाले," त्या
साठी आपलीही काही माणसे त्या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत
असायला पाहिजेत. तरच शासनाच्या साऱ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील. तेव्हा एक खेडूत म्हणाला," ते
सगळं खरंय काकासाहेब पण.......?"
" पण काय ?"
" आम्ही अनाडी माणसं , आम्हाला काय कळतं त्यातलं ?"
" कळेल. सगळं कळेल. पण त्यासाठी गावातील तरुण
मुलं जी थोडीफार शिक्षण शिकली आहेत. अशा तरुणां मधून
काही सदस्य निवडायला हवेत. लोकांना त्यांचे म्हणणे पटले'
आणि मग काकासाहेबांनी काही तरुणांची निवड केली.
प्रत्येक वेळी बिनविरोध होणारी निवडणूक यावेळी प्रथमच
प्रतिस्पर्धी ने लढविली गेली. आणि त्यात काकासाहेबांनी
निवड केलेले तरुण उमेदवार सारेच्या सारे निवडून आले.
आणि पोलीस पाटील च्या सीट साठी काकासाहेबांनी आपल्या पुतण्याला उभे केले. तो ही निवडून आला. त्यामुळे
निळकंठरावांच्या पाया खालची जमीन सरकली. त्याना आपला भविष्य काळ अंधकारमय दिसू लागला. नेहमी सत्ता
भोगलेल्या माणसांना सत्तेशिवाय जगणं फार कठीण आहे.
हेच खरे !"
निळकंठराना सुद्धा चैन पडेना ,काही करून वैऱ्यांच्या
हाती गेलेली पोलीस पाटीलकी वापस हस्तगत करायची हे
त्यांचे एकमेव उद्दिष्ट त्यासाठी त्यांनी एक नामी आयडिया
शोधून काढली. काकासाहेबांचा पुतण्या या गावचा स्थानिक
रहिवाशी नव्हता. त्यामुळे तो या गावचा पोलीस पाटील
बनू शकत नाही. हे एकमेव कारण त्याला पोलीस पाटील च्या
खुर्चीवरून हटविण्यास पुरेसे होते. निळकंठरानी त्या संधीचा फायदा उचलत त्यांनी एक अर्ज जिल्हा परिषदला पाठविला. त्यात त्यांनी असे नमूद केले होते की, सदाशिवराव
हे आमचे रहिवाशी नसून ते पालकरवाडीचे रहिवासी आहेत.
अर्थात त्याना आमच्या गावची पोलीस पाटील की मिळू
नये. ती आमच्याच गावच्या रहिवासास मिळावी. ही नम्र विनंती. असा अर्ज लिहून त्यावर काही गाववाल्याच्या साह्य घेतल्या नि पाठवून दिला.
सत्यता पडताळून योग्य तो निर्णय घेण्यात आला. सदाशिवरावाना फक्त पालकरवाडीची पोलीस पाटीलकी
मिळाली. पण वाडा या गावाने लवकरात लवकर आपला नवीन उमेदवार निवडावा. अशी त्याना ताकीद देण्यात आली.
निळकंठरांनी नवीन उमेदवार म्हणून स्वतःचे नाव न देता त्रंबकरावांचे दिले.
पण काकासाहेब ही महावस्ताद त्यांनी लगेच नवीन खेळी केली. वैऱ्यांचा वैरी तो आपला मित्र ही नीती वापरून
त्यांनी निवडणूक रिंगणात आप्पासाहेबांना उतरविले.
आप्पासाहेबावर लोकांची विशेष मर्जी होती. त्यामुळे ते सहजच निवडून आले.
निळकंठरावांची मात्र तळ पायाची आग मस्तकाला
जाऊन भिडली. नाकापेक्षा मोती जड अशी मराठीत एक
म्हण आहे. अगदी तीच अवस्था निळकंठरावांची झाली.
कारण एकवेळ काकासाहेबांचा पुतण्या परवडला असता.
आप्पासाहेब मूर्तिमंत इमानदार आणि मुत्सद्दी आणि धोरणी
माणूस होते. त्यांच्या शी टक्कर घेणे म्हणजे वाघाशी झुंज घेण्यासारखे आहे. शिवाय अशी माणसं राजकारनात फार खतरनाक असल्याचं सिध्द झालंय. ना स्वतः खात काही ना
दुसऱ्याना काही खाऊ देत. इमानदारी जणू त्यांच्या नसा नसात भिनलेली.
काकासाहेबांना सुध्दा त्याचा लवकरच प्रत्यय आला.
घडले असे की, त्यांचा मुलगा विलक्षण एका मास्तरणीच्या
प्रेमात पडला. खरे म्हणाल तर ते प्रेम नव्हते केवळ आकर्षण
होते. आणि त्याला कारण पण तसेच होते. मास्तरीन दिसायला खूप सुंदर होती. तिचे सौदर्य वाखाण्याजोगच होते.
वर्ण गोरापान ,पाणीदार रेखीव डोळे , लांबसडक कमरेपर्यंत
केस, चाफेकळी नाक, हनुवटीवर काळा तीळ, ती हसली की
तिच्या गालाला खोल खड्डा पडायचा. गावातील तर सोडाच
पण वयस्कर माणसं ही क्षणभर तिचं मनमोहक रूप डोळ्यात
साठविण्याबिगर राहात नसत. अश्या रूप सुंदरीच्या प्रेमात
न पडेल तो जितेंद्रियच म्हणावयास हवा. सारे गाव तिच्यावर
मरत होते. पण तिचे प्रेम जडले ते फक्त विलक्षणवरच !
गावात एक माध्यमिक विद्यामंदिर होते. त्या विद्यालयात
एक नवीन शिक्षिका आली. नाव तिचे होते चंद्रकला. दिसायला खूप सुंदर होती म्हणून गावातील काही आंबट शौकी लोक तिच्या पाठलागावर असत. परंतु ती कुणालाही
भाव देत नसे. काकासाहेबांचा मुलगा विलक्षण ही तिच्यावर
लाईन मारत असे. प्रथम त्याला सुध्दा ती भाव देत नव्हती.
परंतु नंतर हळूहळू ती सुध्दा त्याच्यावर प्रेम करू लागली.
विलक्षण फक्त तिला खेळवत होता. तिच्यावर आपले
अतूट प्रेम असल्याचे तो तिला फक्त भासवत होता. आणि ती
त्याच्या फसव्या भूल थापाणा बळी पडली नि नको ते कर्म
करून बसली. त्याला आपलं सर्वस्व देऊन बसली. परिणाम व्हायचा तोच झाला. विलक्षण पासून तिला दिवस गेले. तिला
जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने सर्वात पहिल्यांदा ही बातमी
विलक्षण ला दिली. तिला वाटले की, ही गोड बातमी ऐकून
विलक्षण ला फार आनंद होईल. मात्र घडले उलटेच विलक्षण ने आपली जबाबदारी नाकारली. उलट तो तिला दोष देऊ लागला . तो तिला बोलला की, चूप चांडाळणी ! कुणाचेही पाप माझ्या माथी मारू पाहतेस." तेव्हा ती त्याला गयावया
करत म्हणाली ," विलक्षण , तुझ्या व्यतिरिक्त मी माझं शील
कुणालाही दिलं नाही . तेव्हा हे तुझेच मुल आहे."
विलक्षण रागाने उद्गारला," गप ए भावाने , सारा गाव तुझ्यावर मरतोय हे मला ठाऊक नाहीये का ? दुसऱ्या कुणाबरोबर निजली असशील आणि आता अंगाशी आले तेव्हा माझं नाव घेतेस होय ? रांड कुठली !" पुन्हां आवार्च्छ
भाषेत शिवी हासडली. आता मात्र चंद्रकलेला सहन झाले नाही. ती रागाने म्हणाली," जरा तोंडाला आवर घाला विलक्षण शेठ रांड कुणाला म्हणता ? मी बाजारात बसणारी
वेश्या नाहीये. चांगली घरंदाज घराण्यातील मुलगी आहे."
" घरंदाज आणि तू !" विलक्षण कुत्सितपणे हसला. आणि
खवचट पणे बोलला," घरंदाज घराण्यातील मुली आपलं शील खिरापती सारखे रस्त्यावर वाटत फिरत नसतात. ते फक्त एकालाच देतात. ते पण लग्न झाल्यावरच आपल्या
नवऱ्याला देतात. समजलीस !"
" विलक्षण शेठ ,जर मी तुम्हाला माझी अब्रू दिलीय तर
तुमची पण इज्जत बेचिराख करू शकते मी. समजता काय
स्वतःला ." असे म्हणताच त्याने तिचा गळा पकडला नि उद्गारला ," काय म्हणालीस ,मला बदनाम करणार ? माझं नाव तर घेऊन बघ. मग बघ कशी उभी चिरतो तुला." असे बोलून तिला त्याने जोरदार धक्का दिला. अचानक धक्का बसल्याने तिला स्वतःचा तोल सांभाळता आला नाही. ती मागे असलेल्या स्टूलाला अडखळून जमिनीवर कोसळली. पण लगेच उठून उभी राहते. तसा तो पुढे म्हणाला," आता एकवेळ सोडतो तुला. पण पुन्हा जर का
माझं नाव घेशील तर जीवानिशी जाशील. हे ध्यानात ठेव."
असे म्हणून तो त्वशाने निघून जातो, तो गेलेल्या दिशेकडे
पाहत ती उद्गारली," जीव गेला तरी बेहत्तर पण तुला अशी
सहजासहजी सोडायची नाही मी. जर तुला चंद्रकलेचे ग्रहण नाही लावले तर नावाची मी चंद्रकलाच नाही मी !" असे म्हणून ती सरळ आप्पासाहेबांच्या घरी जाते.
क्रमश:
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा