भिऊ नकोस
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भिऊ नकोस |
(सत्य घडलेली घटना)
एकदा काय झाले. आमच्या गावात चोर शिरल्याची खबर पसरलेली.कुणी म्हणे अमक्या गावात शिरले नि चार-पाच लोकांची घरे लुटली.तर कुणी म्हणे चोरांचा जो मोरक्या आहे त्याच्या पायात स्प्रिंगवाले शूज आहेत.त्यांने वरून उडी मारली की उंच उडतोय चेंडूवाणी.असं रोज नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळत होत्या.त्यामुळे चर्चेला तर उधाण आले होते.
आम्हा लहान मुलांची तर भितीनं गाळण उडाली होती.संध्याकाळ झाली की,कुणी घराच्या बाहेर पडेना.आणि रात्र पडली की विचारूच नका.कुणीही ह्या घरातून त्या घरात जाईना.न जाणो काळोखात आधीच चोर येऊन लपला असेल तर कुणी सांगावे. प्रत्येकाला स्वत:च्या जिवाची पर्वा.लहानापासून मोठ्यांपर्यंत.
दिवसादेखील रानावनात एकटादुकटा कुणीही फिरकत नसे.जायचंच झालंच तर चार-पाच जणांना सोबत घेऊन जायचं. ते पण खाली हात नाही. हातात दांडे-बंदूक शिवाय एक सोबत कुत्राही असे.अशी भयानक आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती.काय करावे ते कुणालाच सुचत नव्हते.
आजूबाजूच्या गावात दरवडा पडला. नि लोकांची घरे लुटली. गेल्याच्या खबरी रोज कुठून ना कुठून मिळायच्या. त्यामुळे खरे काय नि खोटे काय याची कुणीही दखल घेत नसे.
खरेच चोर शिरलेत का ? केवळ अफवा आहेत. हेही कुणाला सांगता येईना. आम्ही मुलं तर रात्रीचं मुतायला झाले तरी घरातून बाहेर न पडता खिडकीतून बाहेर सोडून द्यायचो. एवढी भीती आमच्या मनात बसलेली.
आणि एके दिवशी आमच्यावर अशी वेळ आली की , आमचे घरचे भाकरीचे पीठ संपलेले होते.कुणाला ना कुणाला तरी घराच्या बाहेर पडायलाच लागणार होते.त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
त्यावेळी आमच्या गावात चक्की नव्हती.पण आमच्या जुण्या गावात म्हणजे आजोबा आजींचे गाव.आम्ही दुसऱ्या गावात राहत होतो.जुण्या गावाचे नाव होतं आंबेरी.आणि आम्ही राहत असलेल्या गावाचे नाव होते नाणार आणि दोन्ही गावांच्या मध्ये विजयदुर्गची खाडी. त्यामुळे आंबेरीला जायचं झालंच तर नावेनं (तर) पलीकडे जावं लागे.पण दोन्ही गाव अलिकडे पलिकडे नव्हते तर एकमेकांपासून खूप दूर होते.कमीत कमी पाच कोस दूर किंवा त्यापेक्षा जास्तच अंतर दोन गावामधले असेल.पण त्यापेक्षा ही कमी नाही. हे सांगण्याच्या हेतू इतकाच की, त्या गावामध्ये आमच्या वडिलांनी दळणाची चक्की सुरु केलेली.
आता तुम्ही म्हणाल आमच्या गावात चक्की न सुरु करता दुसऱ्या गावात चक्की का सुरु केली ? तर त्याला सुद्धा एक कारण आहे. आणि ते कारण म्हणजे आमच्या गावात त्यावेळी विद्युत म्हणजे वीज आली नव्हती.
पण आंबेरी गावामध्ये विद्युत आलेली होती.आणि आमच्या वडिलांनी विजेवर चालणारी चक्की आणली होती.त्यामुळे दळण दळण्यासाठी आम्हाला त्या गावाला जावे लागे.आणि ते काम माझा मोठा भाऊ करत असे.
म्हणून आमच्या आईनं भावाजवळ दळण देत म्हटले , “बाबू , संध्याकाळ व्हायच्या आत घरी ये हा मात्र.”
तेव्हा माझा मोठा भाऊ म्हणाला , “आये , कितीतरी लांब जाऊचा हा.एवढ्या लवकर कसा येवक शकान मी ?”
आई म्हणाली , “अरे, जरा लवकर-लवकर पाय उचल.नायतर तुझे हे सगळे न्हानं (लहान) भाऊ उपाशी रवतील. तेव्हा काय ता तूच विचार कर.”
झालं.भावाचा नायलाज झाला.भावनं दळण उचललं नि डोक्यावर घेतलं नि निघाला बाहेर.दर मजल दर मजल करत एकदाचा पोहोचला त्या गावात. दळण दळून घेतले तेव्हा संध्याकाळ होत आली होती.म्हणून माझी आजी माझ्या भावाला म्हणाली.
“बाबू , संध्याकाळ झाली आहे.तेव्हा तू आता घरी जाऊ नकोस.रात्रीचे वस्तीक हय रव. आणि सकाळी उठून जा आपल्या घरा.”
तेव्हा माझा भाऊ आजीला म्हणाला , “आय , माका वस्तीक रावक जमाचा नाय.”
“ का रे बावा ?” आजीने विचारले.
“आयेनं संध्याकाळीच येवक सांगल्यान हां.”
असे म्हणत असतानाच कुणीतरी शिंखलं . तशी आजी फार घाबरली. म्हणाली, “बघ कुणीतरी शिंखलं. तू आता अजिबात जाऊ नकोस.”
पण माझा भाऊ काही ऐकायला तयार नव्हती . तो म्हणाला , “ नाय आये.मका आजच जावकच व्हया.”
तेव्हा नायलाजान आजी म्हणाली, “आजच जावक व्हया तर जा बाबा.पण जरा सांभाळून जा हा.चोर पिसावले हत ना, म्हणून जरा भिती वाटता जिवाक.दुसरा काय?”
भाऊ म्हणाला , “आये , तू कायपण चिंता करू नकोस.मीबरोबर जातलंय.”
शेवटी आजीचं न ऐकता भाऊ निघालाच दळण घेऊन. होडीन पलीकडे आला.नि निघाला दरमजल करत.घोडेपोय ते नावळेगाव ह्या दोन गावाच्या मध्ये जंगल लागते.त्या जंगलातून वाटसरुना जावे लागते.पायवाट आहे म्हणा.तर सांगायचं तात्पर्य म्हणजे,त्या जंगलातून भाऊ एकटाच भरभर पाउलं उचलत निघाला होता.तेवढ्यात अचानक एक चोरांची टोळी समोरून आली.त्यांना पाहताच भावाच्या पोटात भीतीनं गोळा उठला.त्यावेळी तो समजला की हे चोरच असावेत.कारण त्यांची वेशभूषा तशी होती. केस , दाढी वाढलेली , हातात कुऱ्हाड पाहिल्यानंतर भाऊ काय समजायचं ते समजला. पण आता उपाय काहीच नव्हता.भावाचं अंग थरथर कापत होतं.आता आपल्याला हे दरोडेखोर ठार मारल्याशिवाय राहणार नाही.अशी त्याच्या मनाची धारणा झाली.पण शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना विनवत म्हणाला , “माका मारू नका.मी कोणाकच काय सांगूचय नाय.”
पण कुणी ऐकायला तयार होईना , एकजण म्हणाला , “हेका सोडू नको रे, ठार मारून टाका.नायतर ह्यो पोलीसांका खबर देतालो हा.” त्यातील एकजणाला मात्र माझ्या भावाची दया आली.तो आपल्या साथीदारांना म्हणाला,
“नका मारू रे, सोडा त्याला.किती लहान पोरंग हाय ते.ते काय सांगणार पोलिसांना.”
“तुका तो न्हान वाटता हां.पण तोच घोटाळो करतालो हा.तेवा हेका जिवंत अजिबात सोडून चालायचा नाय.ऐका माझां.” दुसरा एकजण म्हणाला.
तेव्हा तो दयाळू दरोडेखोर म्हणाला , “अरे,नकावडो पोरगो तो काय सांगतालो हा,आणि सांगितल्यान तरी कोन काय बिघडवणार हा आपला.सोडून देवा तेका.”
तेव्हा न जाणो , मोरक्याच्या मनात दया कुठून उत्पन्न झाली ती.तो पण म्हणाला, “सोडा त्याला.”
“पण सरदार.” एकाने मध्येच , बोलण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्यांच्या तो मोरक्या चिडून म्हणाला , “एकदा सांगल्याला कळत नाय तुमका.सोडा म्हणतंय ना?”
शेवटी सुटका झाली.तसा जिवात जीव आला भावाच्या. मनातून देवाचा चाललेला जप.शेवटी फळास आला. जिवदान मिळालं भावाला.पण त्यांच्या मोरक्यानं भावाला बजावलं म्हणाला , “जर गावात कुणाला काही सांगितलस. तर तुझा आम्ही जीवच घेऊ समजला.”
भावानं भीतीनं मान डोलावली.नि तिकडून पळत सुटला तो थेट घरी येऊन थांबला.रस्त्यात भेटणारी माणसं विचारत , “का पळतोयस रे,पोरा ?”
पण भाऊ कुणाला काही सांगेना.जेव्हा घरी आला तेव्हा आईनं पण त्याला विचारले , “धावत कित्या इल रे.”
आईला , पण तो काही सांगेना.कावरा बावरा होऊन इकडे-तिकडे चोर नजरेनं पाहू लागला.
जणू आजूबाजूला चोरच लपलेले असतील आणि ते ऐकतील नि आपल्याला ठार मारतील. ही त्याच्या मनात भीती बसलेली. त्यामुळे तो कुणालाच काही बोलला नाही.आई त्याला सारखं-सारखं विचारून थकली.पण तो बोलायलाच तयार नाही.शेवटी आईनं त्याला आपल्या कुशीत घेतलं.नि मायेनं त्याच्या पाठीवरून हात फिरवून कुरवाळलं नि स्नेहपूर्ण आवाजात विचारलं,
“काय झाला ता सांग ना ? कित्या घाबरलास तू ? कुणी तुका दम दिल्यान काय ? माका सांग . मी तेची बरोबर हजामपट्टी करतंय. तू अजिबात घाबरू नको.”
मग भीत भीत भावनं आईला सर्व हकीकत कथन केली.ती भयानक कथा ऐकून आई स्वत:लाच शिव्या शाप देवू लागली.ती स्वत:लाच दोष देत म्हणाली ,
“उगाच मी माझ्या पोराक दळूक धाडलय. पण तसा काय होवचा नाय माझ्या पोराक.माझो पांडुरंग बसला हा ना साह्यावर.तो असा कसा वाईट होवक देत माझ्या पोराचा. ”
असे बोलून ती देवाचे आभार माणू लागली.आणि खरंच आहे ते.ज्याच्या पाठीशी परमेश्वर आहे.त्याच्या केसालाही कधी धक्का लागणार नाही. कारण समर्थांनी म्हटलच आहे ना , भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.हा त्याचाच प्रत्यय आहे.
समाप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा