यह इश्क नहीं आसान ५ (अमर प्रेम )
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
यह इश्क नहीं आसान ५ |
निलोफर ला तिला तिच्या घरी सोडून रुद्र आपल्या घरी
पोहोचला. घरात पाऊल ठेवले मात्र तोच समोर आजी
म्हणजे दुर्गाबाई दत्त म्हणून उभ्या दिसल्या. परंतु त्यांच्या
कडे न पाहिल्या सारखे करत रुद्र आपल्या खोलीत निघालाच होता. तोच दुर्गाबाईंच्या खणखर आवाजाने त्याच्या पायांना ब्रेक जसा लागला जणू ! तो मागे वळून आपल्या आजीकडे पाहू लागलाच होता, तोवर आजीने त्याला दरडावून विचारले," कोठून आला भटकून ? नाही म्हणजे तुला भेटकण्या व्यतिरिक्त काम नाही ना दुसरे म्हणून विचारते " आजी फार राग आला होता मनात परंतु शक्य तितके स्वतःवर संयम ठेवत रुद्र म्हणाला की, आजी मी गाव भटकायला गेलो नव्हतो तर एका मित्राच्या घरी गेलो होतो, नोट्स मागायला." त्यावर दुर्गाबाई उतरल्या ,
" तू रोज जातोस ना कॉलेज ला ? का कॉलेज मध्ये जायचं सांगून कोठे भटकत असतोस उनाडक्या मुलासोबत ?"
" आजी मी उनाडक्या करायला जात नाही. रोज
कॉलेज मध्येच जातो खोटं वाटत असेल तर कॉलेज मध्ये
प्रिन्सिपल सरांना भेटत का नाहीस ? मग सरच खरं काय
ते सांगतील."
" मला ते नाही म्हणायचंय."
" मग काय म्हणायचं तुला आजी ?"
" तू रोज कॉलेज मध्ये जातोस तर तुला तुझ्या मित्रांच्या
नोट्स का मागावे लागतात. मास्तर शिकवीत असताना
लक्ष कोठे असते तुझं ?" आता रुद्राच्या लक्षात आलं की
आजी असं की म्हणाली ? तसा तो तिला समजावत म्हणाला," आजी ती मुलं ट्युशन ला जातात. कारण क्लास वाले चांगले समजावून शिकवितात. तेवढं चांगलं
कॉलेज मध्ये शिकविले जात नाही. आणि मी ट्युशन ला जात नाही. म्हणून मला मित्रांकडून नोट्स घयावे लागतात.
आता तरी कळलं का ?" आजी विचारात पडली की क्लास चे शिक्षक चांगले शिकवितात मुलांना झटकन
समजतं. मग काम कॉलेज चे शिक्षक का नाही चांगलं
शिकवत? पगार घेतात ना ? मग चांगलं शिकवायला काय
झालं त्यांना ? " तसा रुद्र मनात म्हणाला," कॉलेज च्या
शिक्षकांनी मुलांना समजेल अशा भाषेत जर शिकविले तर
त्यांचे क्लास बंद होतील ना ? कारण ट्युशन ला कोणीच
जाणार नाही."
" तुझं लक्ष नसेल त्यांच्या शिकविण्यावर त्याला ते काय करतील. बरं ते जाऊ दे.शिकलास तेवढे पुरे झाले.
आता बापा कडून पुरोहिताचे काम शिक म्हणजे बापाच्या
कमाईत तेवढी भर पडेल."
" भटजी चे काम मी नाही करणार , लोकांना लुबाडायचे आहे ते काम ?" रुद्र म्हणाला. त्यावर त्या चिडून म्हणाल्या," काय म्हणालास ? लोकांना लुबाडायचे काम ? हां पूजापाठ करायच्या कामाला लोकांना लुबाडायचे काम म्हणतोस ? होय रे ?"
" लुबाडायचे नाहीतर काय ? पूजा सांगायची एवढी
का दक्षिणा असते ? भटजी ने कसं लोकं स्वखुशीने देतील
ती दक्षिणा घ्यायची असते. पण नाही गिर्हाईक पाहून पुडी
बांधायची मोठी आसामी असेल तर भक्कम दक्षिणा
मागायची असते. सत्यनारायण ची पुजा सांगायची आहे तर पाच हजार, साखर पुडा असेल तर कमीत कमी तीन हजार रुपये आणि लग्न असेल तर विचारूच नका. आजी
ह्याला लुबाडणे नाहीतर आणखीन काय म्हणावयाचे ?
आणि आजी लोक काय स्वखुशीने देत नाहीत काही एवढी
दक्षिणा नाईलाजाने देतात. कारण ब्राम्हंणाने पूजा केल्या
शिवाय देवाला मान्य होणार नाही.असे भाविक लोकांचे
मत आहे, त्याचाच फायदा ब्राम्हण घेतात. बस्स दुसरे काय ?"
" बस्स बस्स कळली तुझी अक्कल ! म्हणे आम्ही
लुबाडतोय. महागाई किती वाढलीय त्या प्रमाणे लोकांकडून दक्षिणा घेतली नाहीतर भीक मागायची पाळी
येईल आपल्यावर."
" असला भिक्षुकीचा धंदा करायचाच कशाला म्हणतो
मी ? त्या पेक्षा एखाद्या कंपनीत नोकरी केलेली काय वाईट
आहे ? निदान लोकांचे शिव्याशाप तर मिळणार नाहीत."
" तू कारकुनीच कर, दुसरे काही होणारच नाही तुला.
कारण तुझी आई खालच्या जातीची म्हटल्यावर तिच्या
पोटी आलेल्या मुलाचे विचार काय उच्च कोठीचे थोडेच
असणार आहेत. ?" तशी शारदाबाई चिडून मध्येच
म्हणाली ," सासूबाई , उगाच माझ्या नावाचा डंका पिटु नका. पोरगं काय फक्त माझंच आहे, तुमच्या मुलाचा त्यात
काहीच सहभाग नाहीये."
" आहे ना, मी कुठं नाही म्हणते, पण त्यात अर्ध रक्त
तुझं पण तर आहे ना ?"
" माझं अर्ध रक्त असलं म्हणून काय झालं ? बीज तर तुमच्या मुलाचंच आहे ना ? जसं झाड तसं त्याचं बी ! त्यात माझा काय दोष !"
" दोष कसा नाही ? ब्राम्हणांचा पुत्र असून भटजी चे काम नाही करणार म्हणतो. हे तुझ्यामुळेच झालं ना ?
मच्छी खाणारी तू तुला काय माहीत असणार ब्राम्हणांचे
काम ?"
" चांगलं माहीत आहे, नि आज काल ची शिकलेली
सवरलेली मुलं भटजी चे काम करायला नाही तयार होतं.
आणि मच्छी चे म्हणाल तर ज्या दिवशी ह्यांच्याशी माझं
लग्न झालं त्या दिवसापासून मी मच्छी खाणं सोडलं हो
सासूबाई !"
" आता खात नाहीस पण अगोदर तर खात होतीस ना ?"
" मग काय ते अजून राहिलंय पोटात, आणि तसे पण
आजकाल ब्राम्हण ही खायला लागले आहेत मच्छी मटण
मग कशाचे राहिलं ब्रम्हणपन फक्त नावाला ब्राह्मण कुळात
जन्मला आलाय म्हणून ?" दोघीचें भांडण वाढत चाललेले
पाहून रुद्र मध्येच त्या दोघींना गप्प करण्यासाठी म्हणाला,
" आई आणि आजी तुम्ही दोघी पण गप्प बसा पाहू !"
" तुझ्या आजी ला सांग आधी गप्प बसायला. मगच मी
गप्प बसेन."
" वा गं मी का गप्प बसेन ? खरं तर मी माझ्या नातवाला बोलत होते तू का मध्ये पडलीस ? उगाचच भांडण करायला ?"
" माझ्या जातीचा तुम्ही उद्धार केला नसता तर मी मध्ये
बोललेच नसते."
" करणार, तुझ्या जातीचा मी उद्धार नेहमी करणार ?"
" मग मी ही गप्प बसणार नाही."
" आई , तू तरी आता गप्प बसते का ? का मी जाऊ कुठंतरी निघून." असे म्हणताच त्या दोघी चपापल्या नि लगेच शांत झाल्या. तसा रुद्र आपल्या खोलीत निघून गेला. तश्या दुर्गाबाई त्याच्या पाठमोरी आकृती कडे पाहत उद्गारला," घ्या. कोणाला रितीचे सांगायला नको की लगेच भीतीला डसते. नको करू भटजींचे काम ? कारकुनी करत बैस आयुष्यभर ! माझं मेली बापडीचं काय जातंय ?" असे म्हणून त्या आंत मध्ये जायला वळत असतात तोच बाहेरून विद्याधरपंत येतात. हातात त्यांच्या समानाने भरलेली पिशवी असते. बहुधा कोणाच्या तरी.घरी सत्यनारायणाची पुजा सांगायला गेले होते तेथून पूजा आटपून घरी परतले असावेत. दुर्गाबाईचे शेवटचे वक्तव्य त्यांनी ऐकले असावे. म्हणून त्यांनी आंत पाऊल
टाकताच विचारले ," आई, काय झालं कुणावर राग काढतेस एवढा ?"
" कुणावर म्हणून काय विचारतोस ? तुझ्या चिंरजिवा वर काढते मी राग."
" का बरं ? आता आणि काय केलं त्याने ?" विद्याधरपंतानी न समजून विचारले. त्यावर त्या म्हणाल्या,
" तो काही करतच नाही हाच तर खरा वादाचा मुद्दा आहे."
" म्हणजे ? मी नाही समजलो. " विद्याधरपंत
" त्याला मी म्हटलं की, आता तू कॉलेज जायचे सोड
नि वडिलोपार्जित भटजींचा धंदा करायला शिक. तर म्हणे
मला नाही भिक्षुकीचा धंदा करायचा."
" अगं आई, त्याची इच्छा नाही भटजींचे काम करायची
तर नको करू दे ना ?"
" मग काय नोकरी करायला सांगतोस त्याला ?"
" हो मग त्यात काय ? पुरोहिताचे काम आज काल ची
मुलं करायला मागत नाहीत.त्यात कमीपणा वाटतोय त्यांना. म्हणून ब्राम्हण लोक सुध्दा आता जॉब करायला
लागलेत."
" मग काय पीडिजात धंदा बंद करायचा ?"
" त्याना नको असेल हा पीडिजात धंदा तर नको करू दे
ना."
" तुझी अक्कल कुठं शेण खायला गेली का रे ? म्हणे
पीडिजात धंदा नसेल करायचा तर नको करू दे.मी म्हणते
महिन्याला दहा नाहीतर वीस हजार रुपये कमविण्या पेक्षा
भटजीचा धंदा वाईट आहे ? मला कल्पना आहे पूर्वी ह्या
धंद्यात काही एवढा फायदा नव्हता.परंतु आता ब्राम्हण
पूजा करायला किती पैसे घेतात माहितेय ना ? आणि
लोकं देतातही तेवढी दक्षिणा."
" अग आई, आजकाल लोक ब्राम्हणांला दक्षिणा स्वखुशीने देत नाहीत. द्यायची म्हणून देतात. कार्यक्रमाला
भरपूर पैसे खर्च करतात. त्यावेळी त्याचं काही वाटत नाही
त्यांना, पण ब्राम्हणाला दक्षिणा द्यायची म्हटली की त्यांच्या
अगदी जीवावर आलं. म्हणणार गुरुजी दक्षिणा जरा कमी करा, एवढी कोठे दक्षिणा असते होय ? मग काय करावी
लागते दक्षिणा थोडी कमी ! काय करणार गिऱ्हाईक हातचं
जाऊ द्यायचं नसतं.म्हणून तडजोड ही करावीच लागते."
" मग अगोदरच जास्त सांगायचं पैसे .म्हणजे कमी करून मागितले की द्यायचे तेवढे करून, म्हणजे भटजी बुवांनी दक्षिणा कमी घेतली म्हणून यजमान खुश नि आपल्याला आपली फी मिळाली म्हणून भटजी खुश आहे
की नाही मजाच मज्जा !"
" आई, लोक आता वेडे नाही राहिलेत आता ! त्यांना
चांगलेच माहीत असतें की कोणत्या पूजेची दक्षिणा किती
असते लोकांना फसविणे सोपं नाहीये."
" काय तू सांगतोस सोपं नाहीये.काळसर्फ योग , नागबळी , ग्रहशांती सारख्या पुजाना कमी पैसे घेतात
का ब्राम्हण लोक. दहा काय नि वीस काय तोंडात येतील
तेवढे पैसे घेतात."
" ते चुकीचे आहे, असं नाही वाटत तुला ?"
"त्यात चुकीचं काय आहे ? "
" चुकीचं नाहीतर काय ? एवढे पैसे लागत नाहीत काही पण-- ?
" पण लोकं देतात हेच म्हणायचंय ना तुला ?"
" हो."
" अरे लोकांना काय हवं असतं तर सुख - मग सुख
मिळविण्यासाठी थोडा-फार खर्च करावा लागणार ना ?"
" अगं पण खरंच सुख मिळते का त्यांना ?"
" मिळत असेल ना, म्हणून तर एवढा खर्च करायला
तयार होतात ना ?"
" इथंच तर खरी गोम आहे."
" म्हणजे ?"
" म्हणजे नुसतं भासवायचं बस्स ! भोळ्या भाबडे लोक
चटकन विश्वास ठेवतात आमच्या सांगण्यावर. पण त्याना
काय माहीत, खरंच दोष गेला किंवा नाही ?"
" अरे मग यालाच तर म्हणतात की दुनिया झुकते फक्त
त्याला झुकविणारा पाहिजे बस्स ! आणि तेच काम तू करत आहेस."
" पण मला नाही आवडत हे असं लोकांना फसविण्याचे काम!"
" मग काय हातात झोळी घेऊन दारोदारी हिंडण्याचा
विचार आहे का तुझा ?" त्यावर विद्याधरपंत काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपल्या हातातील पिशवी आपल्या पत्नीच्या हातात दिली नि ते बाथरूम च्या दिशेने निघाले.
रुद्र आपल्या खोली येऊन पलंगावर बसला नि विचार करू लागला त्याच्या आजीने सांगितलेल्या गोष्टीवर, परंतु त्याला सुध्दा आपल्या वडीला प्रमाणे लोकांना फसविणे
आवडत नसते.कारण श्रीपाद वल्लभ या चरित्र्य ग्रंथात
स्पष्टपणे सांगितले आहे, की ब्राम्हणांनी यजमानांना कडून
दक्षिणा जेवढी घेण्याचे निश्चित केली आहे तेवढीच घ्यावी.
जास्त घेतल्यास त्या यजमानाच्या वाट्याचे पाप सुद्धा
आपल्या पदरात घ्यावे लागेल.कारण इश्वर कोणालाही
माफ करत नाही.प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा त्याने
निश्चित केलेली असते. ती घ्यावीच लागते.त्यात कोणाचीही सुटका नाहीये. म्हणून मला हे लोकांना लुबाडायचे काम जमणार नाही. परंतु लोक कल्याणाचे
काम तर करायला काय हरकत आहे.अर्थात बाबांकडून
ही विद्या मला शिकायलाच होईल.म्हणजे आजीला पण
बरे वाटेल.आणि समजा भटजींचे काम मी शिकलो नाहीतर आजी नेहमी असाच आई चा उद्धार करत राहणार , त्यापेक्षा मी भटजींचे काम शिकून घेतो. असा
मनात निश्चय करून एके दिवशी तो आपल्या धाकट्या
भावाला अर्थात प्रेम ला म्हणाला," प्रेम , मला पण शिकवायचे तुझ्या सारखे भटजी काम ? " त्यावर प्रेम
म्हणाला ," मग शिक ना नको कोण म्हणतोय ?"
" पण तू मला शिकवशिल ना ?"
" मीच शिकतोय तुला काय शिकविणार त्यापेक्षा तू
बाबांकडून शिक ना, जसा मी शिकतोय."
" बाबा बोलणार नाहीत ना काही ?"
" कशाबद्दल आणि काय बोलतील बाबा ?"
" अरे म्हणजे मी अगोदर शिकायला तयार नव्हतो ना ?
म्हणून मला बाबांना सांगायला कसंतरी वाटतंय."
" त्यात काय उलट बाबांना आनंदच होईल.त्यांचा वाया
गेलेला पोरगा सुधारला म्हणून."
" काय म्हणालास ? मी वाया गेलेला आहे काय ?"
" म्हणजे असं बाबांना वाटतं."
" बाबांना वाटतंय काय ? आणि तुला रे ?"
" मला पण तेच वाटतंय."
" असं काय ? थांब तुला बघतो मी आता." असे म्हणून
त्याच्या अंगावर धावून जातो तसा प्रेम पळ मारतो.तो
पुढे नि हा मागे असा त्यांचा लपंडाव खेळ सुरू होतो.
तेवढ्यात तेथे दुर्गाबाई येतात. दोघांना पळताना पाहुन
त्या उद्गारला ," अरे अरे तुम्ही दोघे लहान झालेत काय आता ? लहान मुलासारखे उंडरायला ? " परंतु तिच्या
बोलण्याचा त्या दोघांवर काहीच परिणाम झाला नाही.
उलट प्रेम दुर्गाबाईच्या मागे लपला. तश्या दुर्गाबाई उद्गारल्या," अरे अरे , म्हातारीला पाडाल .तुमचा होईल खेळ पण म्हातारीचा जाईल जीव !" तेवढ्यात तेथे शारदाबाई आल्या नि आपल्या मुलांवर रागवत म्हणाल्या ," रुद्र, प्रेम काय चाललंय तुम्हां दोघांचे, जरा गप्प बसता येत नाही काय ? चला पाहू आपापल्या खोलीत ." तसे ते हिरमुसल्या सारखे होऊन आपापल्या खोलीत निघून गेले. तश्या दुर्गाबाई उद्गारल्या," एवढी मोठी
मुलं झालीत, पण त्यांना वळण असे नाही. कसं असणार
शेवटी काय खाण तशी त्याची माती नाही का ?" दुर्गाबाईनी त्याना टोमणे मारण्याची संधी काही सोडली नाही. पण शारदा बाई गप्प थोड्याच बसणार त्यांनी
आपल्या सासूबाईला सडेतोड उत्तर देत म्हटलं," पण
सासूबाई खाण कशी असली तरी त्या खाणीतील माती
कोण काढतोय आपलेच चिरंजीव नाही का ?" तश्या
त्या संतापाने म्हणाल्या ," आजकाल तुझी जीभ खूपच
चुरचुरू बोलू लागली आहे, जिभेवर डाग नि देईन तेव्हा
कळेल. कसं पुढे बोलायला हवं ते."
" ते काय नवीन आहे लग्न करून या घरात आल्यापासून छळताहेतच आहात तुम्ही मला."
" छळेंनच काय करशील ?"
" मी काय करणार, गरीब गाय जी मिळाली आहे पाहिजे तेवढं छळून घ्या तिला."
" अगं एकुलता एक मुलगा म्हणून मी काही करू शकले
नाही, नाहीतर तुला या घरात थारा दिला नसता."
" ते काय तुम्ही मला सांगायला हवं ? ते मला माहितीच
होतं." दोघींचा भांडण ऐकून विद्याधरपंत बाहेर नि त्या
दोघींना उद्देशून ते म्हणाले," झालं पुन्हा तुमचं सुरू ?
घरात अजिबात शांती ठेवू नका."
" ते तुझ्या बायकोला सांग."
" मला का ? अगोदर सुरुवात कोणी केली ?" शारदा
तसे विद्याधरपंत चिडून म्हणाले ," ए माझे आई आता
तू तरी गप्प राहते का ?" तश्या शारदाबाई नाराज होत
म्हणाल्या ," नेहमी मलाच का सांगता ? आपल्या आईला
का नाही बोलत ?" असे म्हणून त्या तणतणत स्वयंपाक
घरात निघून गेल्या.आपल्या मुलाने आपला पक्ष घेऊन
आपल्या बायकोला दम दिला याचा आसुरी आनंद झाला
त्यांना. पण तरी देखील अजून आगीत तेल ओतण्याचे
काम करत त्या म्हणाल्या ," पाहिलेस कशी झंकाऱ्याने
गेली ती." तसे विद्याधरपंत म्हणाले ," हां पाहिलं पण आता तू सुरू नको होऊस आई !"
" मी काय केलं रे, चांगलं पण सांगायला नको तुम्हां
लोकांना,नेहमी भांडत असता."
" तुला आपली मीच दिसते, आपल्या बायकोची करतूत
दिसत नाही."
" काय आई तू पण नेहमी बायकोच्या मागे लागतेस ?"
" मी लागते मागे, मला उद्योग नाही का दुसरा?"
" आई , आई कसं समजावू मी तुला."
" मला काहीही समजवू नकोस.जा बायकोची समजूत
काढ आपल्या.माझं मेलीच काय आज आहे तर उद्या नाही." विद्याधरपंताना कळत नव्हतं की सासू-सुनेची
समजूत कशी काढावी ?
क्रमशः
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा